महाराष्ट्र जनवादी महिला संघटनेने घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

0

मुबंई ( प्रियांका म्हात्रे) महाराष्ट्र राज्य समिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे महिलांच्या आरोग्याविषयी व उरण येथील विलगीकरण कक्षात होणाऱ्या समस्येबाबत गुरुवार दिनांक २३ जुलै २०२० रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांची भेट घेत त्यांना कोरोना काळात होणाऱ्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीत होरपळून निघत असताना केंद्र सरकारने झपाट्याने आरोग्यसेवेचे खाजगीकरण चालवले आहे. सर्वसामान्य जनतेला सरकारी दवाखान्यांत उपचार मिळणे कठीण झाले आहे. खाजगी दवाखान्याचा खर्च त्यांना परवडत नाही. यात सर्वाधिक बळी महिलांच्या आरोग्याचा जातो, कारण पैसे नसल्यामुळे दुखणे अंगावर काढणे, अवैज्ञानिक उपाय करणे, अंधश्रद्धांना बळी जाणे हे प्रकार महिला वर्गात सर्रास दिसून येतात. या सर्व परिस्थितीत सार्वजनिक आरोग्यसेवा मजबूत करुन जनतेला विशेषतः महिलांना दिलासा मिळावा या करिता अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेत त्यांना देण्यात आले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले की, आरोग्य सेवेवरील खर्च लक्षणीय प्रमाणात वाढवून ती मजबूत करण्यात यावी, आरोग्यसेवेचे खाजगीकरण त्वरित थांबविले पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) व सरकारी रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भराव्यात तसेच कर न भरणाऱ्या कुटुंबाना कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि त्यावरील उपाय मोफत मिळावे त्याचप्रमाणे सर्व नियम खाजगी दवाखान्यांनाही लागू करावे. तसेच अधिकाधिक इस्पितळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेखाली आणावीत. कोरोना तसेच इतर आजारांवर उपाय नाकारणार्या खाजगी दवाखान्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व महिलांना विलगीकरण कक्षात आरोग्यदायी व सुरक्षित व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
महिलांच्या प्रसूतीविषयक व इतर आजारांकडे कोरोनामुळे दुर्लक्ष होत आहे. सर्व उपचार त्यांना शहरी आणि ग्रामीण पीएचसीत मिळावे. अनैच्छिक गर्म टाळण्याकरता संततीनियमक मोफत उपलब्ध करून द्यावे. कोरोनाच्या काळात दिवस रात्र काम करणाऱ्या कोरोनायोद्धा डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच द्यावे, तसेच त्यांचा मोफत इलाज करावा. त्यांना वाढीव वेतन/मानधन देण्यात यावे. कोरोनाची लागण होऊ नये याकरताचे प्रतिबंधात्मक उपाय-उपचारांची, दवाखाने, तिथे उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या इ. सर्व अधिकृत माहिती दररोज प्रसिद्ध करण्यात यावी असे सदर निवेदनात म्हंटले आहे.
त्याच प्रमाणे केवळ ५ किलो गहातांदूळ आणि १ किलो डाळ मोफत मिळाल्याने कुटुंबाच्या जेवणाचा प्रश्न सुटत नाही. त्यांची कोरोनाविरुद्ध इम्युनिटी वाढवायची असेल तर सकस आहारासाठी तेल व इतर जिन्नसही द्यायला हवे. रेशनकार्ड नसणान्यांनाही या सुविधेचा लाभ मिळावा. केंद्र सरकारने आयकर न भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला कोरोना असेपर्यंत दरमहा रू. ७५००/- रोख रक्कम दयावी. अनेक ठिकाणी बंद पड़लेली मध्यान्ह भोजन योजना पुन्हा सुरु करावी अशा विविध मागण्याची त्वरित दखल घेत अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र जनवादी महिला संघटना उपाध्यक्ष हेमलता पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा नसीमा शेख, सेक्रेटरी प्राची हातिवलेकर, राज्य उपाध्यक्ष सोन्या गील व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here