ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांचे रसिक-श्रोत्यांवर गारूड

0

मुंबई :  ( पनवेल/प्रतिनिधी)  शब्द लिहिताना जीव ओतावा लागतो. उगीच काहीही लिहून चालत नाही. भलतं सळतं लिहिलं तर काय होते, याचा अनुभव आपण पेशवाईत घेतला आहे. ‘ध’ चा ‘मा’ झाला. ही शब्दांची किमया असते आणि त्यातून काहीही घडतं, असे प्रांजळ मत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी व्यक्त केले. रसिक-श्रोत्यांशी संवाद साधताना त्यांनी सोप्या-सोप्या शब्दांतून अनुभवाचे काळीज उधळून टाकत उपस्थितांवर गारूड घातले. तेव्हा रसिकही त्यांचे शब्द ऐकताना आतुड्याचे कान करून आसनस्थ झाले होते.खांदा कॉलनी शहरातील सेक्टर 7 येथील डॉ. पिल्लेज ग्लोबल अकादमीच्या वातानुकुलित सभागृहात ज्येष्ठ नाट्य अभिनेते, नाट्यलेखक, दिग्दर्शक, कांदबरीकार अशोक समेळ यांच्या ते आभाळ भिष्माचं होतं या कांदबरीच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन संजय मोने, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी व अशोक समेळ यांच्या शुभ हस्ते झाले. त्यावेळी ते हलक्या फुलक्या शब्दांनी सभागृहाला अधून मधून पोट धरून हसायला लावणारा संवाद साधत होते. या कार्यक्रमाचे आयोजन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेल संघर्ष समितीने केले होते.व्यासपिठावर पहिला मराठी इंडियन आयडॉल सागर म्हात्रे, खांदेश्‍वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे, पनवेल महापालिकेेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, ज्येष्ठ रंगकर्मी संजीवनी समेळ, अभिनेते संग्राम समेळ, भरतनाट्यम विशारद आणि अभिनेत्री श्रद्धा समेळ, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू आदी मान्यवर उपस्थित होते. सागर विश्‍वास म्हात्रे याचा कांतीलाल प्रतिष्ठान आणि पनवेल संघर्ष समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते ‘गंधर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
संजय मोने यांनी जीवनातील काही किस्से सांगून रसिक-श्रोत्यांना जिंकले. त्यांनी अशोक समेळ यांच्याशी निखळ मैत्रीसंदर्भात स्पष्टोक्ती देताना मैत्रीच्या नात्याला कोणतंही नाव, गाव, बंधने नसल्याचे सांगितले. त्यामुळेच जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असलो तरी अशोक समेळ यांच्यासाठी यावं लागतं, इतकी आपुलकी हृदयात ठासून भरली असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्यथा बह्मचारी राहिलो असतो!,अशोक समेळ यांनी लिहिलेल्या ‘कुसूम मनोहर लेले’ या बहुचर्चित नाटकामुळे मला सुकन्या कुलकर्णी पत्नी म्हणून लाभली. जर नाटकात संधीच मिळाली नसती तर कदाचित बह्मचारी राहवे लागले असते, असे ठोस मतप्रदर्शन करायलाही संजय मोने विसरले नाहीत, त्यामुळे अशोक समेळ यांनी फार मोठे उपकारच आपल्यावर केले आहेत, अशी धारणा असल्याचे सांगतानाच, आता माझ्या मुलीसाठीही अशोकने नाटक लिहावं, अशी मिश्‍लिक टिप्पणीही त्यांनी केली तेव्हा सभागृहात टाळ्यांचे फटाके वाजत होते.
प्रबोधनाची व्याख्याच बदलली,प्रबोधनाची व्याख्या, समिकरणे आणि साधने बदलली आहेत. नाटक, सिनेमातून प्रबोधन होत नाही, असा ठोस दावा त्यांनी करताना, जर प्रबोधन नाटक अथवा सिनेमातून होत असते तर लोकमान्य टिळकांसह अनेक लोकहितवादी नेत्यांनी आंदोलने छेडली नसती. तेव्हा नाटक, सिनेमा ही फक्त मनोरंजनाची साधने म्हणूनच उरली आहेत, असे धाडसी विधान करताना व्यासपिठावरीव वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्याकडे पाहत प्रबोधनासाठी आता कायदा आणि सुव्यवस्थेची करारी नजर आणि अंमलबजावणी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
दादर येथे आंबा महोत्सव,दादर येथे वनिता समाज सभागृहात त्यांनी 21 व 22 मे रोजी आयोजित केलेल्या आंबा महोत्सव आणि त्यातून येणार्‍या उत्पन्नातून काही संस्थांना ते कसे आर्थिक मदत करतात, याविषयी छान माहिती देत त्याच धर्थीवर पनवेलकरांनी दही महोत्सव आयोजित करण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले.
कोविडने चांगलेच संस्कार केले,सततच्या धावपळीतून म्हणा किंवा बाहेरचे खाण्याच्या चविष्ट सवयींमुळे म्हणा. परंतु त्या वळणाला कोविडने चांगलाच झटका दिला. बाहेरच्या अन्नापेक्षा घरचं अन्न किती तरी पटीने चांगले, सकस असते. याचा साक्षात्कार कोविडमुळे झाला, तसेच पती, पत्नीमध्ये दडलेले चांगले गुणही त्यानिमित्ताने समोर आल्याची टिप्पणी मोने यांनी केली.
समेळांचं घर हे कलेचं माहेर,अशोक समेळ हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्याचा मुलगा अभिनेता संग्राम याला लहानपणीच अंगाखांद्यावर खेळवले आहे. त्याला कधीही काही खावंसं वाटलं तर तो फोन करतो. त्याची पत्नी आणि आमची सून श्रद्धा ही उत्तम नर्तिका आहे. अशोकची पत्नी संजीवनी उत्तम गायिका आणि अभिनेत्री आहे. अशोक स्वतः महानाट्यकार आहे. असे हे कलेचं घर आहे. तेव्हा हे कौटुंबिक नातं आमचं छान जुळून आले आहे. तो लिहित आहे, लिहित राहिल. कधीही कोणत्याही पार्टीत सहभागी न होता, स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवणारा हा लेखक असल्याचा अभिमान वाटतो, असे मोने यांनी सांगितले.
याप्रसंगी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, अशोक समेळ, सुभाष कोकाटे, कांतीलाल कडू आदींची समायोचित भाषणे झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा पाटील (चौक) यांनी उत्तमरित्या केले. मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ कांदबरीकार आणि नवीन पनवेल बांठिया विद्यालयाचे प्राचार्य बी. एस. माळी, अभिनेते देवेंद्र सरदार, आनंद पाटील, सुरज म्हात्रे, शैला बडगुजर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हितेंद्र पाटील, जयश्री गोखले, मंगल भारवाड, भुषण साळुंके, डॉ. हेमंत पाटील आदींनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांतीलाल प्रतिष्ठान आणि पनवेल संघर्ष समितीचे सदस्य, पदाधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच श्रोत्यांमध्ये ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, शेकापच्या महिला आघाडीच्या नेत्या माधुरी गोसावी, पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विश्‍वास म्हात्रे, मनोहर उरणकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांचे स्वागत डॉॅ. शितल सोमवंशी आणि सहकार्‍यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here