नाशिक : हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१, रायगड चौक, सिडको शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी मुख्याध्यापिका काजल शर्मा हिच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आपल्या मनोगतांतून प्रकाश टाकत विनम्र अभिवादन केले. विद्यार्थी शिक्षकांनी कृतज्ञता म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांना लेखणी भेट देऊन शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी मात्र वाढत्या अशैक्षणिक कामांचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून संपूर्ण दिवसभर कामकाज केले.आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने शाळेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थी शिक्षकांनी पार पाडले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून जी भूमिका पार पाडली तो आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.उपक्रमाचे नियोजन शिक्षिका प्रमिला देवरे व विनोद मेणे यांनी केले. तर उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली किसन काळे, शोभा मगर, कविता वडघुले, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, संध्या जाधव, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, प्रविण गायकवाड यांनी परिश्रम घेतले.








