मुंबईच्या मदतीसाठी केरळहून येणार ५० डॉक्टर्स आणि नर्सेसची विशेष टीम

0

करोना व्हायरस विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी पुढच्या काही दिवसात केरळमधून ५० हून अधिक डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत येणार आहेत. करोना रुग्णांवर उपचार करताना मुंबईला आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. केरळहून १६ डॉक्टरांची टीम सोमवारी मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे असे डॉक्टर संतोष कुमार यांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त् दिले आहे.

तिरुअनंतपूरममधल्या सरकारी मेडिकल कॉलेजचे ते उपअधीक्षक आहेत. पुढच्या काही दिवसात केरळहून ५० डॉक्टर आणि १०० नर्सेस मुंबईत येतील असे कुमार यांनी सांगितले. “सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर काम करतील. ते वैद्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित रुग्णालय आहे. मुंबईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी येणारे डॉक्टर केरळात खासगी क्षेत्रामध्ये काम करतात. स्वच्छेने ते आपल्याच सहकाऱ्यांची मदत करण्यासाठी येत आहेत” असे डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले.

करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे. शिवाय तिथे मृत्यूदरही प्रचंड कमी आहे. अंधेरीमध्ये असलेले सेव्हन हिल्स हॉस्पिटल सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ते सुरक्षित आहे असे संतोष कुमार यांनी सांगितले.

केरळ आणि मुंबईमधील करोनाच्या परिस्थितीची तुलना करण्यास त्यांनी नकार दिला. “केरळमध्ये मुंबईसारखी एकही जागा नाही. हे मोठे शहर असून इथे तीन कोटी लोकसंख्या राहते. दोन्ही ठिकाणी इन्फेक्शन पसरण्याची कारणे वेगवेगळी आहेत आणि विषाणूचा सामना कसा करायचा त्याची रणनिती सुद्धा वेगळी आहे” असे त्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here