अजिंठ्यातील ऐतिहासिक इमारत पाडण्याचा घाट

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :विनोद हिंगमीरे ) -सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या आवारात असलेली निजामकालीन ऐतिहासिक इमारत पाडून तेथे खेळण्यासाठी मैदान बनविण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समिती व अजिंठा ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे औरंगाबाद जिल्हा परिषदेकडे केली आहे. या प्रकारचे वृत्त काही वर्तमान पत्रात झळकताच इतिहासप्रेमीत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. जाणून-बुजून हा अजिंठ्याचा इतिहासच नष्ट करण्याचा घाट काही लोकं घालत असल्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी या निजामकालीन इमारतीत अजिंठा जहागिरीचे तहसील कार्यालय व फौजदारी न्यायालय अस्तित्वात होते. या इमारती समोरच मेजर रॉबर्ट गिल याचे निवास स्थान आहे. हा परिसर काही वर्षापूर्वी भारतीय पुरातत्व विभागामार्फत संरक्षित करण्यात आला होता. या संदर्भात तेथे एक पाटीही लावण्यात आली होती. मात्र पुरातत्व विभागाचे आदेश धाब्यावर बसून मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करीत ही इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी केली जात आहे. हा अजिंठ्याचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा निंदनीय प्रकार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. शाळा भरवण्यासाठी पर्यायी जागेची मागणी करण्याऐवजी
ऐतिहासिक इमारतच जमीनदोस्त करण्याची मागणी करणे हा लज्जास्पद प्रकार सध्या अजिंठ्यात सुरु आहे. गावातील अनेक अंगणवाड्या मुलांवाचून ओस पडल्या आहेत तेथे सुद्धा ही मुले शिकू शकतात. ज्या शाळेत इतिहास संवर्धनाचे धडे द्यायला पाहिजे तेथे अजिंठ्याचा गौरवशाली इतिहास संपवण्याचा घाट घातल्या जातोय.?
20 बाय 30 फुटाच्या जागेत किती मुले खेळणार ?? असा खोचक प्रश्न इतिहास प्रेमी विचारत आहे. गावातील अतिक्रमणे पाडण्याचा ठराव घेण्याची हिम्मत नसलेल्या ग्रामपंचायतीने ऐतिहासिक इमारत पाडण्याचा ठराव घेणे हा जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या अजिंठा नावाला काळीमा फासणारा प्रकार आहे. 293 वर्षापूर्वीची इमारत पाडण्यास शाळा एवढी आतुर कशी झाली आहे, हा चौकशीचा विषय झाला आहे. काही लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सदर इमारत पाडून तेथे रस्ता पाडण्याचा डाव असल्याचे एकीकडे खाजगीत बोलल्या जात आहे. तर दुसरीकडे एवढा मोठा प्रकार होत असूनही स्थानिक मात्र गप्पच असल्याने या मागे कुण्या बड्या व्यक्तीचा हात असल्याचे जाणवत आहे. कोणत्याही प्रकारे ही इमारत पाडू नये तसेच सदर इमारतीचे जतन व संवर्धन करून हा ऐतिहासिक वारसा जपवावा अशी मागणी इतिहास प्रेमींकडून होत आहे.
गावच्या कारभाऱ्यांनी हा आततायीपणा करू नये

अजिंठा येथील जि. प.प्रशालेच्या आवारातील इतिहासाची साक्ष असणारी वास्तू असलेल्या ठिकाणीच खेळाचे मैदान बनविण्यासाठी ग्रा.पं. ने ठराव पारित करणे मुळात हास्यास्पद आहे. मुलांचा सर्वागीण विकास करण्याची राजकारण्यांना एवढी तळमळ असेल तर दुसरी जागा शोधली पाहिजे. जागतिक वारसा असणाऱ्या वास्तूंचे संरक्षण आणि संगोपन करण्याची जबाबदारी जशी शासनाच्या पुरातत्व विभागाची असते, तशीच ती गावच्या कारभाऱ्यांची सुद्धा असते.सदरील वास्तू पाडण्याचा आततायीपणा राजकारण्यांनी करू नये. अजिंठ्याच्या बौद्ध लेण्या, पारूची कबर अशासारख्या ऐतिहासिक वास्तूसह सदरील ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची जबाबदारी अजिंठावासीयांचीही आहे. मात्र, येथे जर कुंपनच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागावी?– प्रा. शिवाजी वाठोरे
( प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here