शेतकऱ्यांनी बैलांप्रति केली कृतज्ञता व्यक्त; पुनद खोऱ्यात पोळा उत्साहात साजरा

0

महेश अशोक कुवर (प्रतिनिधी – कळवण तालुका) कळवण तालुक्यातील देसराणे येथे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीत बैलपोळ्याला खूप महत्त्व आहे. बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा हा सण उत्साहाने साजरा केला. पोळ्यानिमित्त शेतकर्यांनी बैलांना झुली घालून सजवले होते.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पोळा सण मंगळवार दि. १८ रोजी कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यात उत्साहात साजरा करण्यात आला.शेतकऱ्यांनी त्यांचा खरा सोबती असलेल्या बैलांना सजवून पुरणपोळीचा घास भरवित आपली कृतज्ञता व्यक्त केली. या सणानिमित्त शेतकऱ्यांनी  बैलांची केलेली सजावट लक्ष वेधणारी ठरली. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलाप्रती बळीराजा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी बैलांची उत्साहात सजावट केली. या सणाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांनी बैलांना नदी, ओढयात नेऊन खांदमळण केली. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झुल टाकून, शिंगे रंगवून, डोक्याला बाशिंग, मसाट्या, गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवे वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, घालून पोळ्याच्या ठिकाणी आणले. सायंकाळी पोळा फुटल्यानंतर घरोघरी बैल फिरविले. नागरिकांनीही ठिकठिकाणी बैलांची पुजा करून पुरणपोळीचा नैवेद्य भरविला.
बैल पोळा हा असा सण आहे, की या दिवशी शेतकरी आपल्यासाठी काम करणारे जे बैल आहेत त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचे पूजन करतो त्याच बरोबर इतर जनावाराचे पूजन करतो.बैल पोळयाच्या दिवशी त्यान्हा  कुठलेही काम लावले जात नाही.हीच ती भारतीय शेतकऱ्यांची पारंपरिक संस्कृती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here