मुंबई -मलबार हिल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
संवेदनशील साहित्यिक हा आपल्या साहित्यामध्ये समाजातील वास्तववादी बाबींचे वास्तवदर्शी चित्रण करत असतो. समाज आजही त्यांना सन्मानाच्या नजरेतून पाहतो. अनेक प्रभावशाली साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये बहुमोल असे योगदान दिले आहे. सामान्य लोकांना त्याच बरोबर राजकारणी लोकांनाही बराच वेळा न दिसणाऱ्या व न कळणाऱ्या गोष्टी समाजाला दिशा देण्यासाठी साहित्यिक आपल्या लेखणीतून समाजापुढे मांडत असतात. सध्या साहित्यिकांमध्ये काही लोक भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या काळामध्ये साहित्यिकांनी निर्भय होऊन वास्तववादी लेखन करावे असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री मा. ना. धनंजय मुंडे यांनी केले, ते ज्येष्ठ कवयित्री व कथाकार रंजना सानप लिखित रानफुले या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलत होते. मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे हे होते. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश्वर तेटांबे म्हणाले, कविता व कथा या समाज बदलाच्या प्रभावी माध्यमा पैकी एक माध्यम आहेत. रंजना सानप यांनी आपल्या कथांमधून बालसाहित्याला पोषक असे वातावरण तयार केले आहे. रानफुले हा एका वेगळ्या धाटणीचा कथासंग्रह असून तो वाचकांना नक्की आवडेल असे मत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजया कांबळे, रघुनाथ नागरगोजे, मनीष व्हटकर, निर्मिती प्रकाशनाचे प्रकाशक अनिल म्हमाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लेखिका रंजना सानप यांचा मा. ना. धनंजय मुंडे व राजश्री मुंडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन निर्मिती प्रकाशने केले होते. कार्यक्रमास राजश्री मुंडे, आदर्श सानप, आबासो वंजारी, मुक्ती साधना, उत्कर्ष शिंदे, आदित्य म्हमाने, विजय कोरे यांच्यासह वाचक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले तर आभार मनिष व्हटकर यांनी मानले.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे,(चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार)
9082293867