दादरमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन दिवाळी अंक पारितोषिक वितरण

0

मुंबई (रवींद्र मालुसरे) – काशिनाथ धुरु ट्रस्ट व  दादर सार्वजनिक वाचनालय आणि १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि यावर्षी चळवळीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिवस आणि मराठी भाषा गौरव दिन मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता दादर येथे साजरा करण्यात येणार आहे.  विख्यात लेखक, अभिनेते आणि सुजाण विचारवंत दीपक करंजीकर, साहित्यप्रेमी आणि ज्येष्ठ स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख आणि विशेष कार्यअधिकारी मंगेश चिवटे, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश कोळसकर, पार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष व मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार, सुप्रसिद्ध शल्य विशारद डॉ. प्रीतम पाठारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे असतील.या कार्यक्रमात संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. ‘मनोरंजनकार का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ म्हणून ‘सकाळ अवतरण’ यासह राज्याच्या विविध भागातील उत्कृष्ट दिवाळी अंकांना स्व. विजया मनोहर कोळसकर स्मृती ‘अमृतप्रेरणा’ पुरस्कार, ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचे जनक नाशिकचे  विनायक रानडे यांना स्व. दत्ता कामथे स्मृती ‘ग्रंथसखा’ पुरस्कार,मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत ‘माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्य आणि व्यवहारातील स्थान’ आणि पार्थ फाउंडेशन पुरस्कृत ‘मराठी भाषेची चिंता आणि चिंतन’ या विषयावर स्वबोलीभाषेत कुसुमाग्रजांना पत्र या दोन राज्यस्तरीय लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तसेच “दिवाळी अंक परंपरेचे जनक का. र. मित्र” या विषयावर रविप्रकाश कुलकर्णी आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाला वृत्तपत्र लेखक, साहित्यिक आणि मराठी भाषाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, मराठी विचारधारा प्रतिष्ठान आणि पार्थ फाउंडेशन यांनी केले आहे. 

रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here