इंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा ,सुवर्ण मुद्रा -दहावी

0

मनमाड – इंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा
सुवर्ण मुद्रा -दहावी
आपल्या शाळेच्या शतकाच्या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःच्या नावाबरोबरच शाळेचे नाव देखील उज्वल केले अशा विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्याचा अल्पसा प्रयत्न मी *सुवर्णमुद्रा* या या सदरात करत आहे.
जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस वास्तव्यास असेल त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेला ,दांडगा व्यासंग असलेला एवढा मोठा माणूस आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे हा शाळेचाच नव्हे तर आपल्या सर्व आजी, माजी विद्यार्थ्यांचा देखील गौरवच आहे. प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या *अशोकजी नायगावकर* ह्यांच्या विषयी जाणुन घेणार आहोत. अशोक नायगावकर या नावातच संपूर्ण ओळख आली,”सिर्फ नाम ही काफी है.” अशोकजींचा परिचय करून देण्याची माझी पात्रता देखील नाही, ह्याची जाणिव असुन देखील मी हे धाडस करत आहे.
अशोकजींचा जन्म 29 डिसेंबर 1947 रोजी झाला त्यांचे बालपण वाई सारख्या निसर्गरम्य,ऐतिहासिक गावात गेले, स्वाभाविकपणे त्यांच्यावर वाईचे अध्यात्मिक संस्कार झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही वाईत झाले. सहावीत ते मनमाडात येऊन दाखल झाले. त्यांचे ज्येष्ठ बंधू येथे आर एम एस मध्ये नोकरीस होते, सहावी व सातवीचे शिक्षण मराठी शाळेत घेतले फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन आठवीत आपल्या शाळेत आले.
शाळेत संस्कृत हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय होता. ही वाई मधील वास्त्यव्याची पार्श्वभूमी असावी. संस्कृतच्या गानू मॅडम यांचे अशोकजी अत्यंत लाडके विद्यार्थी होते. हे गानू मॅडम यांनी संस्कृत नाटक बसविले होते, या नाटकात महत्त्वाची भूमिका अशोकजींनी पार पाडली होती. अशोकजिंचे चित्रकलेवर उत्तम प्रभुत्व होते. फावल्या वेळात ते सुंदर निसर्ग आणि व्यक्ती चित्र काढत असत, अब्राहम लिंकन यांचे अतिशय हुबेहूब चित्र काढले होते, या साठी अनेकांची वाहवा मिळविली होती. राव सर शाळेत बहिर्शाला व्याख्यानमाला आयोजित करत हयात अनेक नामवंताना एकण्याची संधी मिळाली,त्याचा मोठा प्रभाव पडला. शालेय जीवनातच कविता करण्यास सुरुवात केली या काहीशा विडंबनात्मक होत्या. नमुनेदार विडंबनात्मक काव्य त्यानी व प्रताप सप्रे ह्या मित्राने रचले होते ते म्हणजे,
आगे बढो,
तपकीर ओढो,
जब नाक मे तपकीर हो,
तो डरने की क्या बात है.
विडंबनात्मक कविता करता करता, मनाला भावणाऱ्या कविता देखील त्यांनी शालेय जीवनात केल्या. दहावीत असताना त्यांनी पहिली कविता केली.
“सायंकाळी दूर कुठेतरी
फिरावया जाता,”
ह्या पहिल्या कवितेच्या ओळी आहेत.
पहिल्यावहिल्या कवितेत उदासी होती. त्या काळाचा प्रभाव कवितेवर दिसून येतो, हा काळ म्हणजे 62 च्या चिनी आक्रमणाचा काळ होता.
