
मनमाड : मनमाड पासून येवल्याकडे जातांना साधारण 8 ते 9 किलोमीटर वर अंकाई -टंकाई हे ऐतिहासिक किल्ले आहे.यादव कालीन ताम्रपटात (इ. स.974)त्या किल्याचा उल्लेख ‘एककाई दुर्ग’ असा केलेला आढळतो. दरम्यान या किल्याचे वैशिष्टय असे की एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. सुरत- औरंगाबाद व्यापारी मार्ग या डोंगराजवळून जात असल्याने या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणा च्या दृष्टीने या किल्यांची निर्मिती करण्यात आली होती. सुमारे 1000 वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादवांनी या किल्याची उभारणी केल्याची माहिती मिळते. त्या काळी या किल्ल्याचा उपयोग टेहळणी नाका म्हणून केला जात असे. या किल्यांवरून खानदेश भागातील व गोदावरी खोऱ्यातील विस्तृत प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे असायचे.किल्याच्या पायथ्याशी प्राचीन लेणी व पुरातन अवशेष बघायला मिळतात.लेणी पाहून पायऱ्यांच्या मार्गवर आल्यावर आपण किल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारा जवळ पोहचतो. प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन भव्य अष्टकोनी बुरुज आहे.त्या तुन कातळात खोदलेल्या पायऱ्या चढून वर गेल्या वर तिसरे व चौथे प्रवेशद्वार येते, पुढे पाचवा आणि झीज झालेले दगड असलेल्या सहावा दरवाजा ओलांडल्यावर किल्यावर प्रवेश केल्यावर दोन तीन गुहा पाहवयास मिळतात.पुढे गेल्यावर अगस्ती ऋषींचे मंदिर असुन किल्याच्या मध्यभागी कातळात कोरलेले “काशी तळे” नावाचा तलाव आहे. किल्याचा उत्तरेकडून बाहेर पडण्यासाठी भुयारी रस्ता असुन किल्ल्यावरून कात्रा किल्ला , हडबीची शेंडी, गोरक्षनाथ डोंगर व मनमाड शहर नजरेस पडते. येथूनच टंकाई किल्यावर जाता येते या किल्ल्यावर एक पुरातन शिव मंदिर असुन मोठे पठार आहे.
अंकाई किल्यावर श्रावण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातुन भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते तर श्रावणातील तीसऱ्या सोमवारी मोठ्या प्रमाणात कावडी धारक येत असतात.यंदा मात्र कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे येथील यात्रा देखील रद्द करण्यात आल्याने किल्यावर या वर्षी श्रावण महिन्यात शांतता आहे.
