केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या युट्युब/ वेबसाईटचे प्रसारण थांबविले

0

दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गुप्तचर संस्था यांच्यातील अंतर्गत समन्वयीत कारवाईअंतर्गत, मंत्रालयाने, इंटरनेटवर भारत-विरोधी अपप्रचार केल्याबद्दल आणि चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल यू ट्यूबवरील 20 वाहिन्या आणि 2 संकेतस्थळांच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.यू ट्यूब वरील 20 वाहिन्यांसाठी एक आणि वृत्तसंबंधी संकेतस्थळांसाठी एक अशा दोन स्वतंत्र आदेशान्वये इंटरनेट सेवा पुरवठादारांना या वाहिन्या आणि संकेतस्थळांच्या भारतातील प्रसारणावर बंदी घालण्याचा आदेश देण्याची विनंती दूरसंचार विभागाकडे करण्यात आली आहे.या वाहिन्या आणि संकेतस्थळे, पाकिस्तानातून समन्वयीत अपप्रचार षडयंत्र चालविणाऱ्या लोकांच्या मालकीच्या असून ते भारताशी संबंधित संवेदनशील विषयांबाबत चुकीच्या बातम्या पसरवत होत्या. काश्मीर, भारतीय लष्कर, भारतातील अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, जनरल बिपीन रावत इत्यादींसारख्या विषयांवर फुट पाडणारे साहित्य प्रसारित करण्यासाठी या वाहिन्यांचा वापर केला जात होता. हा सर्व प्रकार नया पाकिस्तान नावाच्या पाकिस्तानातून चालविल्या जाणाऱ्या गटाच्या अनेक यू ट्यूब वाहिन्यांच्या संपर्क जाळ्याचा वापर करून आणि या गटाशी संबंध नसलेल्या काही स्वतंत्र यू ट्यूब वाहिन्यांच्या मार्फत सुरु होता. या वाहिन्यांची एकूण ग्राहक संख्या ३५ लाखांहून अधिक तर त्यांचे 55 कोटींहून अधिक प्रेक्षक होते. नया पाकिस्तान गटाच्या काही वाहिन्या पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या निवेदकांतर्फे चालविल्या जात होत्या.या यू ट्यूब वाहिन्यांनी शेतकरी आंदोलन, नागरिकत्व सुधारणा कायदा इत्यादी घडामोडींबद्दल टिप्पण्या प्रसारित केल्या आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांना भारत सरकारविरुध्द भडकविण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या लोकशाही प्रक्रियेत बाधा आणणारे साहित्य या यू ट्यूब वाहिन्यांनी प्रसारित केले असण्याची भीती व्यक्त होत आहे.भारतातील माहितीविषयक अवकाश सुरक्षित ठेवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही  कारवाई केली आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमांसाठी नैतिक कोड) नियम, 2021 अन्वये देण्यात आलेल्या आपत्कालीन अधिकारांचा वापर केला. प्रसारित मजकूरापैकी बहुतांश साहित्य राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील होते आणि वस्तुतः चुकीचे होते. तसेच ते मुख्यतः पाकिस्तानातून प्रसारित केल्या गेलेल्या भारतविरोधी समन्वयीत अपप्रचार षडयंत्राचा भाग होते (नया पाकिस्तान गटाच्या बाबतीत.)म्हणूनच या वाहिन्या आपत्कालीन बंदीसाठी असलेल्या कायद्यातील तरतुदींनुसार बंदी घालण्यासाठी योग्य ठरल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here