या विषयी बोलताना अशोकजी म्हणतात शहरात जपानचा तायचुंग हा पिवळसर तांदूळ घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागत, प्रत्येकास दोन किलो तांदूळ मिळे अशोकजी व त्यांच्या भावाने एका दिवसात रांगा लावून सुमारे 24 किलो तांदूळ आणल्याची आठवण सांगितली.शाळेत कवी यशवंत ह्यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम झाल्याचे सांगून, या वातावरणाचा मोठा प्रभाव आपल्या जडण-घडणीवर झाल्याचे ते नमूद करतात. अगदी बालपणी कवितेचे खरे संस्कार आईने केल्याचेही आवर्जून सांगितले, मोरोपंतांच्या आर्या, संतांचे अभंग, व अनेक कविता आईच्या मुखोद्गत होत्या, या संस्काराचा प्रभाव आजही टिकून आहे. आपल्या कवितेतून व्यक्त होणारी सामाजिक जाणीव व अभिसरण याचे आउटकम (outcome ) हा मनमाडचा प्रभाव आहे. मनमाडला जर आलो नसतो तर कदाचित सामाजिक आशयाच्या कविता लिहू शकलो असतो का याची खात्री देता येत नाही हे सांगताना शहरात होणारया राजकीय सभांना आवर्जून गेल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर अनेक सामाजिक जाणिवा पक्क्या झाल्याचेही ते नमूद करतात. त्यांना भावलेल्या तत्कालीन वक्त्यात माजी नगराध्यक्ष डि के पगारे, माजी खा. शांताबाई दाणी, मा.आ माधवराव गायकवाड,मा. खा. दादासाहेब गायकवाड, माधवराव सप्रे ,यांच्या सभांचा ते आवर्जून उल्लेख करतात. सप्रे कॉलनी जरी ब्राह्मणी वळणाची असली तरी सर्व जातीय मित्रांशी ऋणानुबंध होता, या सामाजिक अभिसरणातून अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्याचे त्यांनी बोलून दाखविले. सभा एकताना कोणत्याही विचारधाराचे त्याना वावडे नव्हते.जनसंघ, काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट,अशा सर्व सभा ऐकल्याने वैचारिक बैठक पक्की झाल्याचेही ते नमूद करतात. मनमाडचा चेहरा सर्वसमावेशक असल्याचे सांगून त्याचा देखील आपल्या कवितांवर प्रभाव आहे हे सांगण्यास देखील विसरत नाहीत. मधु लिमये यांना भेटण्यासाठी मुद्दाम स्टेशन वर गेल्याचे त्यांना स्मरते, मनमाडला दीनदयाळ उपाध्याय आले असता त्यांचे बेडिंग खांद्यावर उचलून टांग्यात ठेवल्याचे ते आभिमानाने नमूद करतात. विविध संस्कार या गावाने केले,त्यात बालाजी मंदिरात होणारी कीर्तन देखील मोठा संस्कार करून गेली, थोरले व धाकटे निजामपूरकर महाराज, दशपुत्रे बुवा, आफळे महाराज, आदी कीर्तनकारांचा ते उल्लेख करतात. नंदू,प्रताप व श्रीराम सप्रे ह्या जिवश्च कंठश्च सोबत्यां मुळे मनमाड वास्तव्य आनंददायी गेले हे आवर्जून सांगतात.
मनमाडची सर्वात महत्त्वाची आठवण म्हणजे आपल्या शाळेजवळ मिळणाऱ्या “अमुन्या कमुन्या” ह्याचे वर्णन करताना अशोकजी थकत नाहीत, मनमाडला मिळणाऱ्या अमुन्या कमून्या या जगात कुठेही मिळत नाहीत. मनमाड सोडल्यानंतर साठ वर्षे झाली तरीदेखील ह्यांची आंबट-गोड चव आजदेखील जिभेवर रेंगाळतेय. गेल्या साठ वर्षात खायला न मिळाल्याची खंत व्यक्त करतात. शहराचा आठवडे बाजार, यात्रा, तकतराव देखील ते विसरलेले नाहीत. “घागरी व हंडे घेऊन खांदे तयार झाले तो खरा मनमाडचा माणूस हे सांगताना मी पण मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून खांदे पक्के केल्याचे आवर्जून नमूद करतात. पाणी टंचाई देखील त्यानी विद्यार्थी दशेत कवितेतून व्यक्त केली आहे.
नद्या नाले शुष्क होताच,
विहिरिकडे धाड आहे,
पारोशाने नदी म्हणाली,
किती दिसात ग,न्हाले नाही.
“पर्यटकांना माहित नसलेले, पर्यटनाच्या व्याख्येत न बसणारे वेगळे निसर्ग सौंदर्य असलेले गाव म्हणजे मनमाड” अशी मनमाडची छोटेखानी व्याख्या देखील त्यांनी केली आहे. मनमाड शहरावर छानशी कविता करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला.
