ग्रामपंचायत ग्रामसूची किंवा अनुसूची-१ (ग्रामपंचायत कामाचे विषय – विकास विषयक कामे) विषयीची सविस्तर माहिती

0

ग्रामपंचायत ग्रामसूची किंवा अनुसूची-१ (ग्रामपंचायत कामाचे विषय – विकास विषयक कामे) विषयीची सविस्तर माहिती – जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४५ नुसार ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये आपण मागील लेखामध्ये पाहिले, जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सामान्य नियंत्रणाच्या अधीन, पंचायतीच्या स्वाधीन असलेल्या ग्रामनिधीतून करता येईल तेथवर गावात पोटकलम (२) अन्वये वेळोवेळी दुरुस्त करण्यात आलेल्या अनुसूची १ मध्ये ( जिचा या अधिनियमात “ग्रामसुची” असा उल्लेख करण्यात आला आहे) नमूद केलेल्या विषयांपैकी सर्व किंवा कोणत्याही विषयाबाबत वाजवी तरतूद करणे हे पंचायतीचे कर्तव्य असेल.ग्रामपंचायत ग्रामसूची किंवा अनुसूची-१ (ग्रामपंचायत कामाचे विषय – विकास विषयक कामे) विषयीची सविस्तर माहिती ग्रामसूची किंवा अनुसूची – १:ग्रामसूची या अधिनियमाचे अनुसूची १ मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये ७८ विषय असून, त्यांची विभागणी खालील भागात केलेली आहे. १) कृषी, २) पशुसंवर्धन ३) वने, ४) समाज कल्याण, ५) शिक्षण, ६) वैद्यकीय आणि आरोग्य, ७) इमारती व दळणवळण, ८) पाटबंधारे, ९) उद्योगधंदे व कुटीर उद्योग, १०) सहकार, ११) स्वसंरक्षण व ग्राम संरक्षण, १२) सामान्य प्रशासक..ग्रामसुची राज्यसरकारने अ.नं. १८-अ, ४३-अ आणि ७३-अ यामध्ये दिलेल्या विषयांची भर टाकली आहे.ग्रामपंचायत कामाचे विषय – विकास विषयक कामे:हि अनुसूची सन १९६५ चा अधिनियम क्रमांक ३६, कलम ७७ अन्वये दाखल करण्यात आली. कृषी :(१) जमिनी आणि गावातील इतर साधनसंपत्ती यांची सहकारी व्यवस्थापनासाठी व्यवस्था करणे, सामुदायिक सहकारी शेतीची संघटना.(२) शेतीची सुधारणा (अवजारे आणि भांडार यांची तरतूद धरून) आणि आदर्श कृषी क्षेत्राची स्थापना.(३) शासनाने पंचायतीकडे विहित केलेल्या पडीत आणि ओसाड जमिनी लागवडीखाली आणणे. (४) पडीत जमीन चे पुनःप्रापण आणि राज्य सरकारच्या पूर्वपरवानगीने पडीत जमीन लागवडीखाली आणणे. (५) सुधारलेल्या बी-बियाण्यांचे उत्पादन करण्याकरता रोपळयांची स्थापना करणे आणि त्यांची व्यवस्था ठेवणे आणि सुधारलेल्या बी-बियाणांच्या उपयोगास उत्तेजन देणे.(६) पिकासंबंधी प्रयोग.
