पेट्रोल-डिझेल दरवाढ / ‘मन की बात’मध्ये पेट्रोल किमतींवर बोलण्याचे आवाहन जनतेने मोदींना करावे- मोहन जोशी

0

मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर रविवारी ‘मन की बात’ मध्ये आकाशवाणीवरून देशाला संबोधित करताना अनेक विषयांवर भाष्य करतात. जनतेशी संवाद साधताना त्यांनी ‘मन की बात’साठी विषय सुचवण्याचे आवाहनही ते करतात. मोदींचे हे आवाहन लक्षात घेऊन राज्यातील जनतेने त्यांना यावेळच्या ‘मन की बात’साठी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचा विषय लाखो लोकांनी सुचवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केले आहे.

जोशी पुढे म्हणाले की, पंतप्रधान राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांबरोबरच अगदी छोट्याशा गावातील स्तुत्य उपक्रमाची नोंद घेऊन त्याचाही उल्लेख ‘मन की बात’मध्ये करतात पण देशाला भेडसावत असलेल्या मुख्य विषयांना मात्र जाणीवपूर्वक बगल देतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सलग १९ व्या दिवशी वाढ झाली असून किमतीच्याबाबतीत डिझेलने पेट्रोललाही मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या चार महिन्यांपासून कच्च्या तेलाचे भाव निच्चांकी पातळीवर आहेत. मोदी सरकारने याचा थेट फायदा जनतेला देण्याचे टाळून नफेखोरी करण्यावर भर दिला आहे. सध्याचे कच्च्या तेलाचे दर पाहता पेट्रोल-डिझेल प्रति लिटर ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीला विकणे शक्य आहे.

डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीएचे सरकार असताना कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल १६४ डॉलरपर्यंत पोहचले होते, अशा परिस्थितीतही त्यांनी पेट्रोलियम पदार्थांच्या किमती स्थिर ठेवून जनतेवर जादा बोझा पडणार नाही याकडे लक्ष दिले होते. मोदी सरकार व मनमोहनसिंग सरकारच्या काळातील कच्च्या तेलाच्या किमतींची तुलना करता पेट्रोल-डिझेलच्या किमतीही निच्चांकी पातळीवर आणणे शक्य आहे. जनतेला महागाईचे चटके बसत असताना त्याची जाणीव पंतप्रधान मोदी यांना करुन देण्यासाठी लाखो लोकांनी ‘मन की बात’ मध्ये किमती कमी करण्याचा विषयावर बोलण्याचे आवाहन करावे, असे जोशी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here