बालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणणं हे या पंधरवडयाचं उद्दिष्ट

0

दिल्ली : तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा २०२२ या उपक्रमाचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते काल आरंभ झाला. बालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणणं हे या पंधरवडयाचं उद्दिष्ट आहे.हे उद्दिष्ट गाठण्यासाठी जनजागृती, शालेय स्तरावर स्पर्धांसारखे उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावरील बहु- क्षेत्रीय सहभाग लाभदायी ठरेल असं डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितलं. हा कार्यक्रम २७ जूनपर्यंत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या उल्लेखनीय प्रयत्नांमुळे, देशातल्या बालमृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटलं आहे, हा दर २०१२ मधल्या प्रति १ हजार बालकांमागे ४५ वरून २०१९ मध्ये प्रति १ हजार बालकांमागे ३५ इतका कमी झाला आहे. मात्र अजूनही पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूमागे अतिसार संबंधित रोग हे एक मोठे कारण आहे, असं डॉ. भारती पवार म्हणाल्या.
अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण किमान पातळीवर आणण्यासाठी डॉ पवार यांनी अधिकाधिक जनजागृती मोहिमांवर भर दिला. उन्हाळा आणि मान्सूनमध्ये होणारा अतिसाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालावधीत हा पंधरवडा आयोजित केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. शुद्ध पेय जलाचे सेवन, स्तनपान किंवा योग्य पोषणयुक्त आहार, स्वच्छता आणि हात धुण्यासारख्या स्वच्छतेच्या सवयी अतिसाराला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे डॉ पवार म्हणाल्या. स्वच्छ भारत मिशनसारख्या उपक्रमातूनही यावर भर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here