इंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा सुवर्णमुद्रा नववी

0

मनमाड – शाळेच्या शतकाच्या वाटचालीत शाळेचे सुवर्णयुग म्हणून ओळखल्या जाणारया काळाचे शिल्पकार , शाळेला यशाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा कै.दत्तात्रय विश्वनाथ केतकर सरांच्या कार्याची माहिती शिक्षक दिनाच्या निमित्ताने मिळाने ही खऱ्या अर्थाने अपल्या सर्वाना लाभलेली एक पर्वणीच आहे. केतकर सरांचे शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्मरण करणे या सारखा दुसरा चांगला योग नाही. केतकर सरांच्या कारकिर्दीच्या काळात शाळेचा उल्लेख मनमाडचे ऑक्सफोर्ड असा केला जात असे. आज सुवर्णमुद्रा या माझ्या सदरात मी शाळेचे माजी प्राचार्य सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत कै. द. वि. केतकर यांचा परिचय करून देण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे. केतकर सरांची कारकीर्द माझ्यासारख्या अल्प बुद्धीच्या माणसाच्या आवाक्यात येण्या जोगी नाही, हे ठाऊक असून देखील आज मी हे धाडस करत आहे.
सर्वप्रथम आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
केतकर सरांचे मूळ घराणे साखरपे विशाळगड हे होय. या घराण्यात आठव्या पिढीत केतकर सरांचा जन्म विदर्भात अमरावती येथे १५ ऑक्टोबर १९०६ साली झाला. या घराण्यातील पहिल्या पिढीतील मूळपुरुष विशाळगडावर शिवाजी महाराजांच्या सेवेत एका सैन्य दलाचे प्रमुख होते.
केतकर सरांचे मोठे काका साखरप्याहून अमरावती येथे आले, त्यांच्या मुलाने शिक्षण घेऊन वकिली सुरु केली. पुढे केतकर सरांचे वडील आणि अन्य बंधू भगिनी मिळून सर्वजण अमरावतीला आले. तिथे त्यांच्या वडिलांनी १२- १३ एकर जमीन विकत घेऊन संत्र्याची बाग लावली. ते कोर्टात सामान्य पदावर नोकरीला लागले. त्यांच्या वारंवार बदल्या दर्यापूर, परतवाडा वाशीम अशा अनेक ठिकाणी झाल्या. सामान्य परिस्थितीमुळे केतकर सरांचे लहान पण कुडाच्या घरात गेले. केतकरांच्या वडिलांना विश्वनाथरावांना पहिल्या मुलीचं झाल्या, त्यावेळी टेंबे स्वामी यांचे शिष्य आणि बंधू सीताराम महाराज ब्रह्मचारी हे दत्त संप्रदायाचे प्रसारासाठी बडनेरा येथे आले. त्यांचे निधन झाल्यावर त्यांची समाधी झिरी या ठिकाणी बडनेरा स्टेशन पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर बांधण्यात आली. तिथे एकमुखी दत्ताचे सुंदर मंदिर असून ते स्थान अत्यंत जागरूक समजले जाते.  केतकर सरांच्या वडिलांनी पुत्र प्राप्तीसाठी नवस बोलला आणि तो फळाला आला. सरांचे नाव दत्तात्रेय ठेवण्यात आले. या मंदिरा भोवताली असलेली बारा तेरा एकर जमीन केतकर परिवाराने मंदिराच्या नावे करून दिली.
वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे सरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. पुढे सरांच्या वयाच्या १४ व्या वर्षी वडिलांचे अचानक निधन झाले. पाठीवर भाऊ मोठ्या बहिणी अशा परिस्थितीत अमरावती येथे चुलत भावासोबत एकत्र कुटुंबात होते त्यामुळे निभाव लागला. त्यांनी बी.ए. पूर्ण केले. पण अवघड आर्थिक परिस्थितीमुळे ते मुंबई येथे सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या संस्थेत स्टेनो ग्राफर म्हणून नोकरी करू लागले. तेथे प्रसिद्ध कामगार चळवळीचे नेते नारायण मल्हार जोशी(ना.म.जोशी) यांच्या सहवासात काही प्रमाणात त्यांची घडण झाली. दोघांचे सूर चांगले जुळले. २- ३ वर्षे नोकरीत पैसे साठवून ते परत अमरावतीला परतले. नागपूरला येऊन त्यांनी law कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. विद्यार्थी दशेत प्रखर देशभक्ती मुळे अनेकदा त्यांचे  घोड्यावरून येणाऱ्या ब्रिटिश प्रिन्सिपॉलशी खटके उडायचे. १९३४ साली ते वकिलीची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले, आपल्या बुद्धिमत्तेची चमक त्यांनी दाखविली. मनमाडचे कै. माधवराव सप्रे वकील हे त्यांचे सहाअध्यायी होते. पदवी मिळाल्यानंतर वकिलीला सुरवात करण्याचा त्यांचा मानस होता पण नेमके प्रचंड जागतिक मंदीला प्रारंभ झाला अशा काळात वकिलीचे बस्तान बसविणे अवघड होते.कै. माधवराव सप्रे यांचे वडील कै. रावसाहेब सप्रे यांनी मनमाडमध्ये शाळा काढली होती. माधवरावांनी केतकरांना सुचविले की तात्पुरती एक दोन वर्षे या शाळेत नोकरी करावी आणि मंदी ओसरली की वकिलीला प्रारंभ करावा. तो बेत पसंत पडून केतकर सर मनमाड मध्ये इंडियन हायस्कूल मध्ये लगेच रुजू झाले.
