मातृत्वभाव, सेवाभाव, समर्पकवृत्तीने कार्य केल्यास समाज उन्नती होईलः राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी

0

मुंबई/प्रतिनिधी: मातृत्वभाव म्हणजे वात्सल्य, प्रेमभावना. ही भावना केवळ महिलांकडे असते असे नाही तर प्रत्येकामध्ये असते असे स्पष्ट करत संत ज्ञानेश्‍वरांना, विठ्ठलाला माऊली म्हटले जाते. माऊली स्त्री असते. परंतु, इथे विठूराया आणि ज्ञानदेवांनाही माऊली म्हणण्याची संस्कृती आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तुकोबाची समर्पण वृत्ती इथे ठासून भरलेली आहे. समर्पणवृत्तीने सेवा करण्याची दीक्षा त्यांनी दिली आहे. शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी कतर्र्व्य बजावताना नोकरी म्हणून न करता मातृत्वभाव, सेवाभाव, समर्पकवृत्तीने काम केले तर सार्‍यांच्याच जीवनाचे सोने होईल, समाज उन्नत होईल आणि पुण्यार्जन देखील होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.पनवेल संघर्ष समितीच्या वतीने राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पनवेल, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी येथे शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकार्‍यांसह वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक डॉक्टरांचा ‘कोविड संजीवनी’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांसह 15 शासकीय अधिकारी व समाजसेवकांना ‘कोविड संजीवनी’ पुरस्कार देवून शानदार समारंभातून गौरविण्यात आले. व्यासपिठावर राज्यपालांसोबत डॉ. लहाने आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीबद्दल व्यक्त केले दुःख
———————-
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीबद्दल दुःख व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, कोरोना व अतिवृष्टीयसारखी संकटे मनुष्याची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. महाराष्ट्रात कधी समुद्र, वादळ, पाण्याच्या संकटामुळे हाहाःकार माजत असतो. त्यामुळे सारेच हतबळ होत आहोत. एकीकडे कोरोनाशी लढत असताना दुसरीकडे निसर्गाचा कोप होताना दिसत आहे. ही परिस्थिती बिकट पाहून उत्तराखंडच्या दूर्घटनेची आठवण होते, असे सांगून इथेही सारे एकदिलाने काम करीत आहेत. महाड आणि चिपळूण दौर्‍यातून पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेता आल्या, असेही राज्यपाल म्हणाले.
पोलिसांवर जेव्हा पुष्पवर्षाव होतो…
……………………………………
कोरोना काळात पोलिस शिपायापासून महासंचालाकांपर्यंत तसेच पटवार्‍यापासून सचिवांपर्यंत सर्वांनी चांगले काम केले. पोलिस हे दल सातत्याने टिकेचे धनी ठरत असतात. परंतु, कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे समाजाने त्यांच्यावर सगळीकडेच पुष्पवृष्टी केली. तो क्षण पोलिसांच्या जीवनातही अतिशय महत्वाचा टप्पा ठरला आहे. वैद्यकीय क्षेत्र असेल, प्रादेशिक परिवहन विभाग असेल, खासगी सेवा देणारे ड़ॉक्टर असतील, प्रशासनातील अधिकारी या सार्‍यांनी जीव लावून आपत्तीचा सामना केला असे गौरद्गार काढून राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, याच काळात एका आयुष डॉक्टरने जे कोविड कार्य केले, त्याची जाणीव ठेवून बदलीनंतर सारा गाव गहिवरला होता. त्या डॉक्टरांना निरोप देताना समाजाने कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची जाणीव समाज ठेवतो. संकटकाळी मतभेत विसरून समाजासाठी व देशासाठी कार्य करण्याची उन्नत भावना यावेळी पाहण्यास मिळाली, असे नमूद समाजाप्रती सेवाभाव असाच नेहमी कायम राहावा अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
पनवेल संघर्ष समिती नव्हे ‘सहयोग समिती’!
……………………………………..
पनवेल संघर्ष समितीचे कार्य पाहता, आता संघर्ष समितीचे नाव सहयोग समिती ठेवले पाहिजे. सार्‍यांना सहकार्य करणारी आणि उचित कार्य करणार्‍यांना ऊर्जा देण्याचे काम ही समिती करीत आहे. त्यामुळे समितीचे प्रमुख कांतीलाल कडू यांचे कौतुक आहे. त्यांच्या पत्नी, दै. निर्भीड लेखच्या वृत्त संपादिका सौ. रूपा कडू यांचे त्यांना सहकार्य लाभत असल्याने तसेच सर्व कार्यकर्त्यांना घेवून ते पुढे जात आहेत. त्या सार्‍यांचे उत्तम कार्य असल्याचे गौरद्गार काढून राज्यपालांनी समितीच्या कार्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला तेव्हा सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटांच्या विजा चमकल्या.
