वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: देवळा : कोरोना आजारावर गृह विलगिकरनात असलेले रुग्ण योग्य ती काळजी घेतांना दिसून घेत नसल्याने त्यांच्या हातावर आता होम क्वारंटाईन चा शिक्का मारण्यात येणार असून असे रुग्ण बाहेर फिरतांना दिसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी देवळा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी डॉ. मांडगे यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजना या बाबत माहिती दिली.तालुक्यात दि. १७ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार तालुक्यात २४३ रुग्ण कोरोना आजारावर उपचार घेत असून यापैकी २२६ रुग्ण हे गृह विलगिकरनात असून घरीच उपचार घेत आहेत. घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना पाच दिवसाचे मेडिसिन दिले जाते व त्या नंतर १४ दिवस त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये अशा सूचना देण्यात येतात. मात्र, हे रुग्ण अवघ्या पाच दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी वावरतांना दिसून येतात, यामुळे कोरोना संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता असल्याने या रुग्णांच्या हातावर होम क्वारंटाईन चा शिक्का मारण्यात येणार असून, हातावर शिक्का असलेला व्यक्ती बाहेर फिरतांना दिसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मांडगे यांनी दिली.नागरिकांना लस घेण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज भासू नये व एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये म्हणून खर्डा, मेशी, खामखेडा, दहिवड, लोहणेर व ग्रामीण रुग्णालय उमराणे व देवळा येथे सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते ११ या वेळात अँटीजन व आर्टिफिशियल टेस्ट करण्यात येथे तर ९ ते ४ :३० या वेळात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती डॉ. मांडगे यांनी दिली.
आतापर्यंत जवळपास ४७४५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.दहिवड येथे जनता कर्फ्यु तालुक्याला कोरोना चा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. दहिवड येथील तब्बल ५७ नागरिक कोरोना बाधित आढळून आल्यामुळे दहिवड गाव कोरोनाचा हॉट स्पॉट बनला असून तीन दिवस जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.