नाशिक : मा. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये शाळापूर्व तयारी अभियान मेळावा नाविन्यपूर्ण विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. लेझीम व शालेय बँडपथकाच्या मदतीने परिसरातून जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी पहिली प्रवेशाबाबत विविध घोषफलक हातात घेऊन घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच शालेय परिसरातील चौकाचौकात शाळेचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर करत नागरीकांना आकर्षित केले.प्रभातफेरी शालेय प्रवेशद्वारावर येताच शाळेतील शिक्षिकांनी शाळापूर्व तयारी मेळावा गीत फेर धरत सादर केले तर शाळापूर्व तयारी म्हणजे तरी काय हे विद्यार्थीनींनी भारुडातून सादर करत उपस्थित पालकांचे प्रबोधन केले. तद्नंतर मेळाव्यासाठी आलेल्या पालकांचे स्वागत करत पहिली दाखलपात्र विद्यार्थ्यांना आकर्षक मुकूट घालून त्यांचे औंक्षण पहिलीच्या शिक्षिका सुवर्णा थोरात व शैलजा भागवत तसेच शाळेतील सर्व शिक्षिकांनी केले.
नवागत बालकांना शाळेचे आकर्षण वाटावे म्हणून सर्व बालकांची सजविलेल्या बैलगाडीतून लेझीम व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून शालेय प्रवेशद्वारावर आणण्यात आले. यावेळी नवागत बालकांचा आनंद ओसंडून वाहत होता.नवागत बालकांनी शाळेत प्रवेश करताच सजविलेल्या मेळावा खोलीत बालकांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. तद्नंतर उपस्थित सर्व बालकांची नावनोंदणी करण्यात आली. नंतर शारिरीक विकास, बौध्दिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी या विविध आकर्षक स्टाॅल्सवर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येऊन आंनंददायी पध्दतीने, खेळ व प्रत्यक्ष कृतीतून बालकांची शाळापूर्व तयारीचे अवलोकन शाळेतील सर्व शिक्षकांनी केले. मार्गदर्शन व समुपदेशन या शेवटच्या स्टाॅलवर पालकांना शाळापूर्व तयारी साहित्य देण्यात आले तर बालकांना चाॅकलेट व आकर्षक टोपी देत शाळापूर्व तयारीसाठी सदिच्छा देण्यात आल्या. यावेळी नवागत बालकांसाठी खास तयार करण्यात आलेला शैक्षणिक सेल्फी पॉईंट बालक व पालकांचा आकर्षनबिंदू ठरला.
तद्नंतर उपस्थित सर्व पालकांना शालेय सभागृहात मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी शाळापूर्व तयारी, विकासपत्र, कृतीपत्रीका, आयडिया कार्ड, पहिले पाऊल पुस्तिका यांबाबत आगामी दहा-बारा आठवड्यात करावयाच्या कामकाजाची सर्वंकष माहिती देत मार्गदर्शन केले.शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी शालेय प्रवेशद्वार, शालेय परिसर, मेळावा खोली यांची हार,पानाफुलांनी, फुग्यांनी, फलकलेखन व रांगोळीने आकर्षक सजावट करण्यात आली होती.शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले केंद्रप्रमुख नितिन देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता साळुंके, उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे नियोजन विनोद मेणे, किसन काळे, भगवान काकुळते, प्रविण गायकवाड, वंदना अरसुळे, प्रमिला देवरे, कविता वडघुले, शोभा मगर, सुवर्णा थोरात, रुपाली ठोक, शैलजा भागवत, योगिता खैरे, सुनंदा बच्छाव, प्रणिता ओतूरकर यांनी केले. मेळाव्यास प्रथम संस्थेच्या अंबिका देवरगावकर, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सदस्य, पहिली दाखलपात्र बालके, पालक उपस्थित होते.