राष्ट्र सेवा दलाच्या पंढरपूर येथील कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

12 मे 2022, पंढरपूर – विठ्ठल मंदिर खुले झाले, आता पुढे काय ? जातीची उतरंड आता संपवली पाहिजे. कोणत्याही समाजातील पुजाऱ्यांकडून पूजाअर्चा व कार्ये करून घेता आली पाहिजे, त्यातून समाजात पुढच्या नव्या प्रवासाला सुरवात होईल, असे आवाहन बहुजनांचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल (11 मे रोजी) पंढरपुरात केलं. साने गुरुजी यांच्या उपोषणानंतर खुलं झालेल्या विठ्ठल मंदिर प्रवेशाच्या 75 वर्षेपूर्ती निमित्त राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, आज देशात सर्वांना मान्य होईल असा एकही नेता नाही. सर्व नेते आपल्या जाती – गटापुरते संकुचित झाले आहेत. जात, भाषा, धर्म, प्रांत भेद वाढलेत. त्यामुळे समाजाचे विघटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य होते. कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील, पन्नालाल सुराणा, भारत लाटकर, राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, राज्य सचिव नवनाथ गेंड, अतुल देशमुख, सुशीला मोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यभरातून पाच हजारांहून अधिक सेवा दल साथी या कार्यक्रमासाठी पंढरपूरात आले होते.दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून 1 मे ते 10 मे 1947 रोजी साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे उपोषण केले होते. त्यानंतर सर्वांसाठी श्री विठ्ठल मंदिर खुलं झालं. त्या घटनेला यंदा 75 वर्षे झाली. त्यानिमित्ताने राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पंढरपूरच्या शिवाजी चौकात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तनपुरे महाराज मठ ते शिवाजी चौक अशी समता दिंडी काढण्यात आली होती. भजन सम्राट अजित कडकडे यांच्या अभंग गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.तनपुरे महाराज यांना पहिला साने गुरुजी समता पुरस्कार -पंढरपूरात साने गुरुजींच्या उपोषणाला जागा मिळत नव्हती. गाडगे महाराजांचे सहकारी कुशाबा तनपुरे महाराजांनी त्यांच्या मठात जागा उपलब्ध करून दिली. त्या तनपुरे महाराजांचे सुपुत्र ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना सामाजिक सलोखा व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल राष्ट्र सेवा दलाचा पहिला साने गुरुजी समता पुरस्कार यावेळी देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना बद्रीनाथ महाराज म्हणाले, बहुजन समाज आजही मंदिराच्या विविध हक्कांपासून उपेक्षित आहे. साने गुरुजींच्या कार्यात खारीचा वाटा आम्हा कुटुंबियांना उचलता आला. माझे वडील त्या कार्यात सहभागी होते. मी महाराज असूनही उपेक्षित आहे, मला साने गुरुजींच्या नावाने पुरस्कार दिला हा मोठा गौरव मी समजतो.पंढरपूरच्या तनपुरे मठात साने गुरुजींचं स्मारक -तनपुरे महाराज मठात साने गुरुजींच्या स्मारकासाठी जागा देत असल्याचं यावेळी बद्रीनाथ तनपुरे महाराज यांनी सांगितलं. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांनी बद्रीनाथ महाराजांच्या सूचनेनुसार तशी घोषणा केली. बद्रीनाथ महाराज यांचे आभार मानले. प्रकाश आंबेडकर यांनीही साने गुरुजींचे स्मारक होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.आपल्या भाषणात नितीन वैद्य म्हणाले, साने गुरुजींच्या उपोषणाच्या 75 वर्षाच्या निमित्ताने राष्ट्र सेवा दलाने राज्यभर सामाजिक सलोखा अभियान राबवलं. खरा तो एकची धर्म, या प्रार्थनेचं ठिकठिकाणी गायन झालं. राज्यभर सर्व जिल्ह्यात सेवा दल सैनिक आणि समविचारी संस्था, व्यक्ती या अभियानात सहभागी झाल्या होत्या. त्या अभियानाचा समारोप पंढरपुरात झाला.75 वर्षांपूर्वीचे साने गुरुजींचे प्रश्न आजही जिवंत -राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यावेळी बोलताना म्हणाले, स्वातंत्र्य जवळ आलं होतं तेव्हा साने गुरुजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची चर्चा सुरू केली. मिळणारं स्वातंत्र्य दलित, गरिबांपर्यंत कसे पोचेल? सामाजिक विषमता कधी, कशी संपणार? साने गुरुजींनी महाराष्ट्र दौरा केला पंढरपूर उपोषणाच्या आधी. त्या दौऱ्यात या प्रश्नांची चर्चा घडवून त्यांनी महाराष्ट्र मन ढवळून जागं केलं होतं. मंदिर खुलं होण्याचा मुद्दा होताच, पण सवर्णांच्या मनाची कवाडं खुली व्हावी असा साने गुरुजींच्या उपोषणामागे हेतू होता. ते प्रश्न आजही जिवंत आहेत. त्या प्रश्नांशी आज आपल्याला भिडावं लागेल. त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. गांधी – आंबेडकर विचारच आपल्याला पुढे जायचा रस्ता दाखवतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here