मनमाड सारख्या ठिकाणी इतके उच्च शिक्षित शिक्षक मिळाले यामुळे रावसाहेबांना आनंद झाला. परंतु शाळेची आर्थिक स्थिती उत्तम नव्हती. त्यातच काही महिन्यात आधीचे प्रिन्सिपॉल श्री रानडे सर यांनी एकाएकी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला, ती जबाबदारी पेलण्यास सक्षम म्हणून केतकर सरांची निवड झाली. विपरीत परिस्थितीत केतकर सरांनी अत्यंत काटकसरीने शाळेचे व्यवहार स्वतःच्या संसारासारखे केले. अक्षरशः पाठकोरे कागद वापरले आणि शाळेला बिकट अवस्थेतून बाहेर काढले. त्यामुळे मॅनेजमेंटचा त्यांच्यावरील विश्वास दृढ झाला.त्या काळात शिक्षकांचे वेतन संस्थे मार्फत होत असे राज्यातील अनेक शाळात महिनो महिने वेतन मिळत नसे, नियमित पणे एक तारखेस वेतन देणारया बोटांवर मोजता येईल अशा थोड्य शाळा होत्या त्यात आपली शाळा होती ह्याचे सर्व श्रेय सरांच्या नियोजनाला जाते. कुशल प्रशासक असलेले केतकरसर हे करडया शिस्तीचे होते, आपल्या तत्त्वाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. तत्वा करता वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी असे. दूरदृष्टी लाभलेल्या केतकरसरांनी शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राला दिलेले सर्वात मोठे योगदान म्हणजे आपल्या कारकिर्दीत स्वतःच्या देखरेखीखाली बांधलेले लोकमान्य सभागृह. लोकमान्य हॉल मनमाडच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू समजला जातो. ज्येष्ठ साहित्यिक पु भा भावे, नरहर कुरुंदकर, वि वा शिरवाडकर, यशवंत देव, सुरेश भट, विंदा करंदीकर, दुर्गाताई भागवत,मृणाल गोरे,ह्यांच्या सह अनेक दिग्गजांच्या व्याख्यानाचा हॉल साक्षीदार आहे.
मनमाड मध्ये केतकर सर हे प्रथम चितळे यांच्या चाळीत राहायला आले. त्यानंतर ते गुरुद्वाराच्या शीख चाळीत राहावयास आले. दरम्यान त्यांचे लग्न अकोला येथील गानू कुटुंबातील वत्सला गानू यांच्याशी १९३५ मध्ये झाले. विदर्भाच्या माणसाला स्वतःचे छोटे का होईना घर असावे ही मोठी आस असते आणि या गोष्टीला तो प्रथम प्राधान्य देतो. सरांनी बहुजन वस्तीत एक छोटा प्लॉट घेतला. बऱ्याच कालावधीनंतर १९५० साली मंगलधाम हे छोटेखानी घर उभे राहिले. केतकर सरांची सर्व धर्म आणि जाती याबद्दल समदृष्टी होती त्यामुळे ब्राह्मण वस्तीत न जाता बहुजनांच्या वस्तीत घर बांधण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. कारण कोणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली आपण राहिलो तर स्वतंत्र निर्भीड हितकारी निर्णय घेण्यात अडथळा  येऊ नये हा हेतू होता. याचबरोबर नैतिक अधिष्ठान आचरून त्यांनी सहकार्यांना धडा घालून दिला. प्रिन्सिपॉल असल्याने त्यांनी कधी खाजगी शिकवण्या घेतल्या नाहीत. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या पण त्या त्यांनी सहन केल्या. शाळेच्या दीर्घ व्यवस्थापनात कधी कसोटीचे, दबाव आणणारे प्रसंग निर्माण झाले पण ते त्यांनी निर्भीडता, सचोटी, न्याय बुद्धी या जोरावर निभावून नेले. शाळेच्या व्यवस्थापनाने देखील त्यांच्या कामात ढवळाढवळ केली नाही या मध्ये  व्यवस्थापनाचा समंजसपणा दिसून आला. शाळेत त्यांनी काही नीती, दंडक घालून दिले होते आणि व्यक्तिसापेक्ष  निर्णय न घेता या दंडकांच्या आधारे न्याय्य  निर्णय घेतले जात होते.
