अंबरनाथ मधील ज्येष्ठ सामाजिक नेते ह.भ.प. नारायणबुवा सीताराम शिंदे यांचे दुःखद निधन

0

ठाणे : अंबरनाथ – बदलापूर मधील नाईक मराठा समाजाचे अध्यक्ष आणि वारकरी सांप्रदयातील धुरीण ह भ प नारायणबुवा शिंदे यांचे निधन झाले आहे. अंबरनाथ पूर्वेला शिवाजी नगरात वास्तव्य करताना महाड-पोलादपूर मधील नागरिकांना एकत्र आणून त्यांनी सर्वप्रथम भगवदभक्त असलेल्या आपल्या वडिलांनी सुरु केलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमांना अधिक गती देण्यासाठी, लोकप्रियता आणण्यासाठी त्याला त्यांनी भव्यदिव्य स्वरूपात आणले. आळंदी, पंढरपूर आणि उर्वरित महाराष्ट्राला सुपरिचित असलेले इतर ठिकाणचे मोठमोठे नामवंत कीर्तनकार, गायक, वादकांना त्यांनी अंबरनाथमध्ये यानिमित्ताने आणले. माजी मंत्री साबिरभाई शेख, माजी मंत्री प्रभाकर मोरे, आमदार भरतशेठ गोगावले, नगरसेवक सुभाष साळुंखे, माजी नगरसेवक आप्पा मालुसरे यांच्या सारख्या राजकीय व्यक्तीच्या मागे राजकीय भूमिका घेत ठामपणे उभे राहिले. अंबरनाथ शहरात नाईक मराठा समाजाची संघटना बांधण्यासाठी समाजबांधवांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले. आळंदी सारख्या धार्मिक क्षेत्रात धर्मशाळा असावी यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले आणि माऊली भजन मंडळ अशी धर्मशाळा उभी केली.अल्प शिक्षण आणि सधनता नसतानाही महाड तालुका आणि अंबरनाथ शहरात सामाजिक, सांस्कृतिक राजकीय आणि वारकरी क्षेत्रात त्यांनी तन मन धन अर्पण करून समाजसेवा करणारा कार्यकर्ता हरपला अशी भावना अंबरनाथ शहरात होती. त्यांच्या मागे दोन पुत्र, दोन कन्या आणि नातवंडे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here