मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते महिला कक्षाचे उद्घाटन

0

मनमाड : दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत महाविद्यालयात स्वतंत्र महिला कक्ष उभारण्यात आला. या कक्षाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त तथा मधुरा ट्रस्टच्या अध्यक्षा व उद्योजिका मा. संपदा दीदी हिरे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, महाविद्यालयात सुरू होणाऱ्या स्वतंत्र महिला कक्षाच्या माध्यमातून मुलींच्या मूलभूत सुविधा निर्माण होण्यास मदत झाली असून येणाऱ्या काळात महिला कक्षाची अनिवार्यता असेल. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मुलींनी करिअरकडे लक्ष दिले पाहिजे. कोरोना महामारीच्या काळात सुमारे अनेक महिलांना वैधव्य आले, अनेकांनी आपले पती गमावले. अशा बिकट परिस्थितीत त्या महिला आर्थिक सक्षमतेअभावी हातबल झाल्या, त्यांना आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागले. जर अशा परवडीच्या काळात महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असत्या तर पती निधनानंतरही त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने आपली रोजी रोटी चालवली असती. कुठेतरी धुणीभांडी करणे, झाडलोट करणे यापेक्षा महाविद्यालयातील वयापासूनच मुलींनी करिअर कडे लक्ष दिले तर भविष्यात निराधार होण्याची वेळ येणार नाही. यावेळी त्यांनी मधुरा ट्रस्टच्या माध्यमातून महिलांसाठी जे जे उपक्रम चालतात त्या त्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. गरजू महिलांनी मधुरा ट्रस्टची संपर्क साधावा असे आवाहनही संपदा दीदी यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी महिला विकास समितीच्या माध्यमातून जे उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमांची माहिती दिली. महिला व मुलींचे आरोग्य, मुलींच्या स्वसंरक्षणार्थ जुदो कराटे स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आल्याचे प्राचार्य पाटील यांनी सांगितले.आज प्रत्यक्षात मुलींची गुणवत्ता मुलांपेक्षा सरस असून मनमाड महाविद्यालय देखील मुलींच्या भविष्यकालीन करिअरला सामोर ठेवून गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा कविता काखंडकी यांनी आपल्या प्रास्ताविकातून महिला विकास कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली व कार्यक्रमाच्या उद्घाटक व प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती संपदा दीदी हिरे यांचा परिचय करून दिला.याप्रसंगी व्यासपीठावर वुमन्स वेल्फेअरच्या सदस्या व चीफ ऑफिसर ऑफ अकॅडमी अँड एक्झाम सेक्शन च्या माननीय श्रीमती दिप्ती भुतडा, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती अलका ताई शिंदे, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोद आंबेकर, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, किमान कौशल्य विभागाचे प्रशांत बच्छाव, कुलसचिव श्री समाधान केदारे व महिला पक्षाचे अध्यक्ष प्रा कविता काखंडकी उपस्थित होते. शहरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या श्रीमती स्वाती गुजराती, श्रीमती डॉ.निधी भन्साळी,श्रीमती सुनिता महाले, श्रीमती स्वाती मुळे, एडवोकेट आम्रपाली निकम, एडवोकेट फरिदा मिठाईवाला, डॉ. वर्षा झाल्टे, श्रीमती विनया काकडे, श्रीमती वैशाली चोरडिया,रक्षा बेदमुथा,श्रीमती राणी भंडारी, श्रीमती वैशाली वाणी, श्रीमती येणारी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत गीत महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातल्या वाणिज्य शाखेच्या प्रा. आरती छाजेड यांनी केले. तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here