देवळा : सद्या कृषी पंपाच्या थकीत वीज बीलांचा प्रश्न गंभीर बनला आहे. वीज बीलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीतर्फ वीज जोडण्या खंडीत करण्याची मोहीम तालुक्यात सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या वाढल्या आहेत. वाखारी गटाच्या जि.प. सदस्या नूतन आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल आहेर यांनी गुरूवारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन वीज जोडण्या खंडीत न करण्याची मागणी केली.
देवळा तालुक्यात कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली असून उन्हाळी कांद्याचे पीक अंतिम टप्प्यात असतांनाच कृषी पंपाच्या जोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात येत आल्यामुळे पाण्याअभावी हातातोंडाशी आलेले पीक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे तर कोठे रोहीत्र बंद करण्यात येत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पिंपळगाव, खुंटेवाडी,कनकापूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जि.प. सदस्या नूतन आहेर, रायुकॉंचे तालुकाध्यक्ष सुनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश हेकडे, सहाय्यक अभियंता संदीप वराडे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली व वीज जोडण्या खंडित न करण्याची मागणी केली.
यावेळी आबा सावकार, नंदू वाघ,माणिक शिंदे, मोठाभाऊ भामरे आदी शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांकडे वीज बील भरण्यासाठी शेतात अंतिम टप्प्यात असलेला उन्हाळी कांदा काढणी करून तो बाजारात विक्रि केल्यानंतरच पैसे उपलब्ध होणार आहेत. परंतु यासाठी अजून महिनाभराचा कालावधि लागू शकतो.तोपर्यंत वीज कंपनीने शेतकऱ्यांना मुदत द्यावी.
_ सुनिल आहेर ( तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस )