संपुर्ण भारत देशाचे थोर महापुरुष…घटनाकार… क्रांतिकारक… अर्थतज्ञ.. प.पु डॉ.बाबासाहेब आंबेडकर

0

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचेच नाही तर भारत देशातील प्रत्येक जाती धर्मातील समाजाचे सर्वार्थाने समाजसुधारक असे परीवारप्रमुख होते.समाजातून त्यांच्या उच्चवर्णीयांकडून सतत होणारी पिळवणूक ,छळवणूक , मानहानी मुकाटपणे सहन करणारा हा दलित खरोखरंच महान पुरुष होता. पिढ्यानपिढ्या अन्यायचक्र दलित समाजाभोवती अखंडपणे अविरत फिरत होते.त्यांच्या भ्रमणात दलित समाज भरडला जात होता.पण त्याबद्दल खुद्द दलित बांधवांना देखील चीड येत नव्हती.अशा या निद्रिस्त दलित समाजाला जागृत करण्याचे महान कार्य आंबेडकरांनी केले.अशा या दलित समाज सुधारकाचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी एका दलित कुटुंबात झाला.त्यांचे नांव भीमराव होते.त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात होते.अत्यंत हुशार व चाणाक्ष अशा या मुलावर केवळ जन्मामुळे तत्कालीन समाजाने शिक्का मारला होता “अस्पृश्य” म्हणुन. शाळेत , महाविद्यालयांत आणि भावी आयुष्यात या शिक्क्याने त्यांचा अनेकदा मानभंग केला होता.क्रीत्येक वेळा त्यांच्या रास्त हक्कांसाठी त्यांना वंचित केले जात होते.शिक्षण घेतांना त्यांना अनेक अडचणी , प्रसंगी मानहानी , अपमान सहन करावा लागला पण परिस्थितीला न डगमगता त्यांनी मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने सतत अभ्यास केला.त्यांच्यावर वरदहस्त असणारे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक सहाय्यावर ते (बी. ए.) झाले. नंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले.तेथे त्यांनी (एम.ए.) व (पी.एच.डी.) अशा दोन पदव्या संपादन केल्या.त्यानंतर ते इंग्लंड ला गेले तेथे ते बँरिस्टर ची परीक्षा उत्तीर्ण झाले. कायदेपंडित म्हणुन जगांत त्यांनी नावलौकिक मिळविला. सिडनेहॅम महाविद्यालयांत ते काही काळ प्राध्यापक होते.आपल्या दलित समाजाला मिळणाऱ्या हीन दर्जाच्या वागणुकीमुळे व्यथित झालेल्या आंबेडकरांनी आपल्या दलित समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला.त्यासाठी त्यांनी २० जुलै १९२४ रोजी “बहिष्कृत हितकारिणी सभा” ही संस्था स्थापन केली व ते दलितांचे थोर नेते बनले. शिकवा , चेतवा आणि संघटित करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. डॉ आंबेडकरांनी आपल्या दलित समाजाच्या उद्धारासाठी हाती घेतलेले काम फ़ार अवघड स्वरूपाचे होते.आपल्या भरकटलेल्या समाजाला एक नवी दिशा दाखवायची होती, निद्रिस्त समाजाला जागृत करायचे होते , त्यांच्यात अस्मिता फुलवायची होती , नवचैतन्य निर्माण करायचे होते.जुन्या बुरसटलेल्या रुढींचे पाश तोडण्यासाठी ते मुक्त समाजाचे नायक (मूकनायक ) झाले. “वाचाल तर वाचाल ” या थोर संदेशामार्फत त्यांनी असंख्य अशिक्षितांना सुखी जीवनाचा मार्ग दाखविला.ठिकठिकाणी वसतिगृहे स्थापन करून मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय केली.आपल्या ” बहिष्कृत हितकारिणी सभा” संस्थेअंतर्गत वाचनालये , रात्रीच्या शाळा भरविणे, तरुणांसाठी कला -क्रीडा इत्यादी उपक्रम राबविले.तसेच आंबेडकरांनी “द पीपल्स एज्युकेशन सोसायटी ” ही संस्था स्थापन करून मुंबईत “सिद्धार्थ महाविद्यालय” व औरंगाबाद येथे “मिलिंद विद्यालय” या संस्था काढल्या.आपल्या दलित बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तलावातील पाणी दलितांना भरता यावे म्हणुन सन १९२७ मध्ये महाड येथे अन्यायाविरुद्ध अहिंसक सत्याग्रह करून पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला.तसेच अस्पृश्य जनतेला मंदिरात प्रवेश मिळावा म्हणुन “काळाराम” मंदिरात सत्याग्रह केला.
