वृत्तपत्र लेखकांनी पेनाची निब बोथट होऊ न देता निर्भीडपणे लिहावे – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे

0

मुंबई : वृत्तपत्र लेखकांशी आमचे तीन पिढ्यांचे नाते आहे. तर सहावी पिढी लोकांमध्ये काम करते आहे. आम्हा ठाकरे कुटुंबियांना पत्रकारितेच्या सोबत कलेचाही वारसा आहे. त्याची नोंद इतिहासात आहे. साहजिकच तुम्ही आणि आम्ही लोकांसाठी काम करतो आहोत. तुम्ही मला पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह भेट दिलेत, पेनाची टोकदार निब महत्वाची असते. तुम्ही निर्भीडपणे लिहितात ती कधीही बोथट होऊ देऊ नका. बाळासाहेबांचे व्यंगचित्रांचे ‘फटकारे’ नावाचे पुस्तक आहे, त्यावर फटका मारणारा वाघाचा पंजा आहे. वृत्तपत्र लेखक सुद्धा समाजातले व्यंग शोधून बोचकारत असतो, साहजिकच बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी जसे राजकारणी दुखावतात तसे तुम्ही व्यक्त केलेल्या मतांनीही आम्ही राजकारणी आणि प्रशासन घायाळ होते. परंतु त्याला एक अर्थ आहे. जे पटत नाही ते निस्पृहपणे आणि निर्भीडपणे जाहीररीत्या सांगणे हे तुमचे महत्वाचे काम आहे ते तुम्ही ‘कर नाही त्याला डर कशाला’ या भावनेने लिहीत राहा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मातोश्री येथे कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, आमदार नितीन बानूगडे पाटील, आमदार रवींद्र वायकर, चंद्रकांतमामा वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुनिल कुवरे आणि दिलीप ल सावंत यांना यंदाचा जीवन गौरव तर नवशक्तीचे कार्यकारी संपादक प्रकाश सावंत, संस्थेचे माजी प्रमुख कार्यवाह आणि वृत्तमानसचे सहसंपादक सुनिल रमेश शिंदे यांचा चळवळीतील योगदानाबद्दल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राजन देसाई यांनी संपादित केलेल्या ‘”शिवसेना आणि मराठी माणूस” हे वृत्तपत्र लेखकांनी व्यक्त केलेले ई पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.सध्याचे देशभरचे वातावरण पाहाता अघोषित आणीबाणी आहे की काय अशी परिस्थिती आहे, इंदिरा गांधींनी आणीबाणी देशावर लादली होती परंतु ती घोषित आणीबाणी होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी आणीबाणीला पाठिंबा दिला होता तरी मार्मिकसह सर्व वर्तमानपत्रांवर आणि विचार स्वातंत्र्यावर बंधने होती. आजच्या प्राप्त परिस्थितीत मतस्वातंत्र्य मानणाऱ्यांची मग ती प्रिंट मीडिया असो वा अलीकडच्या सोशल मीडियावर तात्काळ व्यक्त होणे असो यांची जबाबदारी वाढली आहे. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारी ही वृत्तपत्र लेखकांची चळवळ आणि तुम्ही जुनी जाणती परंतु समाजातील जागती मंडळी आज माझ्यासमोर आहात. बाळासाहेब मला नेहमी सांगायचे लोकांना काय पाहिजे हे समजण्यासाठी एकवेळ तू अग्रलेख वाचू नकोस परंतु सामान्य माणसांचा आवाज असलेली वाचकांची पत्रे जरूर वाच. तुमच्या जागेची अडचण आहे तेव्हा हे जागल्यांचे व्यासपीठ अबाधित ठेवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. असे आश्वासनही उध्दव ठाकरे यांनी दिले.
सध्याच्या राजकीय परिस्थिती वर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी देशभर इतर पक्षांना भारतीय जनता पक्ष अस्पृश्य होता तेव्हा शिवसेनेने हात पुढे करून त्यांच्याशी युती केली. नंतर ती वाढत गेली आणि जवळ गेलेले दुरही होत गेले. आम्हाला म्हणतात तुम्ही मोदींचा फोटो लावून निवडून आलात तर आता बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय मते मिळणार नाहीत आता मोदी महाराष्ट्रात चालणार नाहीत हे तुम्हाला उमगले आहे.
सुरुवातीला प्रस्तावना करताना संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ऋणानुबंध मराठी वृत्तपत्र लेखक संघाशी १९४९ च्या पहिल्या जमका संमेलनापासून कसे दृढ होते याचे अनेक दाखले दिले. संस्था आणि वृत्तपत्र लेखक अडचणीच्या काळातही नाउमेद न होता कसा कार्यक्रम-उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यशील आहे. हे आपल्या भाषणात सांगताना मालुसरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने संस्था भविष्यात कार्यरत राहावी यासाठी उद्धव साहेबांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यानिमित्त ज्या ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकांनी स्वातंत्र्याची पहाट पाहिली असे ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक
मधू शिरोडकर, वि अ सावंत, श्रीनिवास डोंगरे, मधुकर कुबल,अनंत आंगचेकर, श्रीमती मंदाकिनी भट, डॉ दिलीप साठ्ये, कृष्णा ब्रीद, ऍड मनमोहन चोणकर, कृष्णा काजरोळकर, प्रकाश बाडकर यांचा सन्मान उध्दवजींच्या हस्ते करण्यात आला.संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख राजन देसाई यांनी केले. कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, माजी अध्यक्ष विजय कदम, माजी अध्यक्ष प्रकाश नागणे, अरुण खटावकर, प्रशांत भाटकर, चंद्रकांत पाटणकर, दिगंबर चव्हाण, सतीश भोसले, पंकज पाटील, सुनिल कुडतरकर, दत्ताराम गवस, नारायण परब यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here