कर्ज देणार्‍या बँकेनेच केली चक्क कर्जदाराची आर्थिक फसवणूक

0

मुंबई – प्रतिनिधी: अवधुत सावंत: मुंबईतील उद्योजकालाच संगमनेरातील जागा बिनशेतीची भासवून केली विक्री. देशभरातून विविध घोटाळे, आर्थिक फसवणूकीच्या वेगवेगळ्या बातम्या आणि प्रकार समोर येत असतानाच आता संगमनेरातून मात्र फसवणूकीचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. मुंबईतील आपल्या उद्योगासाठी बँकेकडून अर्थपुरवठा घेणार्‍या कर्जदाराला ‘त्या’ बँकेनेच संगमनेरात जप्त केलेला प्रकल्प दाखवून तो घेण्यास भाग पाडले. त्यासाठी संगमनेरातील दुय्यम नोंदणी कार्यालयात सदरचा प्रकल्प बिनशेती केलेल्या जमीनीवर असल्याचे भासवून व तशी कागदपत्रे करुन संबंधित कर्जदाराची तब्बल ६४ लाख रुपयांची फसवणूक केल्याने मुंबईतील नितीन अंबादास पिसे या उद्योजकाने महानगर बँकेच्या मुंबई शाखेचा व्यवस्थापक पंढरीनाथ तराळ व संगमनेरात खरेदी खत करुन देणारा बँकेचा दलाल ज्ञानदेव सुराजी मते या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेनेच आपल्या कर्जदाराची फसवणूक करण्याचा हा प्रकार बहुधा राज्यात पहिल्यांदाच ठरण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बँकींग विश्वात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नवी मुंबईत राहणार्‍या नितीन अंबादास पिसे या कागदी पिशव्या तयार करणार्‍या उद्योजकाने २०१५ साली त्यांच्या व्यवसायातील उत्पादन वृद्धीसाठी नवीन युनिट घेण्यासाठी ‘दि महानगर को-ऑप बँके’च्या तुर्भे (मुंबई) शाखेकडे कर्जमागणी केली होती. त्यांच्या अर्जानुसार सदर बँकेने जानेवारी २०१६ मध्ये त्यांचे बारा लाख रुपये मागणीचे कर्ज प्रकरण मंजूर केले व त्यानुसार कर्जदाराच्या दोन वेगवेगळ्या खात्यात प्रत्येकी सहा लाख याप्रमाणे १२ लाख रुपयांची रक्कमही बँकेकडून वर्ग करण्यात आली. मात्र तरीही कर्जदाराला आपल्याच खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम तांत्रिक कारणांनी काढता येत नव्हती.याबाबत तुर्भे येथील बँकेत विचारणा केली असता तेथील व्यवस्थापकाने तुमचे खाते चालू खात्याच्या श्रेणीतील असल्याने तुम्हांला पैसे काढता येत नाही, त्यासाठी तुम्हाला कॅश क्रेडीट खाते उघडावे लागेल असे सांगितले. या सर्व घडामोडीत पंधरा दिवसांचा कालावधी गेला असतानाच ‘महानगर बँके’च्या तुर्भे शाखेचा व्यवस्थापक पंढरीनाथ तराळ याने संबंधित कर्जदाराला फोन करुन ‘तुमच्यासाठी एक चांगली ऑफर’ असल्याचे सांगत त्यांना तातडीने बँकेत बोलावले. सदर कर्जदार बँकेत गेला असता व्यवस्थापकाने संगमनेर (जि.अहमदनगर) येथील कागदी बॉक्स बनविण्याचा एक कारखाना आम्ही थकबाकी पोटी जप्त केलेला असल्याचे त्यांना सांगत आपल्या लॅपटॉपवर तो कारखाना व तेथे सुरु असलेले कागदी खोक्यांचे उत्पादनही त्यांना दाखवले. मात्र आपण आत्ताच तुमच्या बँकेकडून १२ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगत नितीन पिसे यांनी सदर कारखाना घेण्यास असमर्थतता दर्शविली.