डॉ आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळवर काम केले.१९४२ साली ते केंद्र सरकारात मजूर मंत्री होते. गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणुन उपस्थित राहिले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले.घटनेमध्ये त्यांनी आरक्षणाची तरतूद केली .त्यांनी अतीशुद्र वर्णाच्या लोकांना आरक्षणाची तजवीज केली .१५ टक्के अनुसूचित जाती , ७.५ टक्के अनुसूचित जमाती साठी ३४१ व ३४२ कलम टाकले व इतर मागासवर्गीय साठी ३४० कलमानुसार आयोग नेमण्याची व्यवस्था केली .त्यांनी धारण केलेल्या या विविध पदांवरील त्यांच्या विलक्षण आणि अलौकिक कार्यातुन त्यांची विद्वत्ता व व्यासंग सर्व राष्ट्राला परिचित झाला. आपल्या दलित बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले म्हणुन त्यांना दलित समाजाच्या जागृतीचे जनक म्हणुन संबोधतात. त्यांनी दलितांचे अज्ञान दूर करून त्यांना निर्भयतेने आणि स्वाभिमानाने जगायला शिकविले.त्यांच्या काळात आडाणी लोकानी आंदोलन चालविण्यासाठी बाबासाहेबांना मदत केली , तेव्हा आडाणी लोकं बाबासाहेब यांना विचारायचे “आम्ही या आंदोलनात तुम्हांला मदत करतोय , परंतु यांत आमचा काय फायदा होईल ..? तेव्हा बाबासाहेब त्यांना स्पष्ट शब्दांत सांगायचे ..”की या आंदोलनात तुमचा काहीएक फायदा होणार नाही , परंतु तुमच्या मुलांचा मात्र फायदा नक्की होईल ..” आणि खरंच आज याच आडाणी लोकांच्या मुलांचा फायदा दिसत आहे .आज ते डॉक्टर , इंजिनीअर , वकील , प्राध्यापक , प्रशासकीय अधिकारी , बँक व्यवस्थापक झाले आहेत. डॉक्टर आंबेडकर यांनी केवळ एकट्यानेच उच्चशिक्षण , विदेशी शिक्षण घेतल्यामुळे जे ३३ कोटींना गेली ५००० वर्षे जमले नाही ते एकट्या बाबासाहेबानी केवळ आपल्या शिक्षणाच्या जोरावर ४० वर्षात करून दाखविले.भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लीन -लीथ-गो यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणावर प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब हे म्हणजे ५०० पदवीधरांच्या तोडीचे , क्षमतेचे आहेत म्हणुन त्यावेळी त्यांनी केवळ त्यांच्या सांगण्यावरून १६ मुलांना उच्चशिक्षण साठी विदेशात पाठविण्यासाठी तीन लाख रुपये दिले.डॉ. बाबासाहेबांचे चीन राष्ट्र संदर्भातील धोरण स्पष्ट होते. चीन अतिशय धूर्त राष्ट्र आहे. अशा या धूर्त राष्ट्राबाबत गाफील राहुन चालणार नाही. इतकंच नव्हे तर आपल्या प्रगतशील भारत देशाने चीनशी मैत्री करण्याचा देखील प्रयत्न करू नये असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. कारण भारताने चीन संदर्भात तयार केलेले पंचशील धोरण चर्चेसाठी जेव्हा संसदेत आले होते तेव्हा यां धोरणासाठी चीनकडून अवलंबन होताना दिसत नाही.. चीन जर जनतेवर अन्याय करत असेल तर त्यांना पंचशील धोरण करण्याचा काय अधिकार असे बाबासाहेबांचे मत होते.डॉ आंबेडकरांचा स्वतःचा असा ग्रंथसंग्रह होता.मृत्यू समयी त्यांच्या ग्रंथालयात सुमारे २५ हजार दुर्मिळ ग्रंथ होते.डॉ आंबेडकरांनी गौतम बुद्ध , महात्मा ज्योतीराव फुले व संत कबीर यांना आपला गुरु मानून त्यांची मनोभावे पूजा केली. त्यांच्यामते बुद्ध हा सर्वात मोठा बुद्धीप्रमाणवादी व सर्वात मोठा समाजवादी होता.डॉ आंबेडकरांनी आपल्या असंख्य अनुयायांसह १४ ऑक्टोबर , १९५६ रोजी बौद्धधर्म स्विकारला पण त्यानंतर या देशभक्ताचे, समाजसेवकाचे ६ डिसेंबर, १९५६ रोजी दिल्ली येथे महानिर्वाण झाले.त्यावेळी त्यांचे वय अवघे ६४ वर्षे ७ महिने इतके होते दिल्लीहून त्यांना स्पेशल विमानाने त्यांचा पार्थिव मुंबईत आणण्यात आले त्यांच्या प्रेमापोटी , त्यांच्या अंतिम दर्शनासाठी देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.अल्पशा काळात बौध्द धम्म च्या प्रचारार्थ सम्राट अशोका नंतर कोणाही भारतियापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी.असे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कारकिर्दीत स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात कायदेमंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलित बांधवांमध्ये स्वतःची जाणीव निर्माण करणारे क्रांतिकारक थोर महापुरुष, आयुष्यभर प्रयत्नांची खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र , अर्थशास्त्र , राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवर प्रभुत्व संपादन तसेच दलितांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य समर्पित केले. असे हे “भारतरत्न ” डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम …धन्यवाद महेश्वर भिकाजी तेटांबे ,सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार ,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here