बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी हजारो लिटर पाणी वाया

0

सिल्लोड ( प्रतिनिधी- विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यात गेल्या वर्षी अवकाळी पावसात तालुक्यातील धानोरा शिवारातील वाहून गेलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याची दुरुस्ती केली असती, तर आज लाखो लिटर वाहून जाणारे पाणी अडवता आले असते. परंतु या बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पाणी वाहून जात आहे. परिणामी पाणीटंचाई प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून रबी हंगाम ही धोक्यात आहे.गेल्या वर्षी तालुक्यात तब्बल 23 दिवस अवकाळी पाऊस झाला. यामुळे जलसाठे ओव्हरफ्लो झाले. नदी- नाल्यांना पूर आला. यात पूर्णा नदीला मोठा पूर आल्याने धानोरा शिवारात लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला कोल्हापूरी बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेली. यामुळे गेल्या वर्षी ही लाखो लिटर पाणी वाहून गेले. या नदीपात्रात पळशी, धानोरा, वांजोळा, सिसारखेडा, गणेश पांढरी आदी गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय नदीला लागून शेकडो शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती ओलिताखाली आहे. बंधारा वाहून गेल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांनी दुरस्तीची मागणी केली होती. या अनुषंगाने सिंचन विभागाने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. परंतु या दुरुस्तीकडे अद्याप संबधीत विभागाने लक्ष दिलेले नाही. परिणामी दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात असून मागणी करुण ही बंधारा दुरुस्त करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.तालुक्यात यंदा ही पावसाची मेहेरबानी राहिली. यामुळे बहुतांश जलसाठे ओव्हरफ्लो झाले. पूर्णा नदी दोन महिन्यांपासून मनसोक्त वाहत आहे. पाण्याची आवक कमी झाली की, शेतकरी लोखंडी दरवाजे बसवून पाणी अडवतात. ज्याचा फायदा पाणीटंचाई व रबी हंगामाला होतो. परंतु बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पाणीटंचाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून रबी हंगाम ही धोक्यात आला आहे.
धानोरा, काकडेवाडी येथील अनेक शेतकऱ्यांची शेत जमीन ही पूर्णा नदीच्या बाजुला आहे. यामुळे याच बंधाऱ्यावरुण जाण्यायेण्याचा रस्ता होता. परंतु बंधाराच वाहून गेल्याने जाण्यायेण्याचा मार्ग ही बंद पडला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी नदीपात्रातून जिव धोक्यात घालून जाणेयेणे करीत आहे. संबधीत विभागाने लक्ष देत तातडीने बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.गेल्या वर्षीच बंधाऱ्याची पाहणी करुण अंदाजपत्रक जिल्हा परिषदला दाखल केले होते. यासाठी पाठपुरावा ही सुरु होता. शिवाय उपकरातून लोखंडी दरवाजे उपलब्ध करुण दिलेले आहे. परंतु कोरोना संसर्गामुळे मंजुरीला अडचण निर्माण झाली. महिनाभरात मंजुरी मिळेल. त्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल.सय्यद साजेद -उपकार्यकारी अभियंता सिंचन विभाग सिल्लोड आम्ही वारंवार पाठपुरावा करुण ही सिंचन विभागाने दखल घेतली नाही. बंधाऱ्याची दुरुस्ती केली गेली असती तर आज लाखो लिटर पाणी वाहून गेले नसते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रबी हंगाम धोक्यात आला आहे.-राधाकृष्ण काकडे ( शेतकरी,धानोरा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here