राम मंदिराच्या भूमिपूजनाने ‘कोविड वनवास’ संपुष्टात येवो !

0

कांतीलाल कडू
…………………………………
प्रभू रामचंद्राचा वनवास संपला. अयोध्येतील राम लल्लाच्या जन्मभूमीचा वनवासही संपुष्टात आला. आता प्रतीक्षा आहे ती, कोविडमुळे संपूर्ण मानव जातीला भोगाव्या लागलेल्या वनवासाच्या मुक्तीची. प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवास भोगून अयोध्येत परतले, ही कल्पना सुखकर वाटावी अशी आहे. परंतु, कोविड साथ नुसती 14 महिने जरी टिकली तर पृथ्वीतलावर केवढा हाहाकार माजेल, याची कल्पना न केलेली बरी. म्हणूनच 5 ऑगस्टला अयोध्येत मंदिराचे भूमिपूजन होत असताना विश्वातील वायुमंडलाचे त्रिशुद्धीकरण व्हावे, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
कालाय तस्मैय नमः अर्थात कालप्रवाहाच्या दिशेने सृष्टीतही परिवर्तन घडत असते. मानवी देह धारण करून सातवा परिपूर्ण अवतार मानल्या गेलेल्या प्रभू रामाला वनवास यावा. त्याने तो आनंदाने भोगावा. संपूर्ण वनवासात सीता, लक्ष्मण, वानरसेना, पशु-पक्ष्यांनी साथ करावी हे सगळं अनाकलनीय होतं. वनवास या चार शब्दांमध्ये प्रंचड विध्वंस आहे. सरळसोट शब्द वाटत असला तरी तो विनाशाकडे घेवून जाणारा आहे. त्या शब्दांनी प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या सेनेलाही विनाशाकडे ओढले होतेच. पण तत्वांचा पुतळा असलेले रामचंद्र जीवनाच्या आदर्श प्रणालीपासून तसूभरही हटले नाहीत. तेच त्यांच्या विजयाचे कारण ठरले. आता आपल्यालाही न कचरता कोविडवर स्वार होऊन घोडदौड करायची आहे, तसूभरही मागे न हटता. हे भोग सरतील, फार काळ कोविड तग धरणार नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे हा निसर्ग नियम जसा आहे, तसंच जेव्हा जेव्हा महामारी आली आहे, तिने थोड्या फार प्रमाणात विध्वंस केला तरीही पराभूत होवून परतली आहे. ती कधीच अमरपट्टा घेवून येत नाही, आली नाही. तेव्हा ती जाणारच आहे. आकाशात उंच उंच जाणारा पंतग हेलखावे खातो आणि अचानक मांजा तुटून भरकटतो, तसे कोविडचे होईल.
नेमकी परिस्थिती उलटी आहे. राम वनवास भोगायला घरापासून खुप दूर गेला होता. आपला वनवास चार भिंतीच्या आत सुरू आहे. बाहेर कोविडचा सोनेरी मृग धावत आहे. लक्ष्मण रेषा, म्हणजे घराचा उंबरठा ओलांडला रे ओलांडला की कोविड अपहरण करतोच. सीतेचे अपहरण झाले तेव्हा रावणाने तिला पुष्पक विमानातून सोन्याच्या लंकेत नेले. कोविडने इथे परत उलटे गणित मांडले आहे. तो रूग्णवाहिकेतून थेट हॉस्पिटलमध्ये नेतो. तिथे श्वास गुदमरतो भीतीने, तेव्हा आपल्याच देहाची लंका जळत असल्याचा भास होतो आणि व्हेंटिलेटरवर ‘श्रीराम जय राम, जय जय राम’चा गजर हृदयाला रक्त पुरवठा करणारी वाहिनी आपोआप सुरू करते. असाही वनवासाचा एक प्रवाह आहे.
कोविड वनवास पूर्णतः थांबायलाच हवा. किमान राम लल्लाच्या मंदिराची नव्याने मुहूर्तमेढ रोवली जात असताना तरी कोविडची साथ आटोक्यात आली पाहिजे. नव्हे तर तिचा समूळ नाश झाला पाहिजे. रामसेतूचे दगड जसे समुद्रात तरंगले तसा हा सुद्धा चमत्कार व्हावा, अशी अपेक्षा त्यानिमित्ताने करणे काहीच गैर ठरणार नाही.
