………………………………..
– कांतीलाल कडू
…………………………………..
दिवस मावळतीकडे कलंडण्याच्या उंबरठ्यावर होता. आजचा दिवस जरा कमी वेदना देणारा ठरेल, असे विचार मनात घोळत होते. येणारा परिचित, अपरिचितांचा फोन कोविड रुग्ण, नातेवाईक, मित्र किंवा त्यांच्या आप्तस्वकीयांचा असतो अशी आता गेल्या काही दिवसांपासून मनाची पूर्ण तयारी झालेली आहे.
कोविड ही साथ आहे, महामारी आहे की दहशतीचा दुसरा चेहरा याचे कोडे अद्याप मला सुटले नाही. नाही म्हणायला, तसा दररोज कोविड रुग्णांशी भ्रमणध्वनीवरून थेट संवाद, कधी मुक्तपणे गप्पांची मैफिल तर कधी अंग गळून पडेपर्यंत आणि भीतीचा थरकाप उडावा अशी स्थिती होईपर्यंत कोविड रुग्णांची हॉस्पिटलमध्ये व्यवस्था लावून देण्याची सवय अंगवळणी पडली आहे.
दिवसभर एकदाही पाऊस डोकावून गेला नाही. ऊन तेवढा पहारा देत होता बाहेर. फोन. खणखणत होता सातत्याने. तरीही नेहमीची दगदग जाणवत नव्हती. फारसे कुणी घाबरलेले, आज संपर्कात आले नव्हते. त्यामुळे मलाही चुकल्यासारखे वाटत होते…!
शनिवार असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनाही आज चाचपडून बघायचे नाही. त्यांनाही थोडी विश्रांती घेऊ दे म्हणत कुणालाही संपर्क केला नाही.
आता मावळत्या दिशेच्या कुशीत सूर्य विसावेल असे शांत वातावरण पसरले असताना फोनची घंटी वाजली. अपरिचित फोन होता…
साहेब, एक काम होते. कुठेच बेड मिळत नाही. पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आहे…
बरं…. करू या काही तरी व्यवस्था.
घाबरू नका… मी आपला धीर देत होतो. नेहमीच्या सवयीमुळे अगदी सहज त्याला सल्ला देण्याचा फंडा सुरू केला…!
तसे तो म्हणाला,
साहेब, रुग्ण कोविड आहे. पण तो डायलेसिसवर आहे. त्याला आधी डायलेसीस करणे तातडीने गरजेचे आहे. तीन चार दिवसांपासून डायलेसीस केले नाही.
मला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. म्हटले ठिक आहे. आपण करू या काही तरी…!
तर तो म्हणाला साहेब, सगळीकडे जावून आलो. कोविड असल्यामुळे नेहमीच्या डॉक्टरांनी डायलेसीसला नकार दिला आहे. त्याचे पोट खुप फुगलेले आहे. बायको रडत आहे.
आता जरा माझ्या पायाखालची वाळू सरकत होती. इतके दिवस अगदी लीलया कोविड रुग्ण हॉस्पिटलला दाखल करत होतो. काही भस्मासुरांच्या मायावी तावडीतून रुग्णांच्या नातेवाईकांना वाचवताना बिलाची रक्कमही कमी करून घेत आहे. त्याचे फार काही वाटत नाही. इतरांसाठी हे काम डोंगर उपासण्यासारखे ठरते. आपण माहिर झालो आहोत आणि बऱ्यापैंकी कोविडचा अभ्यासही झाला आहे.
त्याला म्हटले, थोडा वेळ दे… आपण मार्ग काढू.
तो म्हणाला साहेब मला माहित आहे, हे काम तुम्हीच करू शकता.
माझ्या मुलाचा प्रश्न काही वर्षांपूवी तुम्हीच मंत्रालयापर्यंत नेवून सोडविला होता. तो सांगत होता. मला थोडे थोडे आठवत होते. म्हटले संतोष जाधव का?
तो म्हणाला, मी बाळू जाधव. संतोष माझा मोठा भाऊ. माझ्या दूरच्या नात्यातील हा रुग्ण आहे. तो खारघरमधील एका गावात राहतो. त्याच्यासाठी काही तरी करा. तुम्हीच करू शकता… वगैरे बोलता बोलता त्याचे सात आठ फोन झाले अन माझीही अस्वस्थता वाढली होती.
