इंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा* *सुवर्ण मुद्रा- सहावी

0

मनमाड – इंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा*
*सुवर्ण मुद्रा- सहावी*
शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या शाळेने घडवलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने शाळेचा नावलौकिक वाढविला, अशा कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न मी माझ्या *सुवर्ण मुद्रा* या सदरात करून देण्याचा प्रयत्न करतोय.
“प्रवासी कंपनीतील सामान्य कर्मचारी ते बहुराष्ट्रीय कंपनीचा वाईस प्रेसिडेंट अशी फक्त 18 वर्षात भरारी घेतलेला आपला माजी विद्यार्थी *”संदीप जोशी*” याचा आज मी अल्प परिचय करून देत आहे.
आपल्या शाळेत 1981मधे पाचव्या इयत्तेत दाखल झालेल्या संदीपने 87 मध्ये चांगल्या गुणांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण केली. पुढील दोन वर्षे आपल्या शाळेतून अकरावी बारावी विज्ञान शाखेचा अभ्यास केला. नासिक येथे बीसीएस ही पदवी 1992 ला संपादन केली. सतत नवीन शिकण्याची धडपड, काहीतरी करण्याची उर्मी, असलेल्या संदीपने आपल्या नोकरीची सुरुवात नाशिक येथे एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करून केली. काही महिने काम करत असतानाच आपल्याला जर यशाला गवसणी घालायची असेल तर जास्तीत जास्त ज्ञान पदरात पाडून घेणे गरजेचे आहे आणि मेहनतीला पर्याय नाही हे ओळखून तो 1993 ला पुण्यात येऊन दाखल झाला. पुणे हे विद्येचे माहेरघर, संदीप पुण्यात आला तो काळ म्हणजे देशात सॉफ्टवेअर उद्योगाचा सुवर्णकाळ होता. त्याने त्या काळातील नावाजलेल्या एप्टेक कम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधून तीन वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा डिग्री कोर्स पूर्ण केला. सामान्य परिस्थितीतल्या संदीपला शिक्षण तर घ्यायचे होते, पण घरची बेताची परिस्थिती असल्याने त्याने अर्न अँड लर्न या पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एज्यूकेशन लोन घेतले तसेच शिकत असतानाच हडपसर येथील मायक्रोटेक या कंपनीत इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंगचे काम तो करू लागला. त्याला मिळणारे वेतन अतिशय तुटपुंजे म्हणजे फक्त पंधराशे रुपये होते. पण त्याच्याकडे काम करण्याची जिद्द होती, मेहनत करण्याची तयारी होती शिकण्यासाठी संघर्ष करण्याची उमेद बाळगून तो विद्येच्या माहेरी धडपड करत होता. शिक्षण, नोकरी आणि त्या जोडीला त्याने मुलांचे प्रोग्रामिंगचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली, इंजिनीरिंगच्या मुलांचे प्रोजेक्टचे काम तो करू लागला. दिवसाला १५ ते १७ तास काम करून आपला चरितार्थ चालवू लागला. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, प्रयत्नाला कष्टाची जोड असेल, तर यश निश्चितच मिळते. आणि संदीपच्या बाबतीत देखील असेच झाले. 97 साली सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम त्याने उत्तम गुणांनी पूर्ण केला.