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी व पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांना त्यांच्या अनुपस्थितीत सन्मानित करण्यात आले. तर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, गरीबांचे दैवत, गुणे हॉस्पीटलचे मुख्य विश्‍वस्त डॉ. गिरीशजी गुणे, भिवडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता दिलीप ढोले, पनवेलचे तहसीदार विजय तळेकर, मिरा-भाईंदर महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे, प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरसे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सचनि संकपाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, सामाजिक वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राम थदानी आदींना शाल, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी पुरस्काराबद्दल आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृत्तनिवेदिका स्मिता गवाणकर यांनी विशिष्ट शैलीत करताना शेरोशायरीने रंगत आणली. त्यांच्या उत्कृष्ट शैलीचा राज्यपालांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. तेव्हा गवाणकरही भारावून गेल्या होत्या. नवीन पनवेल शहर अध्यक्ष भूषण सांळुके यांनी उपस्थितांचे खुशखुशित शब्दशैलीत आभार मानले.
पूरग्रस्तांना सहकार्य करणार्‍या संस्थांना ‘पूरदैवत’ पुरस्काराने गौरविणार!
——————-
कोरोना काळात समाजाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जतन करणार्‍या डॉक्टर, पोलिस, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध स्तरावरील कर्मचार्‍यांना पनवेल संघर्ष समितीने आतापर्यंत विविध कार्यक्रमातून गौरवण्याचा सिलसिला जारी ठेवला आहे. कोरोनाशी लढत असतानाच आभाळ फाटल्यागत नैसर्गिक आपत्तीने एका मागून एक हल्ले चढवून मानवी जीवन विस्कळीत केले आहे. महाड, चिपळूणसह महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना पूराचा फार मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये अनेकांचा नाहक जीव गेला. गुरे-ढोरं वाहत गेली. काही गुदमरून मेली. घरदारं दरडीखाली दबली गेली. अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, हे सगळं पाहता मानवी संवेदनांना लगेच पुढाकार घेवून पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. सगळीकडे सामाजिक संस्था झपाट्याने मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्या सर्वांची सरकारकडून माहिती घेवून पूरग्रस्तांना मदत करणार्‍यांना ’पूरदैवत‘ पुरस्काराने गौरविण्यात येईल, अशी घोषणा पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आपल्या प्रास्ताविकातून केली.
ते म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून पनवेल शहर, ग्रामीण भाग आणि एकूणच रायगड जिल्हा, नवी मुंबई, ठाणे हिटलिस्टवर होते. परंतु, शासकीय अधिकार्‍यांनी ही परिस्थिती हाताळून नागरिकांना कुटूंबाप्रमाणे जपले. कर्तव्य भावनेतून त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सहकार्य केली. त्याची जाणीव ठेवून पनवेल संघर्ष समितीने एक हजार कोविड योद्ध्यांना गौरविण्याचा मानस केला आहे. त्याचे अनेक कार्यक्रम झाले. किमात सातशेहून अधिक योद्ध्यांना कोविड संजिवनी पुरस्कार देवून गौरिवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, सामाजिक योगदान देणार्‍या डॉक्टरांना राज्यपालांच्या हस्ते गौरविताना आनंद होत आहे. हा गौरव, हा सन्मान त्यांच्यासोबत कोविडशी झुंज दिलेल्या प्रत्येक कुटूंबाचा, नागरिकाचा असल्याने राजभवनातील सुंदर, देखण्या कार्यक्रमामुळे पनवेलसह रायगडची शान वाढली असल्याचे कडू यांनी सांगितले.
राजभवनातील अधिकार्‍यांचे
विशेष आभार
——————–
राजभवनात संपन्न झालेल्या कार्यक्रमाबद्दल कांतीलाल कडू यांनी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, मुख्य सचिव तथा परिवहन विभागाचे प्रमुख राजेश नैथानी, एडीसी विश्‍वनाथ आनंद, ले. अमेरद्र सिंग, मुख्य जनसंपर्क अधिकारी उमेश काशिकर, नैथानी यांचे स्वीय सहाय्यक राजेश लिमये, एडीसींचे स्वीय सहाय्यक नितेश रगडे, छायाचित्रकार पराग कुलकर्णी, सभागृहाचे व्यवस्थापकीय सहकारी राकेश जाधव, राजभवनातील सर्व कर्मचारी, राज्यपालांचे अंगरक्षक, पोलिस कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी घेतली मेहनत
———————-
राजभवनातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीच्या शिलेदारांमध्ये रूपा कडू, शर्वाय कडू, तेजस डाकी, भूषण सांळुके, तुकाराम कंठाले, सचिन पाटील, हरेश पाटील, योगेश पगडे, सुनील भोईर, किरण करावकर, विकी खारकर, सुरज म्हात्रे, भास्कर भोईर, मंगल भारवाड, सुरेशशेठ पाटील, आशा चिमणकर, शैला म्हात्रे, प्रतिम कोळी, शुभांगी लखपती, अकुंश म्हात्रे, राम थदानी, आनंद पाटील, पृथ्वीराज ढोले, राजेंद्र साळस्कर, आदित्य रहाटे, अनिल नारकर, जावेद खान, संतोष शर्मा आदींनी मेहनत घेतली. तसेच अल्पोपहार व्यवस्थेची जबाबदारी मंगेश राहटे यांनी पार पाडली.
उपस्थितांमध्ये मान्यवरांचा सहभाग
——————–
कार्यक्रमाला मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, मॅक्स महाराष्ट्र वृृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक विलास आठवले, नवी मुंबई न्युज वनचे संपादक सुधीर शर्मा, रवि रमेश चंद आणि प्रभात पर्वचे मोहम्मद यासिन वसिम खान आदींची विशेष उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here