अकरावी मॅट्रिक उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्चशिक्षणाची सोय नसल्याने एक वर्ष छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे शिक्षण घेतले व नंतर नाशिकच्या बिटको कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढिल शिक्षणासाठी अशोकजी वाईला आले. वाई येथील विश्वकोश निर्मिती मंडळाच्या ग्रंथालयात त्यांचा भाऊ ग्रंथपाल होता. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा पण ते रमले विश्वकोश मंडळाच्या ग्रंथालयात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, यासारख्या जागतिक विद्वानांची ओळख त्याना झाली. विश्वकोश मंडळात येणाऱ्या विविध साहित्यिकांना जवळून बघता,ऐकता आले,ग्रंथालय समृद्ध होते, जगातील उत्तमोत्तम ग्रंथ व नियतकालिके ग्रंथालयात होती. जगातले सर्व ज्ञान यात होते, मी अक्षरशः तासनतास वाचन करत असे, अभ्यासाची पुस्तके सोडून हाताला येईल ते पुस्तक आधाश्या सारखे वाचून संपवीत असे. कोणताच विषय त्यांनी सोडला नाही. व्यायाम केला नाही पण व्यायाम ज्ञानकोशाचे तीन खंड मात्र वाचून काढले. मराठी व इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथ त्यांना वाचता आले. जेष्ठ साहित्यिकांशी ते ब्रिज खेळत असत. यावरून भावाचा ओरडा खाल्ल्याचे देखील त्यांनी सांगितले . कॉलेजात त्यांनी “कथा कुणाची, व्यथा कुणाला” व “साष्टांग नमस्कार” या दोन नाटकात कामे केली. या दोन्ही नाटकातील अभिनयासाठी पारितोषक मिळवले.परिस्थितीमुळे मात्र पुढे नाटकाचे वेड जोपासता आले नाही याची खंत देखील त्यांना आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत ते नोकरीच्या शोधात आले तेथे मूळचे वाईकर असलेले व “आलोचना” मासिकाचे सहसंपादक प्रा. सुहास बापट यांच्याकडे लेखनिक म्हणून काम करू लागले. आलोचना हे समीक्षेला वाहिलेले नियतकालिक होते, यात साहित्यावर परीक्षणे लिहिली जात असत. वसंत दावततर ल.ग. जोग, दिगंबर पाध्ये, आदी समीक्षकांची याच काळात अशोकजींचा संबंध आला हे सर्व वाड:मय क्षेत्रातील तज्ञ होते. याचा मोठा संस्कार त्यांच्या वर झाला. अशोकजींचा मूळ पिंड हा कवितेचाच राहिला. अशोकजींनी देखील आलोचना मासिकात परीक्षणे लिहिली.तेथे त्यांनी काही गाणी लिहिली
1) मी साश्रु नयनभर
क्षणाक्षणाला कुसुमगंध घट भरते,
मी अवचित मृगया
स्वप्न बनातून वाट वाकडी पळते.
तसेच
2) मोजलेस का आकाशातले तारे किती सांग ?
आभाळ भरून येते तेव्हा धावते छान.
या गाण्यांना प्रा. सुहास बापट यांनी चाल लावली होती. अशा या बहुश्रुत व्यक्तिमत्वाच्या सानिध्याने खूप काही शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. काही महिने एका औषध कंपनीत नोकरी केल्यानंतर, ते बँक ऑफ बडोदा मध्ये रुजू झाले. जवळपास 31 वर्ष सेवा करून त्यांनी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल. एकदा ते कविवर्य नारायण सुर्वे यांना त्यांच्या घरी भेटण्यास गेले, सुर्वे यांना त्यांच्याच कविता तोंडपाठ म्हणून दाखविल्या. मोठ्या मनाच्या सुर्वे यांनी या तरुणाचे व त्याच्या काव्य प्रेमाचे भरभरून कौतुक केले, चिंचपोकळी येथील घरापासून कवितांवर चर्चा करत दादर पर्यंत आले. त्या दिवसापासून अशोकजी सुर्वे यांचे अतिशय लाडके झाले. पुढे काही निमित्ताने विंदा करंदीकरांना भेटण्याचा योग आला आणि अशोकजी मनमाडच्या इंडियन हायस्कूलचे विद्यार्थी आहेत हे समजल्यावर विंदानी कडाडून मिठी मारली, तू माझ्या शाळेचा विद्यार्थी आहे असे म्हणत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. त्या दिवसापासून विन्दांशी स्नेह जमला.
