हिंदुस्थानी क्रिकेट प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यांत हिंदुस्थानी स्पोर्ट क्लब इलेव्हन संघ विजयी ; ५१ हजारांचे प्रथम पारितोषिक मिळवून विजयी चषकावर कोरले नाव

0

बेज : ( प्रशांत गिरासे देवळा) नवी बेज ता. कळवण येथील हिंदुस्थानी क्रिकेट क्लब आयोजित हिंदुस्थानी प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यांत हिंदुस्थानी स्पोर्ट क्लब इलेव्हन संघाने प्रितेश इलेव्हन संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांकाचे ५१ हजारांचे रोख पारितोषिक मिळवून विजयी चषकावर नाव कोरले तर उपविजेता ठरलेल्या प्रितेश इलेव्हन संघाला ११ हजारांचे द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत एकूण दहा संघांनी सहभाग घेतला होता.नवी बेज येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या मैदानावर हिंदुस्थानी क्रिकेट क्लबने आयपीएल पॅटर्ननुसार आयोजित केलेल्या क्रिकेट प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी रोहित पगार,घनश्याम पवार,जयेश पवार व शरद निकम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी दि.०५ फेब्रुवारी रोजी पार पडला. अंतिम फेरी गाठलेल्या सतीश निकम यांच्या हिंदुस्थानी स्पोर्ट क्लब इलेव्हन आणि सुनील शिंदे यांच्या प्रितेश इलेव्हन संघामध्ये हा सामना झाला. प्रितेश इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांना समाधानकारक अशी फलंदाजी करता आली नाही अवघ्या ४८ धावा करत ९ षटक ५ चेंडूत १० गडी बाद झाले.हिंदुस्थानी स्पोर्ट क्लब इलेव्हन संघाच्या गोलंदाजांपुढे फलंदाजाना उत्कृष्ट कामगीरी करता आली नाही.काही चेंडूतच फलंदाज तंबूत परतत होते.गोलंदाज राकेश बच्छाव याने दोन षटकात अवघ्या ३ धावा देत ४ गडी बाद करत धुव्वा उडवला. प्रितेश इलेव्हन संघाने केलेल्या ४८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानी स्पोर्ट क्लब ११ संघाच्या सलामीच्या फलंदाजानाही अवघ्या काही चेंडूतच तंबूत परतावे लागले होते.प्रितेश इलेव्हन संघाच्या गोलंदाजानीही कमालीची कामगिरी केली.हिंदुस्थानी स्पोर्ट क्लब इलेव्हन संघाने चार षटकात अवघ्या १७ धावा करत ३ गडी गमावले होते.यामुळे सामना अटीतटीचा आणि रोमांचक होत चालला होता यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या नंदू बच्छाव आणि मोहन रौंदळ यांच्या उत्कृष्ट फलंदाजीने सामना एकतर्फी केला.१८ चेंडूत ६ धावांची विजयासाठी गरज असताना फलंदाज मोहन रौंदळने ९ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विजयी षटकार मारल्याने ७ गडी आणि १५ चेंडू राखून हिंदुस्थानी स्पोर्ट क्लब इलेव्हन संघ विजयी झाला यामुळे मैदानात संघाच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. अष्टपैलू खेळाडू राकेश बच्छाव हा सामनावीर तसेच संपुर्ण लीगचा मालिकावीरही ठरला त्याला मान्यवरांच्या हस्ते चषक देण्यात आले.हिंदुस्थानी स्पोर्ट क्लब इलेव्हन संघाचे कप्तान मोहन रौंदळ,शरद निकम,नंदकिशोर बच्छाव,राकेश बच्छाव,केतन निकम,योगेश बोरसे,सचिन वाघ,प्रमोद पवार तसेच संघातील सर्व खेळाडूंनी या विजयात मोलाची भूमिका बजावली.प्रथम विजेता हिंदुस्थानी स्पोर्ट क्लब इलेव्हन संघास ५१ हजारांचे प्रथम पारितोषिक व चषक तर उपविजेता प्रितेश इलेव्हन संघास ११ हजारांचे द्वितीय पारितोषिक देण्यात आले यावेळी बेजचे माजी उपसरपंच नितीन पवार,नरेंद्र वाघ,प्रकाश खैरनार रमेश खैरनार,दीपक पवार,समाधान पवार,पोपट निकम जयेश पवार,बाळासाहेब खैरनार,कळवणचे नगरसेवक जयेश पगार आदी उपस्थित होते.क्रिकेट स्पर्धेचे सामने बघण्यासाठी नवी बेज पंचक्रोशीतील तसेच कळवण तालुक्यातील सर्व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here