
पनवेल संघर्ष समितीच्या खासगी हॉस्पीटलमधून होत
असलेल्या लुटमारीविरोधातील लढ्याला घवघवीत यश
……………………………….
पनवेल/प्रतिनिधी
कोविड रूग्णांवर खर्चिक उपचार होत असल्याची वारंवार तक्रार करूनही पनवेल महापालिकेने त्याकडे केलेल्या दूर्लक्षामुळे आज, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सेक्रटरी तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोविड स्टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुधाकर शिंदे यांनी चार हॉस्पीटलमध्ये अचानक भेट दिली. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले. तर हॉस्पीटलचा अक्षम्य हलगर्जीपणा आणि गंभीर त्रुटी चव्हाट्यावर आल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.
कोविड रूग्णांवर खर्चिक उपचार होत असल्याने खासगी हॉस्पीटलविरूद्ध पनवेलपासून महाराष्ट्रभर संघर्ष सुरू केल्याची ध्वनी आणि चित्रफीत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सोशल मिडीयावरून काही दिवसांपूर्वीच प्रसारित केली होती. त्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सेक्रेटरी डॉ. सुधाकर शिंदे यांना निवेदन पाठवून पनवेल महापालिका क्षेत्रातील खासगी हॉस्पीटलमधून होणारी लुट थांबविण्यासाठी लक्ष वेधले होते. त्यानुसार आज डॉ. शिंदे यांनी खारघर, कळंबोली परिसरात अचानक भेट देवून हॉस्पीटलचा पंचनामा केला.
पनवेल महापालिकेने काही खासगी हॉस्पीटलला कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर हात वर केले आहेत. त्यांचा त्या हॉस्पीटलवर अंकुश नसल्याने हॉस्पीटल प्रशासन कोविड रूग्णांची हेळसांड आणि भरमसाठ रक्कम उकळत आहे. याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारींचा सुर उमटत असतानाही आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त विठ्ठल डाके त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सेक्रेटरी डॉ. सुधाकर शिंदे यांनी ठाणे क्षेत्रिय व्यवस्थापक डॉ. वैभव गायकवाड, ठाणे जिल्हा समन्वयक डॉ. रविद्र जगतकर यांच्यासह आज, शुक्रवारी (ता. 07) दुपारीच खारघर सेक्टर 20 मधील डॉ. अशोक कुमार यांच्या पोलारिस हॉस्पीटल, रोडपाली, नवीन कळंबोली येथील डॉ. आलाट यांच्या सुश्रृत, डॉ. कदम, सिद्धीविनायक, डॉ. डोंगरे यांच्या आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलला अचानक भेट दिली.
डॉ. शिंदे यांच्या अचानक भेटीमुळे सर्व हॉस्पीटल प्रशासनाचे दाबे दणाणले आहेत. त्यांच्याकडे राज्य शासनाने ठरवून दिलेल्या उपचार दरांच्या रक्कमेची यादी दर्शनी भागाला लावली नसल्याचे उघड झाले आहे. त्याशिवाय कोविड रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा रूपये उकळण्यात येत असल्याचे उघड झाल्याने डॉ. शिंदे यांनी तातडीने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना चारही हॉस्पीटलवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय पोलारिस हॉस्पीटल प्रशासनाचे चांगलेच कान उपटले आहेत.
आता कारवाईचा चेंडू आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कोर्टात गेल्याने कोविड रूग्णांच्या जीवाशी खेळणार्या खासगी हॉस्पीटल प्रशासनावर कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. त्याशिवाय डॉ. शिंदे यांच्या पथकातील डॉक्टरांनी पोलारिस हॉस्पीटलमधून काही बिलांच्या प्रती हस्तगत केल्या आहे. त्याची उद्या पडताळणी करून कारवाईसाठी देशमुख यांच्याकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