एबिक्स या बहुराष्ट्रीय कंपनीच्या इबिक्स क्याश अर्थात इबिक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वाश्रमीची इंडस सॉफ्टवेअर) ह्या कंपनीत प्रोग्रामर म्हणून रुजू झाला . कोणत्याही सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर हे पद सर्वात सुरुवातीचे समजले जाते. संदीपकडे मिळेल ते पदरात पाडून घेण्या शिवाय कोणताही पर्याय नव्हता. कंपनीत नोकरी करत असतानाच त्याची सॉफ्टवेअर मधील विविध ज्ञान पदरात पाडून घेण्याची धडपड देखील सुरु होती. त्याने सी प्रोग्रामर, ओरॅकल,वीजुअल बेसिक, जावा प्रोग्रामिंग, यासारख्या संगणक प्रणालींशि आपले नाते जोडले. अल्पावधीतच यावर हुकुमत गाजवायला सुरुवात केली. प्रचंड मेहनत निष्ठेने व प्रामाणिकपणे आपले काम करणे, काम करत असतानाच ज्ञानाची व्याप्ती वाढवणे या गोष्टीमुळे यशाची शिखरे तो हळूहळू पादाक्रांत करू लागला. हा काळ त्याच्या दृष्टीने फार मोठा संघर्षाचा काळ होता. एकीकडे नवीन शिकण्याची धडपड, दुसरीकडे कंपनीत दिवसाला १८ ते २० तास करावी लागणारी मेहनत, स्वतःला व कुटुंबियांना न देऊ शकणारा वेळ, त्यामुळे होणारी घुसमट, सर्वात महत्वाचे म्हणजे एवढं सर्व करून देखील जीवनाला आर्थिक स्थैर्य असे लाभले नव्हते.
स्वतःची प्रगती व कौटुंबिक स्थैर्य मिळवण्यासाठी तो सातत्याने नवनवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कामाची चुणूक व कर्तबगारी लक्षात घेऊन टेक महिंद्रा या कंपनीने व्यवस्थापक म्हणून 2004 मध्ये त्याला नोकरी करण्याची संधी दिली. “This was golden opportunity for him that he was craving for.” नविन नोकरीत देखील संदीप मेहनत करू लागला. नवीन कंपनीदेखील त्याच्या कामावर खुश होती. इंग्रजीत एक म्हण आहे “मॅन इज क्नोन बाय हिज कंपनी” ( या म्हणीत कंपनी याचा मुळ अर्थ त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्ती असा अभिप्रेत आहे,आपण येथे कंपनी म्हणजे नोकरीचे ठिकाण, अस्थापना असा घेऊ या ) ही म्हण अक्षरशा 180 डिग्रीत संदीपने बदलून टाकली.”Company is known by his man.” ( इथे कंपनी म्हणजे मित्र ,सहकारी असे अभिप्रेत नाही ) त्याचे असे झाले , तो ज्या इबिक्स कंपनीत आधी काम करत होता त्या इबिक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विदेशातील नामांकित ग्राहकाने कंपनीला एक मोठे कंत्राट देताना अट घातली की या आधीचे प्रोजेक्ट करणारा माणूसच जर ह्या प्रोजेक्ट वर काम करणार असेल तरच आम्ही तुम्हाला हा प्रोजेक्ट देतो.आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे कंत्राट फक्त आणि फक्त संदीपच्या कर्तृत्वामुळे मिळणार असल्याने सन्मानाने कंपनीने वरिष्ठ पदावर संदीपला पुन्हा पाचारण केले. कंपनीतील एखाद्या कर्मचार्‍याला अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ग्राहकाकडून मागणी येण्याची फार कमी उदाहरणे आहेत त्यातील एक संदीपचे आहे. यावरून त्याच्या बुद्धिमत्तेची, कर्तबगारीची, आणि कष्टांची साक्ष पडल्याखेरीज राहात नाही. पुन्हा आपल्या मूळ कंपनीत मेहनतीच्या जोरावर अधिकाधिक जबाबदाऱ्या त्याने पार पाडण्यास सुरुवात केली. कंपनीने दिलेल्या जवाबदार्‍या यशस्वीरित्या पूर्ण केल्या, तो 2005 मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम बघू लागला. या कामातील चिकाटी लक्षात घेऊन कंपनीने त्याला स्वित्झर्लंड येथे वरिष्ठ पातळीवर नियुक्ती दिली. त्यानिमित्ताने सहकुटुंब परदेशात वास्तव्य करण्याचा आनंद त्याने उपभोगला, तीन वर्षे तो स्विक्झर्लंड येथे वास्तव्यास होता.
