
मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्या दौरा का रद्द केला? याचे कारण सांगितले. तसेच त्यांच्या अयोध्या दौ-यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. इतकेच नाहीतर मुख्यमंत्र्यांवर देखील जोरदार टीका केली.अफजल खानाच्या कबरीचा विस्तार किती झालाय? त्याच्या कबरीसाठी फंड येतो कुठून? औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात तरीही महाराष्ट्र थंड आहे. आम्हाला काहीही वाटत नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळची अजान बंद झाली. अजानचा आवाज हळूहळू वाढणार. भोंग्यांचा विषय सुरू झाला तर एकदा तुकडा पाडून टाका. हे आंदोलन आहे. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीस आली. जे कायद्यानुसार वागतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? जे कायदे पाळत नाहीत त्यांच्यासोबत चर्चा करणार का? आंदोलने होत राहणार आहेत. आमची टीम तयार आहे. हे आंदोलन सुरू ठेवायचं आहे. त्यासाठी एक पत्र देणार आहे आणि ते प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.पवारांनी बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवली – औरंगाबादेत बघता बघता एमआयएमचा खासदार झाला. कोणीतरी येतं आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतं? तुम्ही काय करता? एमआयएमच्या अवलादी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात. याचे शिवसेनेला काहीच वाटत नाही. कारण शिवसेनेसाठी सत्ता महत्त्वाची आहे. औरंगजेब हा शरद पवारांना सूफी संत वाटतो का? शरद पवार बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवत आहेत. तरीही शिवसेना पवारांसोबत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.तुम्ही कोण? मुख्यमंत्र्यांवर टीका – राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो, असे म्हणतात. पण, मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोलनाक्यापासून सर्वच आंदोलनं यशस्वी झाली. तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याचा गुन्हा आहे का? हे उद्धव ठाकरेंनी सांगावे. भूमिका कुठलीच घ्यायची नाही. संभाजीनगरचं नामकरण झालं की नाही झालं काय फरक पडतो असं म्हणतात. मी आहे असं सांगतात. पण तू कोण आहे? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी? अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.मुख्यमंत्र्यांना टोला – राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे हे लेहमध्ये जेवण करताना दिसले. ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व फक्त बोलण्यापुरतं आहे. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा लावलाय? यांचं हिंदुत्व खोटं आणि आमचं खरं असं सांगतात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.राज ठाकरेंचा रोख भाजपकडे? – कारसेवकांना ठार करून शरयू नदीत मृतदेह सोडले होते. त्या ठिकाणाचं देखील दर्शन मला घ्यायचं होतं. पण, राजकारणात अनेकांना भावना समजत नाहीत. अयोध्येत काही झालं असतं तर आपले कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले असते. तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला तुरुंगात टाकलं असतं. आपल्या कार्यकर्त्यांची मला काळजी आहे. आता आठवलं का? राज ठाकरेंनी माफी मागावी? आतापर्यंत कुठे गेले होते? विषय माफी मागण्याचा आहे ना? गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाची व्यक्ती आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मारलं होतं. त्यांना गुजरातमधून हाकलण्यात आलं. तिथून कोणी माफी मागणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.अयोध्या दौ-याला विरोध हा ट्रॅप – पायाचं दुखणं वाढलं आहे. कंबरेला त्रास होतो. त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार आहे. अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं. अनेकजण कुत्सितपणे बोलायला लागेल. पण, मुद्दाम त्यांना बोलण्यासाठी दोन दिवस वेळ दिला आणि आज भूमिका सांगण्यासाठी सभा घेतली. माझ्या अयोध्या दौ-याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली. अयोध्या वारी खुपणा-यांनी हे काम केले आहे.