शाळेची हळू हळू प्रगती होत गेली. दरम्यान केतकर सरांनी  शिक्षण क्षेत्रात आवश्यक असलेली बी टी ची पदवी धारवाड येथे १९४० साली वर्षभर जाऊन प्राप्त केली.  प्रदीर्घ काळात शाळेच्या इमारतीचा विस्तार आणि अन्य क्रीडा, साहित्य असे उपक्रम चालू झाले. केतकर सर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असत. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे किडकिडीत पण उंच देहयष्टी आणि भेदक डोळ्यांची नजर यामुळे विद्यार्थ्यांवर वचक होता. त्यांनी काही विद्यार्थ्यास शाळा सोडू नका वाटल्यास मी फी भरतो असे सांगून शाळा सोडण्यापासून परावृत्त पण केले. शिस्तीत ते कठोर होते तरी त्यांनी कुणावरही कधी हात उगारला नाही एकच अपवाद सोडला तर! त्याचे असे झाले एक चांगल्या कुटुंबातील विद्यार्थी होता त्याला पेन सारखी किरकोळ चोरी करायची सवय जडली होती. त्याला सरांनी अनेक  वेळा समजावले स्वतः नवीन पेन देखील घेऊन दिला तरी त्याची सवय मोडेना शेवटी त्याला संतापून एकदा थोबाडीत लगावली हा एकमेव प्रसंग.  ते moderator  म्हणून आजूबाजूच्या गावातील शाळांना  तसेच वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून जात असत. कोणत्याही क्रीडा, साहित्य उपक्रमात त्यांना अवश्य अध्यक्ष किंवा वक्ते म्हणून हमखास आमंत्रित केले जायचे. त्यानी शाळेत व्याख्यानमाला सुरु केली होती त्या द्वारे अभ्यासेतर संस्कार ते करत असत.
केतकर सरांना प्राण्यांचे प्रेम होते. मंगलधाम मध्ये गाय, कुत्रा, मांजरी, पोपट, ससे यांची बडदास्त  होती. सात मुले आणि हे प्राणिप्रेम यांनी मंगलधाम गजबजून जायचे. केतकर सरांचे सामान्य माणसांशी संबंध प्रेमाचे होते. घड्याळ  दुरुस्त  करणारा कमरुद्दीन असो किंवा टांगेवाला रंगनाथ असो सर्वाना सर आपले वाटायचे. शाळेत शिकायला नगरचा सुरेश जोशी म्हणून विद्यर्थी होता. तो खेड्यातील अत्यंत गरीब विद्यार्थी होता. केतकर सरांच्या घरात तो मुला प्रमाणे वावरला. त्याची फी पण सर भरत होते. तो होता चिकाटीचा आणि जिज्ञासू आणि पुढे त्याने नगरला ऐतिहासिक संग्रहालय स्थापन केले आणि इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदारांचा तो पट्टशिष्य बनला. पुण्याचे निवृत्त पोलीस कमिशनर जी. एन. उबाळे हे एक मोठे झालेले व्यक्तिमत्व. सरांचे आवडते विद्यार्थी होते. त्यांच्या अनेक विद्यार्थांनी पुढे नाव कमावले. सेवा निवृत्ती नंतर 4 वर्षे कार्यकाल वाढवून मिळालेले (extension) ते एकमेव असावेत. सेवानिवृत्ती प्रसंगी नागरी सत्कार करुन सन्मान पत्र देऊन सरांचा गौरव करण्यात आला होता.