भारतात परत आल्यावर जीवनातील संघर्ष थोडा कमी झाला. आर्थिक स्थैर्य त्याला लाभले, कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करू लागला.
या कामात स्वतःला संपूर्णपणे झोकून दिल्याने, 2010 मध्ये म्हणजेच अवघ्या 38 व्या वर्षी त्याची कंपनीचा वाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली. एवढ्या लहान वयात एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीचा वाईस प्रेसिडेंट होणे ही खरोखरीच आपल्या विद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आज मितिला संदीपच्या हाताखाली कंपनीतील निम्मी माणसे काम करत असून त्याचे पद हे कंपनीतिल दुसऱ्या क्रमांकाचे आहे. कंपनीने आज पर्यंत पूर्ण केलेल्या प्रोजेक्ट पैकी 60% प्रोजेक्ट संदीपने हाताळलेले आहेत अर्थातच कंपनीच्या यशात 60 टक्के वाटा संदीपचा आहे. यावरून तो कंपनीसाठी करत असलेले परिश्रम लक्षात येतील. संदीपच्या अधिपत्याखाली संपूर्ण युरोप, मध्यपूर्व आशिया, दक्षिण पूर्व आशिया, तसेच फिजी बेटे, असे जगातील 22 देश आहेत. 22 देशात चाललेल्या कंपनीच्या कारभारावर संपूर्णपणे संदीपचे नियंत्रण आहे. या बावीस देशांशी शिवाय जगातील अनेक देशात त्याने कामानिमित्त वास्तव्य केले आहे, अगदी व्यावहारिक भाषेत बोलायचे झाल्यास त्याच्या पासपोर्ट वर कमीत कमी 30 पेक्षा अधिक देशांचे शिक्के आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन केलेल्या माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा किती रुंदावल्या असतील याचा विचार करताना थक्क व्हायला होतं.
कवी केशवसुतांच्या भाषेत सांगायचे झाले तर
“एक तुतारी द्या मज आणून, फुंकिन जी मी स्वप्राणाने,
भेदुनि टाकिन सगळी गगने,
दिर्घ तिच्या किंकाळीने ”
सॉफ्टवेअर मधील तुतारी संदीपने स्वप्राणाने फुंकून कवी
*”केशवसुतांच्या”* काव्याला अर्थच प्राप्त करून दिला आहे.
“साल्हेर, मुल्हेर” या नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक गावातून मनमाड मार्गे पुणे व पुढे संबंध जगभर प्रवास केलेल्या या संदीपने आपल्या यशाचे गमक “टच वुईथ लेटेस्ट टेक्नॉलॉजी” या चार शब्दात सांगितले. आनंदी हसतमुख आणि केव्हाही कनेक्ट व्हायला तयार असलेला संदीपची अजूनही मनमाडशी असलेली नाळ तुटलेली नाही. आपल्या वर्ग मित्रांच्या सानिध्यात राहायला व शालेय जीवनातील आठवणी आणि किस्से त्यात रमून जायला त्याला आजही आवडते. एक दिवस संदीप यशाचे सर्वोच्च शिखर अर्थात कंपनीचा प्रेसिडेंट होईल यात शंकाच नाही. त्याच्या यशाला “स्काय इज द लिमिट” असेच म्हणावे लागेल, असे जरी असले तरी आपल्या यशाचे श्रेय तो आपल्या शाळेला, शाळेतल्या मित्रांना, आपल्या कुटुंबातील मोठयांना आणि सहचरिणीला दिल्याखेरीज रहात नाही. शाळेतील बालपणीचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्ती त्याच्या आयुष्यातली शिदोरी आहे. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीने आणि मार्गदर्शनानेच आयुष्यात यश संपादन करू शकलो आहे असे तो मानतो.
*”हर्षद रमाकांत गद्रे”*,
उपशिक्षक ,
*”इंडियन हायस्कूल”* ,
वार्ताहार ,
*”मुंबई तरुण भारत”*.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here