महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चार गावांची पाणी पुरवठा करणारी पाणी योजना चार दिवसापासून ठप्प

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना जगात नावाजलेली असली तरीही प्रत्यक्षात मात्र गळतीचे प्रमाण थांबत नसल्याने चार गावांना पाणी पुरवठा होत नसल्याने प्राधिकरणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा सर्वांना बघावयास मिळत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली फक्त बिले काढली जातात परंतु समाजसेवेच्या नावाखाली मात्र लाभधारक गावच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाच कामाला लावण्याचा गोरखधंदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला असून याकडे कोणी लक्ष देण्यात का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
तालुक्यातील जानोरी, मोहाडी, जऊळके-दिंडोरी व निफाड तालुक्यातील ओझर या गावांना जोडणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने वरील गावाला होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसापासून बंद आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे . महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ओझर सह तालुक्यातील चार गावांना पालखेड धरणातून पाणी पुरवठा केला जातो परंतु या योजनेची मुख्य पाईपलाईनला चार दिवसापूर्वी गळती लागली त्यामुळे ओझर शहरासह जानोरी, मोहाडी , जऊळके-दिंडोरी या गावांना होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसापासून ठप्प झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सदर पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून चार दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अपयश आलेले आहे. गळतीसाठी स्वतंत्र यंत्रणा व टेंडर पध्दत असली तरी ती फक्त बिले अदा करून घेण्यासाठीच आहे का? असा सवाल होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून संबंधित गावच्या नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी स्वत: लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मुख्य जलवाहिनीचे काम त्वरीत दुरुस्त करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी लाभार्थी गावातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here