बियाण्यांचा काळाबाजार झाल्यास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करू

0

येवला : जिल्हास्तरावर खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात अन इथे साठेबाजी केली जाते. कोणत्याही परिस्थितीत खते, बी-बियाणे काळाबाजाराने विकली गेली तर एकही अधिकाऱ्याची खैर केली जाणार नाही. यापुढे नागरिकांच्या कामात हलगर्जीपणा दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.येथील विश्रामग्रहावर डॉ. पवार यांनी आढावा बैठक घेत तालुक्यातील आगामी नियोजन व नागरिकांच्या अडचणींसंदर्भात माहिती घेतली. यावेळी प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले ,गटविकास अधिकारी अन्सार शेख, नगरपालिकेतर्फे बांधकाम अभियंता जनार्दन फुलारी, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.बैठकीमध्ये तालुक्यातील रमाई, शबर घरकुल व पंतप्रधान आवास योजना, गरीब कल्याण धान्य पुरवठा योजना, संजय गांधी, श्रावण बाळ व इंदिरा गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, पंतप्रधान पीक विमा योजना, शेतकरी सन्मान योजना, रोजगार हमी योजना, जल जीवन मिशन, सांडपाणी व घनकचरा नियोजन, खताचा पुरवठा, पावसाळ्यापूर्वीची तयारी, महावितरणीची कामे या विविध महत्त्वाच्या प्रश्नावर आढावा घेण्यात आला.मंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्त्रांवर त्यांना धारेवर धरले. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक न मिळाल्यामुळे पवार यांनी नाराजी व्यक्त केली. येणाऱ्या काळात सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने कटिबद्ध रहावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल अशा शब्दांत अधिकाऱ्यांना कामातील दिरंगाईबाबत खडेबोल सुनावले.पावसाळा तोंडावर आला असता तुमच्याकडे बी, बियाणे व खत, व्यवस्थापन बद्दल माहिती नाही, इतका निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे त्या म्हणाल्या. महावितरण व पंचायत समितीचे अधिकारी तसेच वन विभाग यांच्या कामाबाबत पवार यांनी असमाधान व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here