बीड (प्रतिनिधी) असंघटीत कामगारांची नोंदणी सरकारकडे नाही त्यामुळे शासनाने ई-श्रम कार्ड नोंदणी सुरू केलेली आहे. या कार्ड चा लाभ असंघटीत कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देतांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी होणार आहे.
भारत देशात असंघटीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र याची नोंद सरकार दप्तरी नाही. असंघटीत कामगारांमध्ये जसे लहान शेतकरी-शेतमजूर, पशुपालन कामगार, बिडी कामगार, बांधकाम कामगार, सेंट्रींग कामगार, लेदर कामगार, सुतार, वीटभट्टीवर काम करणारे नावे घरगुती कामगार, भाजीपाला फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटोरिक्षा चालक, घरकाम करणारे, आशा कामगार, दूध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्र चालक, स्थलांतरित कामगार, छोटे दुकानदार, शिलाई मशीन कामगार, इत्यादी कामगारांना सरकारी योजना अनुदान देण्यात अडचणी निर्माण होतात त्यामुळे केंद्र सरकारने असंघटीत कामगारांची नोंदणी करण्याचे ठरवले आहे.हे ई-श्रम कार्ड १८ ते ५९ वय असणारी व्यक्ती काढू शकते. ती व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारी नसावी. वरील कामगार क्षेत्रात काम करणारी असावी. यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक आणि घरातील एका व्यक्तीचे वारसदार म्हणून नाव, जन्मतारीख एवढीच कागदपत्र आवश्यक आहेत.बीड जिल्हयातील एकही असंघटीत कामगार या नोंदणीपासून वंचित राहू नये.
असंघटीत कामगारांवरती कुठलीही आपत्ती आली किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक युएएन एक विशिष्ट नंबर देणार आहे. आणि त्याचे ई-श्रम कार्ड आधार कार्ड सारखे देणार आहे. त्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाच्या अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही नोंदणी करणे गरजेचे आहे असे आव्हान मौलाना आझाद सेवा भावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दिन यांनी केले आहे.