पनवेल संघर्ष समितीच्या सततच्या रेट्यामुळे अखेर राज्य शासन नमले

0

पनवेल ( प्रतिनिधी पनवेल)  संघर्ष समितीने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. पालघर येथे जिल्हा प्रक्षिण केंद्राचे प्रशिक्षक आनंद गोसावी यांची पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारीपदी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नियुक्ती केली आहे. तब्बल दहा महिने हे पद रिक्त होते. संघर्ष समितीने सातत्याने रेटा लावल्याने अखेर पनवेल महापालिकेला न्याय मिळाला आहे. या नियुक्तीतून सत्ताधारी आणि विरोधकांना आणखी एक धोबीपछाड मिळाली आहे.
पनवेल महापालिकेला स्थापनेपासून अवघ्या तीन ते चार महिन्यांपुरते डॉ. सचिन जाधव हे वैद्यकीय अधिकारी लाभले होते. महाविकास आघाडीच्या सरकारमधील आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपे यांच्या विशेष कार्य अधिकारीपदी डॉ. जाधव यांची बदली झाल्यानंतर ते पद रिक्त होते. त्यानंतर कोविड काळात डॉ. राजेंद्र इटकरे आणि डॉ. सुनील नखाते यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता.
पनवेल संघर्ष समितीने प्रथम राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः संघर्ष समितीच्या अर्जावर स्वाक्षरी करून महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे अहवाल मागविला होता. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिकेच्या आरोग्य खात्याला तातडीने पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी द्यावा, अशी मागणी केली होती.
राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव संजय कुमार आणि आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना लेखी आदेश दिल्यानंतर पनवेल महापालिकेला अखेर वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. यामुळे कडू यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पनवेल संघर्ष समितीच्या रेट्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांना आणखी एक धोबीपछाड देण्यात कडू यशस्वी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here