(७) पिक संरक्षण.(८) खतांची साधन संपत्ती सुरक्षित ठेवणे, मिश्र खत तयार करणे आणि खतांची विक्री करणे.(९) कृषी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने गावांमध्ये लागवडीचे किमान प्रमाण ठरवणे. (१०) जमीन सुधारणा योजना कार्यान्वित करण्यास सहाय्य करणे.(११) धान्यागारांची स्थापना करणे. पशुसंवर्धन: (१२) गुरांची आणि त्यांच्या पैदाशीची सुधारणा करणे आणि पशुधनाची सर्वसामान्य काळजी घेणे. वने (१३) ग्राम वन आणि गायराने वाढवणे, त्यांचे जतन करणे, त्यात सुधारणा करणे आणि त्यांच्या उपयोगाचे नियमन करणे, आणि त्यात भारतीय वन अधिनियम, १९२७, कलम २८ अन्वये नेमून दिलेल्या जमिनींचा समावेश होईल. समाज कल्याण: (१४) अपंग, निराश्रित आणि आजारी असलेल्यांना सहाय्य देणे. (१५) गावाचे सामाजिक व नैतिक कल्याण यांची वाढ करणे, यात दारूबंदीला उत्तेजन देणे, अस्पृश्यता निवारण, मागास वर्गाची स्थिती सुधारणे, लाचलुचपतीचे उच्चाटन करणे आणि जुगार व कायदे विषयक निरर्थक वादास आळा घालणे या गोष्टींचाही समावेश होतो. (१६) महिलांच्या आणि मुलांच्या संघटना आणि त्यांचे कल्याण. शिक्षण: (१७) शिक्षणाचा प्रसार करणे. (१८) इतर शैक्षणिक व सांस्कृतिक उद्देश. (१८-अ) त्या त्या वेळी जिल्हा परिषदेकडे निहीत असलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतींची व्यवस्था ठेवणे व दुरुस्ती करणे. (१९) शाळांकरता सामग्री आणि क्रीडांगणे यांची तरतूद करणे. (२०) प्रौढ साक्षरता केंद्रे, ग्रंथालये व वाचनालये.
(२१) ग्रामीण विमा. वैद्यकीय आणि आरोग्य: (२२) वैद्यकीय मदतीची तरतूद करणे. (२३) प्रसूती आणि शिशु कल्याण. (२४) आरोग्य रक्षण व सुधारणा.
(२५) कोणत्याही संक्रमक रोगाचा उद्रेक, फैलाव किंवा पुनरुद्भव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे. (२६) माणसांना आणि प्राण्यांना देवी प्रतिबंधक लस टोचण्यास उत्तेजन देणे. (२७) चहा, कॉफी आणि दुधाच्या दुकानांचे लायसन्स द्वारे किंवा अन्यथा नियमन करणे. (२८) कत्तलखाने बांधणे सुस्थितीत ठेवणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे. (२९) सार्वजनिक रस्ते, गटारे, बांध, ( जलसिंचनासाठी वापरात येणारी तळी व विहिरी सोडून) तळी व विहिरी आणि इतर सार्वजनिक जागा किंवा बांधकामे स्वच्छ करणे. (३०) आरोग्यविघातक वस्त्यांची सुधारणा करणे. (३१) केरकचरा, माजलेले रान, काटेरी निवडूंग काढून टाकणे, वापरात नसलेल्या विहिरी, आरोग्यास अपायकारक तळी, डबकी, खंदक, खड्डे, खाच-खळगे भरून काढणे, पाट बंधाऱ्याच्या क्षेत्रात पाणी साचण्यास प्रतिबंध करणे आणि इतर आरोग्य रक्षणविषयक सुधारणा करणे. (३२) सार्वजनिक शौचकुप बांधणे व ते सुस्थितीत ठेवणे.
(३३) स्वच्छता, साफसफाई, उपद्रव होऊ न देणे व तो कमी करणे व बेवारशी प्रेतांची व मेलेल्या जनावरांच्या सांगाड्यांची विल्हेवाट लावणे. (३४) घरगुती उपयोगासाठी व जनावरांसाठी पाण्याचा पुरवठा करणे.
