
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या संकटात सरकारसोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत. या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही. त्यामुळे अस्तित्व दाखवण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फार्स उभा केला जात असल्याची घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका मांडली होती. पण त्यांची कृती मात्र या भूमिकेच्या विरोधात राहिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करायची सोडून पीएम केअरला मदत केली आहे. खरेतर त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीशी भांडायला हवे होते. त्यांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी एखादे पॅकेज मंजूर करून घेतले असते, तर आम्हाला त्याचे अधिक कौतुक वाटले असते.
मात्र, फडणवीस आणि त्यांच्या सहकाºयांना महाराष्ट्र सरकार बरोबर बोलायचे नाही, त्यांना रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत. आमचे चुकत असेल तर ते दुरुस्त करायला तयार आहोत. मात्र, त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची असल्याचे थोरात म्हणाले. संकटातून मार्ग काढण्यापेक्षाही सरकार अडचणीत कसे येईल, यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. खरे तर फडणवीसांची निष्ठा महाराष्ट्रासोबत नाही ती दिल्लीतल्या भाजप नेत्यांसोबत आहे, असाही आरोप थोरात यांनी केला.
संकटाच्या काळात भाजपच्या नेत्यांना राजकारण सुचतेच कसे? असा संतप्त सवाल करून ही वेळ राजकारणाची नाही, त्यासाठी आपल्या सर्वांकडे आयुष्य पडले आहे असे थोरात म्हणाले. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्रद्रोहच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील जनतेला सरकार करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची जाणीव आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. अशावेळी भाजपकडून सुरू असलेले गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल असेही थोरात म्हणाले.
