परभणी – ५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री, ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री आणि सर्वाधिक १०५ आमदार असलेला भाजप विरोधी पक्षात ही केवळ लोकशाहीची ताकत असून ही किमया करणारे खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भाजप नेत्यांमधून आत्मविश्वास काढून घेतला आहे, पराभूत मानसिकतेत भाजप पदवीधरची निवडणूक लढवत आहे, असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात ना. मुंडे बोलत होते.धनंजय मुंडे यांच्या आधी नव्यानेच भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंचावर येऊन आपल्या भाषणातून आपल्या व्यथा मांडल्या. श्री गायकवाड यांनी भाजपने अनेक वर्ष आपल्यावर अन्याय केला असून, आता पूर्वीची भाजप उरली नाही, नव्याने आलेल्या नेत्यांनी मला राजकारण शिकवू नये असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली; आपण लवकरच आपल्या मूळ घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचेही श्री गायकवाड यांनी यावेळी जाहीर केले.भाजपला धनंजय, जयसिंग यांच्यातले ‘जय’ आजकाल चालत नाहीत, त्यांना गोपीनाथ, एकनाथ यांच्यातले ‘नाथ’ही चालले नाहीत त्यामुळे भाजपला प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे असे धनंजय मुंडे म्हणाले.सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय येथील सभेत अनेक दिवसानंतर एका मंचावर आलेल्या मुंडे – गायकवाड यांच्या राजकीय जुगलबंदीत उपस्थितांना समर्पक शेरोशायारी व राजकीय टोलेबाजी ऐकायला मिळाली.या मेळाव्यास ना. मुंडे यांच्यासह माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, परभणीचे खासदार संजय जाधव, खा. डॉ. फौजिया खान, आ. विक्रम काळे, आ.अमोल मिटकरी, मा.आ.बाबाजानी दुराणी, मा.आ.मधुसूदन केंद्रे, मा.खा.तुकाराम रेंगे, मा.आ.विजय भांबळे, मा.आ.ज्ञानोबा गायकवाड, परभणीच्या महापौर सौ.अनिता सोनकांबळे, माजी महापौर प्रताप देशमुख, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, तीनही पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते तसेच पदवीधर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठवाडा पदवीधर ची निवडणूक लढण्याआधीच भाजप पराभूत मानसिकतेत असून, ३५ उमेदवार रिंगणात असताना आपल्यातील बंडाळी शमवण्यापेक्षा भाजप नेतृत्वांनी सतीश चव्हाण या नावाचे उमेदवार उभे करून आपली शक्ती क्षीण झाल्याचे सिद्ध केले आहे. अशा कृतीला सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून आपले प्रत्युत्तर द्यावे व सतीश चव्हाण यांना विक्रमी मतांनी विजयी करून हॅट्ट्रिक साधावी असे आवाहनही उपस्थितांना केले.
Home Breaking News महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून पवार साहेबांनी लोकशाहीची ताकत दाखवून दिली –...