Home Breaking News “रंगकर्मी क्रिकेट लीग”चा दिमाखदार ट्रॉफी आणि टी-शर्ट अनावरण सोहळा संपन्न..

“रंगकर्मी क्रिकेट लीग”चा दिमाखदार ट्रॉफी आणि टी-शर्ट अनावरण सोहळा संपन्न..

0

मुंबई: (प्रतिनिधी महेश्वर तेटांबे)

चंदेरी दुनियेतील कलाकार जेव्हा हातात बॅट आणि चेंडू घेतात, तेव्हा मैदानातही मनोरंजनाचा षटकार पाहायला मिळतो. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकत्र आणणाऱ्या बहुचर्चित “रंगकर्मी क्रिकेट लीग” (RCL) स्पर्धेचा अधिकृत ट्रॉफी आणि टी-शर्ट लॉन्चिंग सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला श्री.श्रीकांत भारतीय आणि श्री. मंगेश सांगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कलाकारांमधील एकोपा आणि खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याची रंगत द्विगुणित झाली. या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे संघांचे नेतृत्व करणारे दिग्गज कलाकार! यंदा मैदानात आपली रणनीती आखण्यासाठी सज्ज झाले आहेत: विजय पाटकर, सागर कारंडे, हरीश दुधाडे, कांचन पगारे, संचित यादव आणि नूपुर दुधवडकर या दिग्गज कलाकारांच्या सहभागामुळे प्रेक्षकांमध्ये स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संचित यादव आणि शितल कल्लापुरे यांनी मोलाची भूमिका बजावली. आकर्षक चकाकणारी ट्रॉफी आणि विशेष डिझाइन केलेले टी-शर्ट्स हे या संध्याकाळचे मुख्य आकर्षण ठरले. या उपक्रमाला पंडित राठोड, सचिन खांडागळे, संदीप राठोड, गणेश गारगोटे, ओमकार सर आणि अखिलेश चौबे या प्रायोजकांनी भक्कम पाठबळ दिले आहे. “केवळ अभिनयच नाही, तर मैदानावरही आमची मैत्री आणि एकता दिसावी, हाच या लीगचा मुख्य उद्देश आहे.” क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. या लीगचे सामने खालीलप्रमाणे रंगणार आहेत: दिनांक: १४ आणि १५ मे २०२६. ठिकाण: परळ सेंट्रल रेल्वे ग्राऊंड, मुंबई. अंतिम सामना हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असेल. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडत्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते ‘परळ’च्या खेळपट्टीवर… कोण उंचावणार विजयाची ट्रॉफी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here