इंद्राने कुक्कुटाचे रूप घेवून मायेच्या अहिल्येचे सत्वहरण केले होते. गौतम ॠषी यांच्या शापामुळे ती अरण्यात शिळा होवून पडली होती. आज मानवजात त्याच चंचल इंद्राच्या (चीन) आततायीपणामुळे निर्जीव शिळा झाली आहे. तिचा उद्धार करण्यासाठी 5 ऑगस्टचा मुहूर्त ठरावा, असे मनापासून वाटते.
राम अयोध्येत परतत आहेत तर त्यांच्या उजव्या अंगुष्ठाचा स्पर्श कोविड रुग्णांना व्हावा, ही महामारीच संपुष्टात यावी. ती अधिक काळ राहिली तर अनेक समस्यांचा विळखा मानवी समुहाला गिळंकृत करेल.
रामाचा वनवास जसा आपल्या साऱ्यांच्या लक्षात आहे. आजची कोविडची साथही पुढची अनेक वर्षे विसरता येणार नाही. या दोन वनवासाला तिसरे टोकसुद्धा आहे. ते दुर्लक्षित करता येत नाही. त्या वनवासातील विलगीकरण ज्यांनी ज्यांनी भोगले आहे, त्यांच्या पुढे आजचा कोविडमुळे भोगावा लागलेला वनवास किंवा प्रभू रामाचा वनवास अगदीच क्षुल्लक आहे, असे मानावे लागेल.
हो, चौदाव्या शतकापासून ते अठराव्या, एकोणिसाव्या शतकापर्यंत साधारणतः चारशे वर्षे एका रोगामुळे जगात काही जणांना आयुष्यभर विलगीकरण पत्करावे लागले होते. त्या महामारीच्या साथीचे नाव आहे, कुष्ठरोग!
कुष्ठरोग झालेल्या माणसांना समाजाने तेव्हा नाकारले होते. कुटुंबाने हेटाळणी केली होती. फारकत घेतली होती. त्यांना कुणी जवळ करत नव्हते. ते असेच जंगलात मिळेल तिथे तोंड लपवून आसरा घेत होते. अंगावरचे कोड लपवितानाही त्यांना माणूस म्हणून स्वतःचा विसर पाडून घ्यावा लागला होता. नातीगोती गोठली होती. विश्वाच्या निर्मीतीपासूनचे ते सर्वात मोठे त्यांच्यासाठी विलगीकरण केंद्र ठरले होते.
महाराष्ट्रात आनंदवनातील मसिहा बाबा आमटे यांनी गेल्या शतकात त्यांचे पालकत्व स्वीकारले. त्यांना मायेचा हात दिल्याने समाजाने त्यांचीही हेटाळणी केली. साधनाताई आणि बाबांनी दगडधोंडे खावून त्यांना आधार दिला. हे अलीकडचे वास्तव आहे. पण ही वैश्विक महामारी चारशेहून अधिक वर्षे टिकली. त्यामुळे त्या रुग्णांना जो वनवास भोगावा लागला तो न भूतो, न भविष्यती असाच आहे.
काळ बदलत असतो, परिस्थिती फार बदलते असे दिसत नाही. कुष्ठरुग्णांना जी वागणूक त्या काळच्या समाजाने दिली, त्यापेक्षा वेगळा व्यवहार आज कोविड रुग्णांशी काय होत आहे. कोविड बाधित आहे म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीचा चेहरा पडतो. शेजारचे दरवाजे आपोआप बंद होतात. एरव्ही फोनवरून खुशाली तरी विचारली जात होती. एकदा का पॉझिटिव्ह आला की, आप्तस्वकीयांचीही नकारात्मकता वाढीस लागते. तेसुध्दा टाळू लागतात. घरात चार टाळकी असतील तेच त्या रुग्णांचे विश्व बनते. इतर सारे विश्व मायाजाळ ठरते. हा तोच तो वनवास आहे. जो रामाने भोगला, अहिल्येला भोगावा लागला. कुष्ठरुग्णांच्या वाट्याला आला, त्याचाच एक भाग आहे ‘कोविड वनवास’.
तो मुळासहित उखडला जावा. तो अजून काही महिने मुक्कामी राहिला तर माणूस पुन्हा जगणं विसरून जाईल आणि म्हणूनच राम जन्मभूमीचा वनवास संपत असताना कोविड वनवासही लयास जावा, हीच मर्यादा पुरुषोत्तमाच्या चरणी प्रार्थना.
(दै. निर्भीड लेख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here