वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.

0

मुंबई, वडाळा (प्रतिनिधी – महेश्वर तेटांबे)
विना सहकार नाही उद्धार या उक्तीला अनुसरून वडाळा (पश्चिम) येथील नव्याने उदयास आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यातील एक सामाजिक उपक्रम म्हणजे वृक्षारोपण (झाडांचे जतन) हा नविन उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमासाठी बँकेचे शाखा अधिकारी अनिकेत गावडे व त्यांचे सहकारी तसेच प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगावकर यांनी त्यासाठी मोलाचा सहभाग दर्शविला. आज सगळीकडे प्रदूषणाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यामुळे झाडे लावा..झाडे जगवा ही सध्या काळाची गरज बनली आहे. शिवाय प्रत्येकाला आज ऑक्सिजनची गरज आहे आणि हीच गरज लक्षांत घेवुन प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले तर बरीच ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते आणि आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. याप्रसंगी प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगावकर यांनी वृक्षारोपण आणि झाडांचे जतन करणे हे आपले कर्तव्य असुन ते प्रत्येकाने पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक अनिल जैन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून झाडांच्या पुनर्विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे अभिवचन दिले. सेंट जोसेफ हायस्कूल, वडाळा पश्चिम लगतच्या फूटपाथवर संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी आपली वंदनीय उपस्थिती दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here