आरोग्य राज्यमंत्री डॉ.पवार यांनी घेतला आढावा

0

उस्मानाबाद:- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणेचा आढावाही घेतला.यावेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधला त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातून औषधे आणि उपचार व्यवस्थित मिळतात का? याचा स्वतः अनुभवही घेतला.यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतला. त्यात त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या संदर्भात नागरिकांकडून आलेल्या तक्रारी आणि त्यावर करावयाच्या उपायोजना याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी उपलब्ध असलेली औषधेच रुग्णांना घेण्यासाठी लिहून द्यावीत आणि आवश्यक असणारी औषधे मागवण्यात यावी, रुग्णांना उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर भारती पवार यांनी उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा आहे या जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार या जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ मंजूर करण्यात आल्याचे सांगितलं.आकांक्षीत जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील माता बालमृत्युदरात घट होत असून संस्थात्मक प्रसूतीत मोठी वाढ होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य सुविधा गावोगावी पोहोचवल्या जात असून रुग्णांना आवश्यक त्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा , तसंच दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळावं या उद्देशाने पंतप्रधानांच्या आग्रहांनुसार वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यात 15 व्या वित्त आयोगातून सात ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तर शहरी भागासाठी 18 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यासाठी 15 कोटींचं बजेट मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून मागील वर्षी उस्मानाबाद जिल्ह्याला 49 कोटी तर यावर्षी 34 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे सांगितल. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधांची मागणी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे तसेच दररोजच्या उपचारांसाठी लागणारी औषधं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याचे तसच दवाखान्यात उपलब्ध आहेत तीच औषधे डॉक्टरांनी रुग्णांना लिहून देण्याची शिफारस करण्याची निर्देश दिल्याचेही डॉक्टर भारती पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे , जिल्हाध्यक्ष नितीन काळे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here