मात्र ‘हा बकरा फसवायचाच’ असा चंग बांधलेल्या ‘महानगर बँके’च्या व्यवस्थापकाने पिसे यांना बँकेचे तत्कालीन चेअरमन दिवंगत गुलाबराव शेळके यांच्या दालनात नेवून त्यांच्याशी भेट घडवून आणली. त्यांच्याकडून संबंधित कर्जदाराला तशीच ऑफर देण्यात आली. मात्र आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत आपले घर गाठले. मात्र त्यानंतरही ‘महानगर बँके’कडून मंजूर झालेल्या १२ लाख रुपये कर्जाची रक्कम मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा बँकेत जावून चौकशी केली असता बँकेच्या व्यवस्थापकाने पुन्हा संगमनेरचा कारखाना घेण्याचा आग्रह सुरु केला. तो मान्य करुन नितीन पिसे यांनी सदरचा कारखाना ६५ लाख रुपयांत घेण्याची तयारी दाखवली. त्यानंतर व्यवस्थापक तराळे याने लागलीच ज्ञानदेव सुराजी मते (रा. ठाणे) या दलालाशी त्यांची ओळख करुन देत ही व्यक्ती संगमनेरला तुमच्यासोबत येईल व खरेदीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन देईल असे सांगितले.त्यानुसार नव्याने कर्ज प्रकरणासाठी नितीन पिसे यांच्या नावाने तीन बँक खाती उघडण्यात आली. ९ मार्च २०१६ रोजी कर्जदार नितीन पिसे व बँकेचा दलाल ज्ञानदेव सुराजी मते दोघेही संगमनेरात आले. मते याने संगमनेरच्या दुय्यम निबंधकांकडे त्यांना विक्रीपत्रासह विक्री प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे तयार केली. त्यानुसार ९ मार्च २०१६ च्या सूचीप्रमाणे सदरची मिळकत बिनशेती नमूद करण्यात आली होती. त्याच दिवशी संबंधित दलालाने सदरच्या मिळकतीचे बँकेच्या नावाने गहाण खतही नोंदवून घेतले. त्याच दिवशी सायंकाळी संगमनेरातील ‘शीतल इंडस्ट्रिज’ ही मिळकत नितीन पिसे यांच्या नावावर होवून त्यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वर्ग झाली व लागलीच ती बँकेने मिळकतीच्या पोटी वळवूनही घेतली. यानंतर ऑगस्ट २०१९ पर्यंत नितीन पिसे यांनी ती कंपनी चालविली. मात्र डिसेंबर २०१८ मध्ये त्यांना संगमनेर तहसील कार्यालयाकडून नोटीस बजावल्याने सदरची जागा अनधिकृत बिनशेती असल्याचे त्यांना समजले. त्यापोटी थकीत महसुलाचीही मागणी करण्यात आली होती.याबाबत संशय बळावल्याने नितीन पिसे यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन त्या जमिनीबाबतची माहिती मिळविली असता सदरची जमीन शेतजमीन असतानाही बँकेचा व्यवस्थापक पंढरीनाथ तराळे व दलाल ज्ञानदेव मते यांनी सदरची जमीन बिनशेती भासवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत बँकेत जावून विचारणा केली असता व्यवस्थापकाने त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर नितीन पिसे यांनी संगमनेर गाठून ‘दि महानगर को. ऑप बँके’च्या तुर्भे शाखेचा व्यवस्थापक पंढरीनाथ तराळ (रा. ऐरोली, नवी मुंबई) व दलाल ज्ञानदेव सुराजी मते (रा. ठाणे) या दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संगमनेर शहर पोलिसांनी वरील दोघांविरोधात भा.दं.वि. कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने राज्याच्या बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली असून बँकेनेच आपल्या कर्जदाराची फसवणूक करण्याचा राज्यातील बहुधा हा पहिलाच प्रकार समोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here