नॉन कोविड गर्भवती महिलांचे पटवर्धन हॉस्पीटलमध्ये होणार ‘बाळंतपण’

0

पनवेल- कोविड साथीचा नॉन कोविड गर्भवती महिलांच्या बाळंतपणावर विपरित परिणाम जाणवू लागला असून जागेअभावी पनवेल उपजिल्हा रूग्णालयात विनामुल्य होणार्‍या नैसर्गिक आणि शस्त्रक्रियेच्या बाळंतपणाला ‘ब्रेक’ लागला होता. पनवेल संघर्ष समितीने पाठपुरावा करून पुन्हा एकदा गरीब, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या गर्भवती महिलांचे बाळंतपण मोफत करण्यासाठी तगादा लावला होता. त्याला अखेर यश आले असून यापुढे डॉ. पटवर्धन हॉस्पीटलमध्ये उपजिल्हा रूग्णालयामार्फत ही व्यवस्था करण्यात आली आहे.कोविडच्या दुसर्‍या लाटेचा नॉन कोविड गर्भवती मातांच्या बाळंतपणाला मोठा अडसर ठरला आहे. विशेषतः गरीब, आदिवासी, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील गर्भवती महिलांना विनामुल्य बाळंतपण करण्याची व्यवस्था फक्त पनवेल उपजिल्हा रूग्णालयात होती. पनवेलनंतर ही सुविधा मुंबईत उपलब्ध आहे. स्थानिक आणि पनवेलच्या विशेषतः ग्रामीण भागातील, आदिवासी पाड्या, वस्त्या, झोपडपट्टी विभागातील नॉन कोविड गर्भवतींना पनवेल उपजिल्हा रूग्णालय अगदी जवळचे, हक्काचे आणि विश्‍वासाचे वाटत होते. मात्र, पहिल्या लाटेप्रमाणे दुसर्‍या लाटेनेही ती सुविधा अडचणीत आणली आहे.पनवेल उपजिल्हा रूग्णालयात कोविडचे रूग्ण वाढल्याने बाळंतपणाचा विभाग अचानक बंद करण्याचा निर्णय हॉस्पीटल प्रशासनाने घेतल्यानंतर अनेक गर्भवती महिलांची गैरसोय झाली. नॉन कोविड गर्भवती महिलांना हॉस्पीटल प्रशासनाने कामोठे एमजीएमचा मार्ग दाखविला. परंतु, तिथे विनामुल्य उपचार होत नसल्याने अनेकांना पुन्हा आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेवून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी प्रारंभी महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचाक डॉ. गौरी राठोड, तत्कालीन प्रभारी अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे, जिल्हाशल्यचिकित्स डॉ. सुहास माने आदींकडे पाठपुरावा केला. मात्र, गेल्यावर्षी पनवेल संघर्ष समितीने जिल्हाशल्यचिकित्सकांकडून कोळीवाडा येथील महापालिकेच्या इमारतीमध्ये नव्याने संसार थाटून घेत तो विभाग सुरू केला होेता. त्याचा लाभ किमान १५० पेक्षा जास्त महिलांना झाला होता. आता ती इमारत महापालिकेने ताब्यात घेवून लसीकरण केंद्र सुरू केल्याने बाळंतपणासाठी जागेची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यावर आता मार्ग काढण्यात आला आहे.
पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आतापर्यंत कोविडबाधित ६ गर्भवतींची यशस्वी बाळंतपणे करण्यात आली आहेत. आता डॉ. पटवर्धन हॉस्पीटलमध्ये उपजिल्हा रूग्णालयात नॉन कोविड गर्भवती मातांचे बाळंतपण करण्यात येणार असून प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली डॉ. स्वाती नाईक आणि डॉ. प्रियांका म्हात्रे यांनी केंद्र सुरू केले आहे.
पनवेल संघर्ष समितीने सुरू करून घेतलेल्या या नॉन कोविड गर्भवती माता प्रसुती केंद्रामुळे पुन्हा एकदा गरीब, गरजू, आदिवासी, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला मोठा आधार ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here