तरुणांनो राजकारणात या

0

मुंबई : हल्लीच्या काळात करिअर निवडतांना, काही ठराविकच क्षेत्रात रॅट रेस मध्ये सामिल झालेली तरुण पिढी वायू वेगाने अग्रेसर होतांना पाहायला मिळते. पण त्या ठराविक क्षेत्रा व्यतिरिक्त राजकारणाला करिअर म्हणून पाहणारी मंडळी क्वचितच. राजकारण म्हटलं की दादागिरी, गुंडगिरी, नुसतेच आश्वासनं, खोटेपणा, लांडे-लबाडी, अशा अनेक कुशब्दांचा गोड गैरसमज आपल्याला ऐकायला मिळतो. जणु समाजातला हा एक राक्षस घटक अशी प्रचिती पसरवणारा मनुष्य घटक प्रत्येक घरात किमान एक तरी उपलब्ध आहेच. “ते आपल्या सारख्यांच काम नाही !” “तिथे काय करिअर आहे ?” “ही सगळी फालतुगिरी असते !” अशी अनेक वाक्य अगदी सहजपणे खूप मोठ्या पदव्या घेतलेला सुशिक्षित वर्ग सहजपणे जिभेला लगाम नसल्या सारखा बोलून टाकतो.
पण मुळात ‘राजकारण’ म्हणजे काय, हे आपण समजूनच घेत नाही किंबहुना त्यावर विचार ही करत नाही, ही लोकशाहीची शोकांतिका आहे असच वाटते. कारण आपण, आपलं घर, आपला परिवार, आणि आपलच आपलं विचार करणारी स्वार्थी मनोवृत्ती कुठेतरी हावी होतांना दिसते. समाज गेला चुलीत ! माझ लक्ष माझ्या मुलीत ! अशे प्रायव्हेटाईझेशन विचार अनेकांचे झाले आहेत.जर सद्सदविवेक बुद्धीने विचार केला तर, आपल्या देशाची किंवा राज्याची प्रगती-दिशा कशी असली पाहिजे? कुठल्या धोरणांवर आणि तत्वांवर व्यवस्थापनं चालली पाहिजे? त्याचा आग्रह काय असला पाहिजे ? या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच राजकारण. फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढण्यापुरतं, जिंकण्यापुरतं म्हणजे राजकारणाची मर्यादा नव्हे. मुल्यांकित विचारसरणी असणं आवश्यक आहे. सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे, देशात व राज्यात शांतता नांदली पाहिजे, शेतकरी सक्षम झाला पाहिजे, रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे, आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे, अशा अनेक बाबींवर केंद्रित राहून गल्ली पासून ते देश स्तरा पर्यंत अखंड राष्ट्रव्यापी दृष्टिकोन ठेऊन समाजासाठी समाजाचं लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करणं म्हणजे खऱ्या अर्थाने राजकारण. मग त्यासाठी होणाऱ्या निवडणूका, त्यातून मिळवलेली मतं, त्यातून निर्माण झालेली प्रतिमा, चारित्र्य आणि पुढे जनहितार्थ घेतलेला निर्णय हा त्यातीलच भाग.जर वैश्विकदृष्ट्या विचार केला तर भारताचं जागतिक पातळीवर प्रभुत्व झळकविण्यासाठी आणि ते टिकविण्यासाठी, येणाऱ्या काळात तरुण तडफदार युवा नेतृत्वाची आणि सुराज्यकर्त्यांची आवश्यकता आपल्या देशाला आहे. समाजहीतवादी दृष्टिकोन, मानवतावादी तत्व, शांतता, वैचारिक समतोल साधणारी राजकारणी तरुण पिढीची नितांत गरज देशाला आहे.तारुण्यातली अफाट ऊर्जा, गरुड झेप घेणारी जिद्द, परिवर्तनाची ओढ असणाऱ्या यंग राजकारणी ब्रिगेडने सुराष्ट्र निर्माणच्या प्रक्रियेत सामिल व्हा आणि ‘सुजलाम’ ‘सुफलाम’ भारत घडविण्यासाठी तरुणांनो राजकारणात या…!

– सुराज साधना सुरेश कुटे
(कल्याण)
संपर्क – 7021264578

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here