एक ऑगस्ट रोजी दूध संकलन बंद आंदोलन

0

नांदगाव ( प्रतिनिधी- निखिल मोरे ) गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये आणि दूध पावडरला पन्नास रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी एक ऑगस्ट रोजी दूध संकलन बंद आंदोलन केले जाणार असून यासंबंधीचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना भाजपा व मित्रपक्ष यांच्या वतीने देण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढत होत असून बँका कडून नाकारले जाणारा कर्ज पुरवठा, नकली बियाणे, कोकणातील वादळामुळे झालेले नुकसान, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान त्यातच कोरोनाच्या संकटामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला मिळत असलेला कमी भाव यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला असून शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नसल्याचे उमेश उगले यांनी दै. देशदुतशी बोलतांना सांगितले. या संदर्भात एक ऑगस्ट रोजी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये आणि दूध पावडरला पन्नास रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार असून या बाबतचे निवेदन नायब तहसीलदार रत्नाकर मरकड यांना देण्यात आले आहे.निवेदनात महटले आहे की, महाराष्ट्रात १५० लाख लिटर गाईच्या दुधाचे उत्पादन घेतले जाते यापैकी ३० लाख लिटर सहकारी संस्था कडून खरेदी केले जाते. ९० लाख लिटर दुध खासगी संस्था व डेअरी कडून घेतले जाते तर ३० लाख लिटर दुध शेतकरी स्वतः ग्राहकांना पोहच करतात. यात केवळ १ लाख लिटर दूध शासनाकडून खरेदी केले जाते. कोरोना काळात लॉक डाऊन मुळे दुधाच्या विक्रीत ३० टक्के घट झाली आहे. या काळात हॉटेल, चहाची दुकाने बंद असल्याने दुधाची मागणी घटली आहे. आजच्या परिस्थितीत खासगी व सहकारी संस्थांकडून दुधाला २० ते २२ रुपये भाव मिळत आहे त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रुपये दराने खरेदी करण्याची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात केवळ ७ लाख लिटर दुध खरेदी केली जात आहे. मंत्र्यांच्या संस्था असलेल्या संघाकडूनच खरेदी केली जात आहेत इतर दूध उत्पादक शेतकरी याना वाऱ्यावर सोडले आहे.गाईच्या दुधाला सरसकट १० रुपये अनुदान, दूध भूकटिला ५० रुपये अनुदान तर दूध ३० रुपये दराने खरेदी करावे या मागणीसाठी भाजपा, रासप, शिवसंग्राम, आर पी आय, रयत क्रांती व संलग्न पक्ष आणि शेतकरी बांधवाना घेऊन १ ऑगस्ट रोजी दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार आहे असे म्हटले आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब जाधव, नांदगांव शहराध्यक्ष उमेश उगले, भाऊराव निकम , संदीप पगार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here