जनजागरण, चाचण्‍यांची संख्‍या वाढविणे व लसीकरण यावर भर दयावा – आ. सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई – चंद्रपूर जिल्‍हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने ऑक्‍सीजन बेड, व्‍हेंटीलेटर बेडस्रची संख्‍या वाढविणे, चाचण्‍यांची संख्‍या वाढविणे, व्‍यापक जनजागरण करणे,  नागरिकांच्‍या सोईच्‍या द़ष्‍टीने कॉल सेंटर तयार करणे,  आर.टी.पी.सी.आर. चाचण्‍यांचे रिपोर्ट 24 तासाच्‍या आत मिळावे, ग्रामीण भागात जिल्‍हा परिषदेंच्‍या शाळांमध्‍ये सर्व सुविधांनीयुक्‍त विलगीकरण केंद्र तयार करण्‍यात यावे अशा विविध सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांना केल्‍या.दिनांक ४ मे 2021 रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्‍याशी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, महापौर सौ. राखी कंचर्लावार,  उपमहापौर राहुल पावडे, मनपा स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा आयुक्‍त राजेश मोहीते आदींची उपस्थिती होती.जिल्‍हयातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या द़ष्‍टीने काही महत्‍वाच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केल्‍या. रूग्‍णांना 12-12 तास रूग्‍णवाहीकेत बसुन हॉस्‍पीटलमध्‍ये आपल्‍यासाठी बेड शोधावा लागत आहे, ऑक्‍सीजन बेड मिळत नाही,  आय.सि.यु. बेड मिळत नाही, व्‍हेंटीलेटर बेड मिळत नाही आणि या प्रसंगामध्‍ये गोरगरीबांना प्रचंड मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे ऑक्‍सीजन बेड, व्‍हेंटीलेटर बेडची संख्‍या वाढविण्‍याची आवश्‍यकता आहे, अनेक ठिकाणी आर.टी.पी.सि.आर. चाचणी केल्‍यानंतर 24 तासात त्‍याचा रिपोर्ट मिळत नसल्‍याचे दिसुन येत आहे, तो रूग्‍ण निगेटीव्‍ह आहे की, पॉझीटीव्‍ह आहे हे पाच दिवसांनी त्‍याला कळतेञ याचा परिणाम म्‍हणजे तो रूग्‍ण कोरोनाचा प्रसार इतरांमध्‍ये करणारा वाहक होतो. याद़ष्‍टीने 24 तासाच्‍या आत सदर चाचणीचा रिपोर्ट मिळालाच पाहीजे अशी व्‍यवस्‍था करण्‍याची आवश्‍यकता आहे, टोल फ्री नंबरच्‍या माध्‍यमातुन त्‍वरेने उपलब्‍ध बेडच्‍या संदर्भामध्‍ये सहजपणे माहिती उपलब्‍ध होईल अशी व्‍यवस्‍था करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍याचप्रमाणे रूग्‍णांच्‍या नातेवाईकांना अन्‍य वैदयकीय मदतीच्‍या दृष्‍टीने सुविधा उपलब्‍ध व्‍हाव्‍या यासाठी कॉल सेंटरची नितांत आवश्‍यकता आहे. औषधांची उपलब्‍धता हा महत्‍वाचा विषय असुन कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता पुढील दोन म‍हिन्‍यांसाठी साठा करता येईल काय याचा विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे. रेमिडीसीवीर व अन्‍य इंजेक्‍शन्‍स तसेच जीवनरक्षक समजल्‍या जाणा-या अन्‍य औषधांचे योग्‍य नियोजन करण्‍याची आवश्‍यकता आहे.  चंद्रपूर जिल्‍हयात अॅन्‍टीजन टेस्‍ट किटच्‍या अभावामुळे नागरिकांना कोरोना चाचणी करण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍या आहेत. अनेक केंद्रावर अॅन्‍टीजन टेस्‍ट किट संपल्‍याचे नागरिकांना सांगीतल्‍या जाते. याबाबतच्‍या अनेक तक्रारी सातत्‍याने प्राप्‍त होत आहेत. त्‍यामुळे जिल्‍हयात अॅन्‍टीजन टेस्‍ट किटचा योग्‍य पध्‍दतीने पुरवठा होण्‍याच्‍या द़ष्‍टीने नियोजन करणे आवश्‍यक आहे. कोरानाचे वाढते संकट लक्षात घेता भविष्‍यातील तयारीच्‍या दृष्‍टीने जिल्‍हयातील सा-या सभाग़हांची यादी तयार करणे, हॉटेल्‍सची यादी तयार करणे, सार्वजनिक समाज मंदिरांची यादी तयार करणे व या ठिकाणी नुतणीकरण व दुरूस्‍तीचे काम करण्‍याची आवश्‍यकता आहे. जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या अनेक इमारतीमध्‍ये अव्‍यवस्‍था आहे. यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाही. त्‍यामुळे ग्रामीण भागातील या आरोग्‍य संस्‍थांच्‍या माध्‍यमातुन योग्‍य आरोग्‍य सेवा नागरिकांना उपलब्‍ध होत नाही. त्‍यामुळे प्रा.