तोकडे कपडे घातले म्हणून प्रेमी युगुलांना मारहाण करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी केले गजाआड

0

मुंबई : ( प्रतिनिधी: अवधुत सावंत) तोकडे कपडे घातल्याचा वाद घालून मलंग गडच्या पायथ्याशी फिरायला गेलेल्या दोन प्रेमी युगुलांना तेथील टवाळखोरांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची नुकतीच घटना घडली होती. तर हे टवाळखोर तरुण इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला होता. या गुन्ह्यातील त्या ५ जणांच्या टोळक्याला हिल-लाईन पोलिसांनी अटक केली आहे. यातील ५ पैकी ३ आरोपी अल्पवयीन आहेत. अशी माहिती झोन – ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.त्याबाबत माहिती देताना झोन-४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले की रविवारी संध्याकाळच्या सुमारास उल्हासनगर परिसरात राहणारे दोन तरुण, आपल्या मैत्रिणीला घेऊन मलंगगडाच्या नजीक असलेल्या कुशवली गावाच्या हद्दीत निर्जनस्थळी गेले होते. त्यावेळी कुशवली गावातील ५ जणांचे टोळके अचानक येऊन या तरुण-तरुणींना ‘तोकडे कपडे का घातले’, याचा जाब विचारून चौघांनांही काठीने बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. शिवाय दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला होता. या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा हिल-लाईन पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला होता. खबऱ्यां मार्फत आरोपीपर्यंत पोहचले पोलीस घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडित तरुणाने दिलेल्या आरोपींचे वर्णन आणि परिसरातील गावात खबऱ्यांचे जाळे पसरवून पोलीस त्या आरोपीपर्यंत पोहचले. पाचही आरोपी आदिवासी समाजाचे असून, मजुरीकाम करणारे आहेत. या पाच पैकी २ आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. तर बाकीच्या ३ अल्पवयीन जणांची भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे असे हिल लाईन पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here