कुशल प्रशासक या व्यतिरिक्त केतकर सरांचे इतर अनेक गुण होते. त्यांचे इंग्लिशवर तसेच इतिहास विषयांवर चिन्तनात्मक प्रभुत्व होते. मराठीमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या अनेक कथा किर्लोस्कर, स्त्री, अमृत आणि त्या अगोदर प्रसिद्ध होणाऱ्या मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या “चांदेकर बाईंचे आईसक्रीम पॉट” आणि “गोड कपट” या कथा विशेष गाजल्या. विदर्भातील काही साहित्यिकांशी त्यांचा संबंध होता. साहित्यिक कै.म. ना. अदवंत हे त्यांचे वर्ग मित्रच, माजी साहित्य समेलनाध्यक्ष कै.वामन चोरघडे ह्यांच्याशी उत्तम स्नेह होता. सरांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यात “इतिहासातील अंतःप्रवाह” (१९५७) हे पुण्याच्या अनाथ विद्यर्थिगृहाने प्रसिद्ध केले. त्यास पुणे विद्यापीठातील प्रोफेसर रा. वि. ओतूरकरांनी प्रस्तावना देतांना म्हटले आहे कि “मनमाड सारख्य तुटक गावात राहून केतकर यांनी हा विषय लिहिला तो पीएचडी च्या थिसीस इतका मोलाचा आहे. इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या नाहीत मानवी प्रेरणातून इतिहासाची, घटनांची निर्मिती कशी होते, त्यापासून पुढे काय शिकता येते याचे वंश शास्त्रीय विवेचन त्यांनी केले.”  त्यांचा दुसरा ग्रंथ “आपली घडण “(१९६५) याला माजी केंद्रीय मंत्री न.वि. तथा काकासाहेब गाडगीळ यांनी प्रस्तावना लिहून केतकर सरांचा गौरव केला. मानवाचा व्यक्ती विकास कसा होतो, त्याच्या जीवनात सामाजिक संबंध कसे सकारात्मक होतील याचे मानस शास्त्रीय विवेचन आहे. केतकर सरांचा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता. आदि शंकराचार्य. उपनिषदे,  बुद्ध, जैन तत्वज्ञान, जे कृष्णमूर्ती, रजनीश यापासून प्लेटो अरिस्टोटल, कान्ट, हेगेल, नित्से आणि मानशास्त्रद्न्य फ्राईड यांचा अभ्यास होता. भारतीय संत वाङ्मयाचा पण अभ्यास होता. त्यांच्या या चतुरस्त्र अभ्यासक वृत्तीमुळे अनेक बुद्धिवंत, प्रज्ञावंत यांच्याशी त्यांचे सख्य ठेऊन होते. आवर्जून सांगावी अशी गोष्ट म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर हे इंडियन हायस्कूल मध्ये त्यांचे शिक्षण झाल्यावर एक वर्ष शिक्षक म्हणून राहिले. ते केतकरांच्या घरी येत तेच “वाहिनी चहा टाका” अशी आरोळी देत. त्यांचे मित्र प्रेम अखेरपर्यंत कायम होते. केतकर सरांच्या अमृत महोस्तवास ते आवर्जून मुंबईहून पुण्यास आले होते. त्याचवेळी पुण्यातील राजा केळकर संग्रहालयाचे श्री केळकर यांनी पण सरांचा विशेष सत्कार केला.  केतकर सरांच्या वृद्धत्वात देखील संत साहित्याचे अभ्यासक कै.यशवंत पाठक सर हे त्यांच्याशी चर्चा करायला येत असत.
अशा रीतीने आपल्या कर्तृत्वाचा सुगंध पसरवत आणि मुलांचे सफल संसार आणि नातवंडे यांचा आनंद त्यांनी पूर्ण उपभोगला.
त्यावेळी ते नाईलाजानेच पुण्यात होते. खरं तर ज्या मनमाड ने त्यांना भरभरून प्रेम, आदर, कीर्ती दिली त्या मनमाड मध्ये शेवटपर्यंत राहण्याची त्यांची खरी खुरी मनीषा होती.
केतकर सरांची मुले सर्व चांगली उच्चशिक्षित झाली आणि वरच्या पदावर कार्यरत होऊन निवृत्त झाली.
25 जुलै 1985 रोजी केतकर सरांचे पुण्यात देहावसान झाले.
मनमाडचे क्षितिज उजळून टाकणारया या अष्टपैलू व्यक्तिमत्वास व महान शिक्षण तज्ञास आज शिक्षक दिनी ही मानवंदना.
हर्षद रमाकांत गद्रे,
उपशिक्षक
इंडियन हायस्कूल ,मनमाड,
वर्ताहार,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here