20 नोव्हेबर हा दिवस ‘प्रबोधन दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय

0

मनमाड : महाराष्ट्रातील जेष्ठ पुरोगामी कार्यकर्ते, प्रगत विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ प्रा.रणजित परदेशी यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी २० नोव्हेबर हा दिवस ‘प्रबोधन दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय प्रा.रणजित परदेशी यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या कार्यकर्ते व माजी विद्यार्थी यांच्या सिन्नर येथे दि.२ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी प्रा.रणजित परदेशी कृतज्ञता सोहळा समिती गठीत करण्यात आली.महाराष्ट्रातील जातीव्यवस्था अंत चळवळ आणि प्रबोधनामध्ये प्रा.रणजित परदेशी यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, एक गाव एक पाणवठा, महात्मा फुले बदनामीचा विरोध, मंडल आयोग समर्थन चळवळ, आणीबाणी विरोध, शिक्षण अधिकार आंदोलन, शेतमाल भाव आंदोलन या सारख्या असंख्य चळवळ आणि आंदोलनाला मार्गदर्शन करण्याचे काम गेली ४० वर्ष पेक्षा जास्त काळ प्रा.रणजित परदेशी यांनी केले आहे. याच बरोबर दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य सभा, विद्रोही सांस्कृतिक चळवळ अशा कला साहित्य आणि सांस्कृतिक आंदोलनांना संघटित करण्यामागे रणजित परदेशी यांचे योगदान महत्त्वपुर्ण राहिले आहे. याच बरोबर समाजशास्त्रीय संशोधनात सहभागी संशोधन पद्धती विकसित करण्याचे एक महत्त्वपूर्ण काम प्रा. परदेशी यांनी केले आहे. काळा मारुती रोड, येवला येथील प्रा.रणजित परदेशी यांचे निवासस्थान हे पुरोगामी कार्यकर्ते घडविणारा कारखाना म्हणून महाराष्ट्र भर ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्र सेवा दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, दलित-आदिवाशी-ग्रामिण संयुक्त महासभा, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक जन आंदोलन, सत्यशोधक कष्टकरी महिला सभा, सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक युवक आघाडी, सत्यशोधक ग्रामीण सभा, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, शेतकरी संघटना आदी संघटना, पक्ष, आघाड्या मध्ये कार्यरत आहेत.प्रा. रणजित परदेशी यांच्या योगदानाची योग्य दखल घेऊन त्याचा यथोचित सत्कार व्हावा या करिता २० नोव्हेंबर रोजी प्रबोधन दिन साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निमित्ताने भारतीय राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्षता’ या मूल्याची समग्र चर्चा घडवून आणण्याच्या हेतूने एक ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रंथाच्या संपादनासाठी डॉ. गोपाल गुरु आणि डॉ. सुहास पळशीकर यांना विनंती करण्याचे ठरले तसेच या समारंभा निमित्ताने प्रा रणजित परदेशी गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे याच बरोबर प्रा रणजित परदेशी यांच्या समग्र लेखनाचे एका ग्रंथ रूपात पुनर्प्रकाशन करण्यात येणार आहे.
सदर बैठकीस संजय गांगुर्डे (येवला), समाधान घोडेस्वार (दिंडोरी), यशवंत बागुल (मनमाड), अर्जुन बागुल (मनमाड), नितीन हिरे (कल्याण), प्रकाश वाघ (पालघर), राजेंद्र जाधव, विजया दुर्धवळे (सिन्नर), नितीन स़सारे, अरविंद संसारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here