(३५) गुरांना पाणी पुरवठा करण्याकरिता तळी खणणे, ती स्वच्छ करणे व सुस्थितीत राखणे. (३६) ज्यांची कोणत्याही प्राधिकरणाकडून व्यवस्था ठेवण्यात येत नसेल अशा स्नानाच्या व धुण्याच्या घाटांची व्यवस्था ठेवणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे. (३७) दहनभूमी व दफनभूमी यांची तरतूद करणे, त्या सुस्थितीत राखणे व त्यांचे नियमन करणे. इमारती व दळणवळण (३८) सार्वजनिक इमारती, पंचायतीमध्ये निहित असलेली किंवा पंचायतीच्या नियंत्रणाखाली असलेली ( जलसिंचनासाठी वापरण्यात येत असलेली तळी व विहिरी यांच्या व्यतिरिक्त इतर) तळी व विहिरी व सुस्थितीत राखणे व त्यांच्या उपयोगाचे नियमन करणे.
(३९) सार्वजनिक रस्ते किंवा जागा व खाजगी मालमत्ता सर्व लोकांस वापरण्याची मुभा असेल अशा जागा….. मग अशा जागा पंचायतीमध्ये निहित असोत किंवा सरकारच्या मालकीच्या असोत…… यातील अडथळे व पुढे आलेले भाग काढून टाकणे. खाजगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही गायरानावर किंवा कोणत्याही इतर जमिनीवर अनधिकृतपणे लागवड केलेले कोणतेही पीक काढून टाकणे.  (४०) सार्वजनिक रस्ते, गटारे, बांध व पुल बांधणे, सुस्थितीत राखणे व दुरुस्त करणे.
(४१) रस्त्याच्या बाजूस, बाजारांच्या जागांत व तसेच इतर सार्वजनिक जागांत झाडे लावणे, त्यांची जोपासना व रक्षण करणे. (४२) क्रीडांगणे, सार्वजनिक उपवने व तळ देण्यासाठी जागेची तरतूद करणे व ती सुस्थितीत राखणे.
(४३) धर्मशाळा बांधणे व त्या सुस्थितीत राखणे.
(४३-अ) भूमिहीन मजूर आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निराधिसूचित जाती, भटक्या जाती आणि इतर मागास वर्ग यातील व्यक्ती यांच्यासाठी झोपड्या आणि घरे बांधणे. (४४) गावठाणांचा विस्तार आणि विहित करण्यात येतील अशा तत्वानुसार इमारतीचे नियमन करणे. (४५) गावात दिवाबत्ती करणे. पाटबंधारे: (४६) लहान पाटबंधारे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (४६-अ) सर्व प्रकारच्या पाणीपुरवठा सुविधा, स्त्रोत, योजना संबंधीची निश्‍चिती, नियोजन, संकल्पन, बांधकाम, अंमलबजावणी, कार्यान्वयन, देखभाल व दुरुस्ती, फेर बांधकाम, व्यवस्थापन व इतर आनुषंगिक सर्व बाबी. (४६-ब) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व पाण्याच्या उद्दभवांचा एकात्मिक विकास, व्यवस्थापन आणि नियमन.उद्योगधंदे व कुटीर उद्योग:(४७) कुटीर उद्योग व ग्रामोद्योग यांचे संवर्धन करणे, त्यांच्या सुधारणा करणे व त्यांना उत्तेजन देणे. सहकार: (४८) पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांची संघटना करणे. (४९) सहकारी शेतीचे संवर्धन करणे. स्वसंरक्षण व ग्राम संरक्षण (५०) गावात राखण व पहारा ठेवणे: परंतु, राखण व पहारयासाठी होणारा खर्च विहित करण्यात येईल अशा गावातील व्यक्तीवर व अशा रीतीने पंचायत आकारील व तो त्यांच्याकडून वसूल करील. (५१) ग्रामस्वयंसेवक दल आणि संरक्षक कामगार बँक.(५२) आग विझवण्यास सहाय्य देणे व आग लागली असता जीवित व मालमत्ता यांचे संरक्षण करणे. (५३) उपद्रवकारक किंवा धोकादायक व्यवसाय किंवा व्यापार यांचे नियमन करणे किंवा त्यांचे उपशमन करणे. सामान्य प्रशासक: (५४) पंचायतीचे अभिलेख तयार करणे, सुस्थितीत ठेवणे व त्यांची निगा ठेवणे. (५५) जागांना क्रमांक देणे.