डायलेसीसचा कोविड रुग्ण पहिल्यांदाच समोर आल्याने हा अनुभव, ती तगमग जरा नवीन होती.
‘स्टे सेफ, स्टे होम’ मुळे घरीच नियंत्रण कक्ष केले आहे. इथूनच कोविड, नॉन कोविड, इतर आजारांच्या रुग्णांची सेवा साधतो.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. येमपल्ले यांना फोन केला. ते म्हणाले ती व्यवस्था कामोठे एमजीएमकडेच झाली तर…!
मग कोविड व्यवस्थेच्या समन्वयक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्याशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या, विचारून सांगते.
अर्धा तास गेला… माझ्याही मनाची घालमेल सुरू झाली…
इतक्यात बाळू जाधव यांचा फोन आला.
त्याला धीर देत काही तरी व्यवस्था होईल असे सांगत होतो.
तेवढ्यात, तो म्हणाला साहेब… पेशंटला. दोन्ही डोळ्यांना दिसत नाही. दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो…
आता मात्र मी भेदरून गेलो होतो. काय ही कर्मगती. आधिच डायलेसीस, दोन्ही डोळ्यांना दिसत नाही. त्यात कोविड…
डोकं सुन्न झाले. पुन्हा पुंड मँडमना फोन केला. त्यांना हे सगळं सांगितले. त्या म्हणाल्या आता लगेच काही होईल असे वाटत नाही. त्यांचे शेड्युल्ड असते. सोमवारी करू या.
त्यांना आर्जव केले. त्या सुद्धा कोविडमध्ये गेले चार महिने पायाला भिंगरी बांधून समन्वय साधत आहेत, रुग्ण आणि डॉक्टरांशी.
याच दरम्यान खांदा कॉलनीतून फोन आला. येथील हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना कोविड असल्याने पेशंटला हलवायला सांगितले आहे. सगळीकडे शोधलं पण कुठेच बेड मिळत नाही.
त्यांना पंधरा मिनिटात सांगतो म्हटले आणि यंत्रणा गतिमान केली. डॉ. येमपल्ले, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. जगताप आदींना संपर्क साधून त्या रुग्णांची व्यवस्था केली. ते गृहस्थ दाखल झाले. खासगी डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांच्या डोक्याचा पार भुगा केला होता. त्यांचे समुपदेशन केले. त्यांनी आभार मानले.
पुन्हा डायलेसीस पेशंटवर लक्ष केंद्रित केले.
तोपर्यंत काही सुगावा लागत नव्हता. पुंड. मँडमचे सहाय्यक चेतन गायकवाड यांचा फोन आला. दादा, सोमवारी करू या का डायलेसीस…?
म्हटले नाही जमणार. धोका होऊ शकतो.
त्याने पुन्हा कामोठे एमजीएम हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. आर. सलगोत्रा यांना सांगितले. पुंड मँडम यांनी मनावर घेतले आणि व्यवस्था केली.
थोडे हायसे वाटले. लगेच बाळू जाधवला फोन करून पेशंटला एमजीएम हॉस्पिटलला पाठवायला सांगितले.
इतक्यात वहाळचे माजी सरपंच प्रशांत पाटील यांचा फोन आला. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये एका कोविड रुग्णाला साडेसात लाख रूपये बिल आले आहे. काही करता येईल का?
आकडा ऐकतानाही कानाचे पडदे फाटायला होतात.
मग, तिकडे फोन फिरवला. फोन कुणी उचलत नव्हते. मग नवी मुंबई महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जावंदे यांना ती बिले पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली.
एवढ्यात, उरण बोरखार वरून फोन आला. तेजस डाकी यांचा. एका तीस वर्षीय मित्राला कोविड झाला आहे. उरणच्या सेंटरमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी खांदा कॉलनीतील हॉस्पिटलमध्ये होता. काहीच फरक नाही. तो घाबरला आहे. त्याला कुठे तरी अड्मिट करा…
त्याला सांगितले थांब जरा. पाहतो.
पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात फोन करून डॉक्टरांना विनंती करून व्यवस्था केली. त्याला पेशंटला आणायला सांगितले. त्याचा मार्ग मोकळा करून दिला.
इतक्यात पहिल्या रुग्णाच्या सोबत आलेल्या व्यक्तीचा फोन आला. आम्ही आलो आहोत. कुणी दाद देत नाही इथे.
मग चेतनला सांगितले. त्यांनी फोन फिरवला आणि थोड्या वेळात पेशंट अड्मिट करून घेतो आणि डायलेसीस सकाळी करून घेऊ या, असे ठरले.
अखेर थोडा वेळ पेशंटला ताटकळावे लागले आणि रात्री दहा वाजता प्रश्न मार्गी लागला. चार तास वेदनांचे गेले, त्याचे आणि माझेही! वेदना जेव्हा संवेदना होते, तेव्हाच माणूस असल्याची जाणीव प्रगल्भ होते, याचा हा निराळा अनुभव काल घेत होतो.
रात्री अकरा वाजता आणखी दोन फोन आले. नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीतील दोन रुग्ण हॉस्पिटलमध्ये उद्या दाखल करायचे आहेत.
त्यातील एक सदगृहस्थ मला ओळखतात. त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. ते म्हणाले माझ्याकडे नंबर नव्हता पण श्रीयुत खोत यांनी तुम्हीच खात्रीने काम कराल असे सांगितले आहे. मला हॉस्पिटलला तेवढे दाखल करा…
मी म्हटले काका, अजिबात चिंता नको. उद्या सकाळी हॉस्पिटलला अड्मिट करून देतो.
दुसरा फोन एका तरुणीचा होता. फेसबुकवर पोस्ट वाचली. एका रुग्णासाठी काही आर्थिक मदत मिळेल का म्हणाली…
नाही सांगितले मी. खासगी हॉस्पिटलला खर्च करू नका… आणि इतर मदत करेन परंतु आर्थिक मदत करता येणार नाही असे सांगितले.
ती म्हणाली, काही हरकत नाही. माझ्या मित्राच्या बाबांसाठी हवे होते. त्याला तुमचा नंबर देते.
थोड्या वेळात एका तरुणाचा फोन आला. रात्र चढत चालली होती… कोविड डोक्यात, अंगात भिनल्यागत झपाटून काम सुरू आहेच.
फोन केलेल्या तरुणाला स्वतःला काही लक्षणे जाणवत आहेत. पण खासगी हॉस्पिटलमध्ये त्याचे बाबा आहेत. ते बाधित आहेत. खासगीमध्ये खर्च परवडणार नाहीत. काय करायचे?
त्याला म्हटले निर्णय तू घे. सरकारी हॉस्पिटलला दाखल करायचे असेल तर सहकार्य करतो.
तो म्हणाला रात्र खुप झाली. आपण उद्या निर्णय घेऊ. सहकार्य करा.
रात्रीचा मध्यांतर झाला असताना आणखी एका मित्राने फोन केला. रेडिमिसिवर इंजेक्शन कुठेही मिळत नाही.
कृपया उपलब्ध करून द्या, उद्या हवे आहे. आता उद्याचे तिघांना वेगवेगळे आश्वासन देवून झोपी जाण्याचे ठरवले आणि पहिल्या रुग्णांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा फोन केला. आता त्याच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती मिळताच एकाएकी शीण हलका झाला होता.
हा चक्रव्यूह भेदताना आणखी दोन कामे हाता वेगळी केली. एक तर वर्तमानपत्राचे पहिले पान डिझाइन केले आणि मुलांना जरा खमंग मेजवानी हवी होती म्हणून किचन ताब्यात घेवून मस्तपैंकी हैद्राबादी व्हेज बिर्याणी बनवून दिली. मावळतीला जाण्यापूर्वी सूर्याने इतकी ताकद दिली होती, ती सत्कार्याला लावली. हा अनुभव जरा हटके आणि वेगळा वाटला म्हणून हा शब्दप्रपंच!
आजची सकाळ मात्र दिलेले शब्द पूर्णत्वास नेण्याने सुरू झाली, तरीही कालची सांजवेळ जरा वेगळीच होती.