
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेक प्रसंगी शिवराज्याभिषेक शक सुरू केले होते. त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी पाडव्याप्रमाणे असून, त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरात गुढी उभारून हा दिवस शिवपाडवा म्हणून साजरा करावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केले.यावर्षी सोहळ्याला एक लाख हून अधिक शिवप्रेमी किल्ले रायगडवर येतील. हिंदुस्थानातील ३५० नद्यांचे पाणी एकत्र करून त्यादिवशी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात येणार आहे. गड प्रदक्षिणा, गड पूजन, गडावरील देवतांचे पूजन, शस्त्र पूजन, मर्दानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, पालखीची मिरवणूक या सर्व गोष्टी परंपरेने आलेल्या वेशभूषा साजरे केले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुलादान केले जात होते. तसा तुलादानविधी समितीच्या वतीने रायगडावर साजरा केला जातो. एका बाजूला शिवाजी महाराजाची मूर्ती, तर दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी जी वस्तू दान करतात त्याची तुला येथे केली जाते. जमा झालेल्या भेटवस्तू त्या भागातील गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जातात. ३५०वा राज्याभिषेक सोहळा हा काही दिवसांचा न होता तो वर्षभर समितीच्या वतीने साजरा केला जाणार आहे. ३५० व्या राजाभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर शस्त्रांचे प्रदर्शन, शिवकालीन नाणी प्रदर्शन, मोडी लिपीचे प्रदर्शन, व्याख्याने, पुस्तक प्रदर्शन यांचेही आयोजन करून शिवचरित्राचा जागर केला जाणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.