(५६) सरकार, सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे या संबंधात विहीत करील अशा रीतीने व अशा नमुन्यात विवाह यांची नोंद ठेवणे. (५७) कलम १६९ अन्वये जेव्हा राज्य सरकारने सोपवले असेल तेव्हा जमीन महसूल वसूल करणे.(५८) जमीन महसूलासंबंधीच्या कोणत्याही विधिअन्वये वेळोवेळी विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि नमुन्यात जमीन महसूलासंबंधी गावाचे अभिलेख सुस्थितीत ठेवणे. (५९) ग्रामविकासासाठी योजना तयार करणे. (६०) गावातील कृषी उत्पादन व कृषीतर उत्पादन वाढविण्यासाठी कार्यक्रम आखणे.
(६१) ग्रामविकास योजना अमलात आणण्याकरता आवश्यक असलेला पुरवठा व वित्त व्यवस्था दर्शविणारी विवरणपत्रे तयार करणे. (६२) कोंडवाडे स्थापन करणे, त्यांवर नियंत्रण ठेवणे व त्यांची व्यवस्था पाहणे.
(६३) भटक्या व बेवारशी कुत्र्यांचा आणि डुकरांचा नाश करणे.(६४) बेवारशी गुरांची विल्हेवाट लावणे.
(६५) पंचायतीच्या साफसफाई करणाऱ्या सेवक वर्गासाठी घरे बांधणे व ती सुस्थितीत राखणे.
(६६) गावातील ज्या तक्रारी पंचायतीकडून दूर करण्याजोग्या नसतील त्या योग्य प्राधीकाऱ्यांना कळवणे. (६७) भूमापन करणे. (६८) कोणत्याही प्रयोजनासाठी केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने दिलेले सहाय्य ज्याचा द्वारा गावांपर्यंत पोहोचू शकेल असे माध्यम म्हणून कार्य करणे. (६९) जत्रा, यात्रा, व उत्सव सुरू करणे चालू ठेवणे व त्यांचे नियमन करणे.
(७०) बाजार स्थापन करणे व ते सुस्थितीत राखणे, परंतु जिल्हा परिषदेची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय बाजार स्थापन करता कामा नये. (७१) जत्रा, बाजार, टांगातळ व गाडीतळ यावर नियंत्रण ठेवणे. (७२) बखारी स्थापन करणे व त्या सुस्थितीत राखणे. (७३) टंचाईच्या काळात कामे सुरू करणे व ती चालू ठेवणे किंवा लोकांना रोजगार पुरवणे. (७३-अ) पंचायतीने हाती घेतलेल्या किंवा स्वीकारलेल्या किंवा पंचायतीकडे हस्तांतरित केलेल्या कोणत्याही रोजगार हमी योजनेखालील शारीरिक श्रमाचे काम शोधणाऱ्या गरजू स्थानिक लोकांना रोजगार पुरवणे. (७४) बेकारीबाबत आकडेवारी तयार करणे. (७५) कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली असता रहिवाशांना सहाय्य देणे. (७६) सामुदायिक कामांसाठी आणि ग्रामोद्धाराच्या कार्यसाठी श्रमदानाची कामे आयोजित करणे. (७७) रास्त भावाची दुकाने उघडणे. (७८) जनावरे, थांबण्याच्या जागा, खळी, गायराने व सामुदायिक जमिनी यांवर नियंत्रण ठेवणे.
(७९) आवश्यक असेल तेथे, डाक व तार विभागास ना परतावा अंशदान देण्याची तरतूद करून गावातील प्रायोगिक डाकघरांच्या डाक सवलती मिळवणे किंवा चालू ठेवणे.नोंद ७९ ही शासकीय अधिसूचना, ग्रामविकास विभाग, क्रमांक व्हीपीए १२६६/१७३७-ई, दि. २० फेब्रुवारी १९६९ अन्वये जादा दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here