आ. केंद्राच्‍या नुतणीकरणासाठी खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन निधी उपलब्‍ध करून कार्यवाही करण्‍याची आवश्‍यक आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात प्रत्‍येक पंचायत समिती स्‍तरावर एक शाळा निवडुन भविष्‍यातील संकट लक्षात घेता त्‍याठिकाणी आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाच्‍या द़ष्‍टीने सर्व सोयींनीयुक्‍त असे विलगीकरण केंद्र तयार करण्‍याच्‍या दृष्‍टीने तातडीची कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. यासाठी सुध्‍दा खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन निधी उपलब्‍ध केला जावू शकतो, असेही त्‍यांनी सुचविले.शासकीय वैदयकीय महाविदयालय व रूग्‍णालय, जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालय, ग्रामीण रूग्‍णालय, उप जिल्‍हा रूग्‍णालय, प्राथमिक आरोग्‍य केंद्र यामधील रिक्‍त पदांमुळे आरोग्‍य सेवेवर ताण पडत आहे. कोरोना काळात योग्‍य वैदयकीय सेवा पुरविण्‍याच्‍या दृष्‍टीने सदर रिक्‍त पदे तातडीने भरण्‍याची आवश्‍यकता आहे. सध्‍या प्रत्‍येकच तालुक्‍यात शहरी व ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रूग्‍ण संख्‍या वाढत आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक तालुका स्‍तरावर 100 बेडेड कोविड केअर सेंटर तयार करण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे, कोविड -19 शी संबंधित प्रत्‍येक नस्‍ती तातडीने क्लिअर करणे, तातडीने निर्णय घेण्‍याची पध्‍दत विकसीत करण्‍याची आवश्‍यकता आहे, रूग्‍णवाहीके संदर्भात जिल्‍हा स्‍तरावर एक डिरेक्‍टरी करून, कोविडची एक वेबसाईट तयार करून व्‍हाट्स अॅप नंबर उपलब्‍ध्‍ा करत तसेच उपलब्‍ध बेडची माहिती मिळू शकेल, रूग्‍णवाहीका सहज उपलब्‍ध होईल यासाठी संबंधितांचे संपर्क क्रमांक उपलब्‍ध करून सहज बेडस् व रूग्‍णवाहीका उपलब्‍ध होईल अशी व्‍यवस्‍था करण्‍याची आवश्‍यकता आहे. ऑक्‍सीजन पुरवठा हा अतिशय महत्‍वाचा विषय आहे. त्‍याद़ष्‍टीने ऑक्‍सीजन पाईपलाईन वाढविणे तसेच नविन ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍ट उभारण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍वरीत नियोजन करण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी प्रतिपादीत केली.लसीकरण हा अतिशय महत्‍वाचा विषय आहे. लसीकरण केंद्राची संख्‍या वाढविणे व नागरिकांना सहज लसीकरणाचा लाभ घेता येईल, याद़ष्‍टीने योग्‍य नियोजन करण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रामुख्‍याने दिव्‍यांग बांधवांना रांगेत उभे राहावे लागु नये यादृष्‍टीने योग्‍य नियोजन करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यांना प्राधान्‍याने लसीकरणाचा लाभ देण्‍याची आवश्‍यकता आहे. जिल्‍हयातील 65 प्राथमिक आरोग्‍य केंद्रापैकी 58 ठिकाणीच रूग्‍णवाहीका उपलब्‍ध आहेत. उर्वरीत 7 ठिकाणी सुध्‍दा तातडीने रूग्‍णवाहीका उपलब्‍ध होण्‍याची आवश्‍यकता आहे. काही ठिकाणच्‍या रूग्‍णवाहीका नादुरूस्‍त आहे. त्‍या सुध्‍दा तातडीने दुरूस्‍त करून रूग्‍णांच्‍या सेवेत उपलब्‍ध करण्‍याची आवश्‍यकता आहे असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्टीने सर्वच सुचना महत्‍वपुर्ण असुन त्‍याअनुषंगाने आवश्‍यक कार्यवाही त्‍वरीत करण्‍यात येईल असे जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यावेळी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here