विंदा करंदीकर, सुर्वे, पाडगावकर, शंकर वैद्य, यांना घेऊन महाराष्ट्रात कवितेचे अनेक कार्यक्रम केले, कवितेच्या गावा जावे याचे 1000 पेक्षा देखील अधिक कार्यक्रम झाले. अशोकजी हे पक्के कौटुंबिक आणि अध्यात्मिक पण त्यांच्या अधिकाधिक कविता या सामाजिक आशयाच्या, कवितेत मर्ढेकरी वळणाचे कवी म्हणून ते ओळखले जातात. झापडबंद विचारात अडकून न पडता बहुश्रुत विचारांचे संस्कार झाले असल्याचा हा परिणाम आहे. मराठीमधील काव्यवाचनाची परंपरा ही रविकिरण मंडळापासून आहे, रविकिरण मंडळाच्या परंपरेला छेद देत पाडगावकर, करंदीकर, बापट यांनी वेगळ्या पद्धतीने काव्यवाचनाचे प्रयोग केले, त्यानंतर सर्वाधिक लोकप्रियता लाभलेले कवी अशोकजीच आहेत. काव्यवाचनाचे राज्यातच नव्हे तर देश-विदेशात हजारो प्रयोग झाले. यानिमित्ताने मोठा जागतिक प्रवास झाला, त्यामुळेच त्यांना “कवितेतील मोदी” या नावाने ओळखले जाते. “तुम्हाला म्हणून सांगतो अशी सुरुवात करुन” कविता वाचण्याची त्यांची स्वतःची वेगळी अशी शैली आहे, जोडीला त्यांच्या मिशा देखील सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. जवळपास चाळीस वर्षापासून मिशा ठेवत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. 1993 मधे “वाटेवरच्या कविता” हा काव्यसंग्रह ग्रंथालीने प्रसिद्ध केला.
कोकण मराठी साहित्य संमेलनाचे दोन वेळेस अध्यक्ष झालेले अशोकजी सिंगापूर येथे विश्व मराठी काव्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आपल्याच शाळेचे माजी विद्यार्थी हेमंत केतकर यांच्या “फुले आणि झुले” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यानी केले, शाळेच्या एका सुपुत्राच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दुसऱ्या सुपुत्राने करणे असा दुर्मिळ मणिकांचन योग फार कमी शाळांना लाभातो तो आपल्या शाळेला लाभला आहे. राजकारणापासून दूर राहून आपले छंद जोपासलेले अशोक नायगावकर हे आज देखील कवितेद्वारे सामाजिक भाष्य करण्याचा प्रयत्न करतात. लंडनमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलींच्या भेटीस गेल्यावर आवर्जून महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांचे वास्तव्य असलेल्या घराचे स्मारकात रुपांतर केलेल्या वास्तूला भेट देतात. वास्तु पाशी विसावून त्यांना
“भीमा तुझी सावली,
अंगावर पडली उज्जेड झाली”
या ओळी सुचतात. अशाप्रकारे जातीपातीचे बंध झुगारून देऊन माणसाची खरी ओळख माणूस म्हणून असल्याचे आपल्या कवितेतून नमूद करणारया अशोकजीनी कवितेत वेगवेगळे विषय हाताळले आहेत, विनोदी कविता देखील केल्या आहेत. अरबी समुद्रावरून उत्साहाने येणाऱ्या पावसाचा आपण काळ्या छत्र्या दाखवून निषेध करतो, नंतर पाऊस येत नाही म्हणून बोंबा मारतो असा आशय देखील तेच व्यक्त करू शकतात.
त्याना महाराष्ट्र शासनाचा “केशवसुत पुरस्कार”,मुक्त विद्यापीठ नासिकचा “विशाखा” पुरस्कार,आचार्य आत्रे प्रतिष्ठान सासवडचा पुरस्कार ह्या सह जगदगरु तुकाराम ,आद्यकवी मुकुंद राज ,संत नामदेव, झी टॉकिजचा पहिला स्टॅन्ड अप कॉमेडी असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. झी मराठीच्या हास्य सम्राट मालिकेचे परीक्षक होते.महाराष्ट्र साहित्य संस्क्रुती मंडळ,सांस्कृतिक धोरण समिती,ह्या वर काम केले आहे.लोकसत्ता हास्यरंग पुरवणीचे 9 वर्षे आतिथी संपादक म्हणून काम बघितले आहे
मागील वर्षीपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवडणूक न होता निवड करण्याचा चांगला पायंडा पडला आहे, अशोकजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनतील अशी तमाम मनमाड वासियांनाच नव्हे तर मराठीजनांना आशा व खात्री आहे. त्यांच्या साहित्यिक वाटचालीस आपल्या सर्वां तर्फे हार्दिक शुभेच्छा.
हर्षद रमाकांत गद्रे,
उपशिक्षक
इंडियन हायस्कूल ,मनमाड
प्रतिनिधी,
मुंबई तरुण भारत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here