लासलगांव स्टेशनवरील किसानसेवा रेल्वेच्या पार्सल व्हॅन ची संख्या वाढवा – ना.डॉ.भारती पवार

0

नाशिक प्रतिनिधी : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मेमू एक्सप्रेस सुरु केली त्याबद्दल प्रथम उत्तर महाराष्ट्राच्यावतीने आभार मानले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या लासलगांव स्टेशनवरील किसानसेवा रेल्वेच्या पार्सल व्हॅन (व्हीपी) ची संख्या वाढवून मिळावी यासाठी वेळोवेळी मागणी होत असल्याचे लक्षात घेवून ना.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांचे सोबत चर्चा केली.कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव (जि.नाशिक) ही बाजार समिती कांदा, भुसार, तेलबिया, डाळींब, फळे व इतर सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी आशिया खंडात नावाजलेली बाजार समिती असुन लासलगांव व परीसरातील शेतकरी बांधव वरील शेतीमालाबरोबर मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे देखील उत्पादन घेतात.त्यानुसार केंद्र शासनाने नाशिक जिल्ह्यातील वरील प्रमुख शेतीमालाला देशातील बाजारपेठ उपलब्ध व्हावे यासाठी मध्य रेल्वेची किसानसेवा रेल्वे सुरू केली होती . सदर किसानसेवा रेल्वेने लासलगांव व परीसरातील व्यापारी व शेतकरी बांधव यांचा लासलगांव रेल्वे स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात कांदा, डाळींब, फळे व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला परराज्यात विक्रीसाठी पाठवित आहे. परंतू मध्य रेल्वेने सदर किसानसेवा रेल्वे गाडीस यापुर्वी लासलगांव स्टेशनवर दोन पार्सल व्हॅन (व्हीपी) उपलब्ध करून दिले होते. मात्र मागील १० दिवसांपासून मध्य रेल्वेने लासलगांव स्टेशनवर सदर किसानसेवा रेल्वे गाडीच्या दोन बॉक्सची (व्हीपी) संख्या कमी करून आजमितीस फक्त एकच पार्सल व्हॅन (व्हीपी) उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे येथील व्यापारी व शेतकरी वर्गास सदर किसानसेवा रेल्वे गाडीने त्यांचा कांदा, डाळींब, फळे व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला परराज्यात विक्रीसाठी पाठविण्यास अडचण येत आहे. तसेच सध्या लासलगांव व परीसरात शेतकरी बांधवांचा द्राक्षे काढणीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून सदरचा द्राक्षे हा शेतीमाल किसानसेवा रेल्वेच्या एका पार्सल व्हॅन (व्हीपी) मध्ये परराज्यात पाठविणेसाठी अपुरा पडत असून त्यामुळे येथील व्यापारी व शेतकरी वर्गास अडचण निर्माण होत आहे. तरी सर्व वस्तुस्थितीचा सहानुभुतीपुर्वक विचार करून लासलगांव व परीसरातील व्यापारी व शेतकरी बांधवांना शेत पिके व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला किसानसेवा रेल्वेद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात इतर राज्यात पाठविता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या लासलगांव स्टेशनवर सदर किसानसेवा रेल्वेचे तीन ते चार पार्सल व्हॅन (व्हीपी) मिळावे अशी मागणी केली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असेही यावेळी रेल्वे मंत्री यांचेशी बोलताना डॉ.भारती पवार यांनी सांगितले. दरम्यान कोरोना महामारीच्या काळात बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे पुन्हा सुरु करणेबाबत देखील रेल्वे मंत्री यांचेशी चर्चा करून विनंती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here