नाशिक : राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीचे देवळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देवळ्याचे तहसीलदार विजय सुर्यवंशी यांना देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की,भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसींची जनगणना करण्यात आलेली नाही. देशाच्या अर्थसंकल्पात ओबीसींसाठी स्वतंत्र तरतूद करण्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. गेली 70 वर्षे ओबीसींच्या संघटना राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करीत असून सरकार या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. 50 टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ओबीसी समूहाच्या विकासाच्या योजना आखण्यासाठी ओबीसींच्या जनगणनेची नितांत आवश्यकता आहे.
ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या आधारेच अर्थसंकल्पीय तरतूद होऊ शकते. गेल्या 70 वर्षांत ओबीसींना देशाच्या अर्थसंकल्पात 50 % लोकसंख्या असलेल्या ओबीसींना त्यांचा हक्काचा न्याय्य वाटा हिस्सा मिळालेला नाही.प्रदीर्घ लढ्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले आहे. मात्र सातत्याने ओबीसी आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून आरक्षण विरोधी शक्ती ते आरक्षण संपवण्याचा डाव खेळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा एम्पीरिकल डेटा मागितला असून केंद्र सरकारने डेटा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. ओबीसींचे सर्व क्षेत्रातील आरक्षण वाचवायचे असेल तर राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेतून निर्माण झालेला डेटा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात सुटणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या भूमिकेचा फेरविचार केला पाहिजे. राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना केली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करीत आहे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सदर निवेदनाद्वारे आम्ही देत आहोत. निवेदनावर मालेगाव जिल्हा उपाध्यक्ष बाळा जाधव,देवळा तालुका अध्यक्ष राहुल बच्छाव, महासचिव किरण बच्छाव, विकिराज अहिरे,दीपक अहिरे,दादा अहिरे,योगेश मोरे,दीपक जमदाडे,गौरव संसारे,अनिल पवार,वसंत देवरे,राहुल जाधव,अतुल बनसोडे,भाऊसाहेब चव्हाण,दीपक निरभवने,बाळा जमदाडे आदींच्या सह्या आहेत.
Home Breaking News राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीचे देवळा तालुका वंचित...